तुम्हाला हवंय आईबाबांचं ऐकून लग्न करावं
(सूचना: जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इंटरॅक्टिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा.)
(आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.)
‘Brief history of time’ वाचून झाल्यापासून साकेतच्या डोक्यात नवनवीन कल्पना घोळायला लागल्या. त्याला त्या लगेच प्रॅक्टिस मध्ये आणाव्याश्या वाटू लागल्या. त्याला टाईम ट्रॅव्हल पेक्षा पण ‘porting’ ही कन्सेप्ट प्रत्यक्षात आणावीशी वाटू लागली. ‘Porting’ म्हणजे सोप्प्या भाषेत सदेह एका जागेवरून दुसऱ्या जागेवर क्षणार्धात जाणे. ‘Porting’चा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा प्रवासाचा वेळ, खर्च आणि क्षीण वाचतो. यावर त्याला स्वतःहून काम करायचं होतं आणि हे आगळंवेगळं फिचर गूगल मॅप्स मध्ये ऍड करून मानाचं पेटंटसुद्धा घ्यायचं होतं. सोबत ऑफिसचं प्रोजेक्टचं काम चालू होतंच.
अशातच जॉबला लागून वर्ष होताच आईबाबांनी लग्नाची भुणभुण चालू केली.
"साकेत, आजच मामीने तीन चार चांगली स्थळं पाठवलीत बघ. तुला सेंड करते. तुला कुठली मुलगी पसंद पडली तर सांग. लगेच आपण बघायचा कार्यक्रम ठरवून टाकू. म्हणजे गोष्टी तशा पुढं जातील."
"आई, घाई आहे का या सगळ्याची?"
"घाई? तुझ्याएवढे बाबा होते तेव्हा तू तीन वर्षांचा होतास. वर तोंड करून विचारतोस घाई आहे का म्हणून?"
"अगं आई, तेव्हाचा काळ वेगळा होता."
"काळ वगैरे काही वेगळा नाही. ही सगळी आजकालच्या पोरांची नाटकं आहेत."
"आई, आता तू विषय काढलाच आहेस तर तुला एक सांगतोच. बरेच दिवस सांगायचा विचार करतोय पण, म्हटलं आधी स्वतः क्लिअर होऊया मग तुला सांगूया."
एका अर्थी आजचं हे संभाषण साकेतच्या पथ्यावरच पडलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. मैथिली! त्यांच्या डिपार्टमेंटची एक स्मार्ट आणि देखणी HR!
"काय रे? कुठली मुलगी अगोदरच बघून ठेवलीयेस का काय?"
"तशी बघितलीये. तुला काय वाटतं? ओळख बघू."
"मैथिली नाही ना?"
"हो! मैथिलीच! पण तुला कसं कळलं? का हे आजच काढून घ्यायला मामीच्या नावानं नाटक वगैरे केलंस?"
"नाटक नाही. मामीने खरंच मुलींची स्थळं पाठवलीत. आणि ओळखायला मला काही अवघड नाही. सतत बोलत असता तुम्ही फोनवर. एकदा दोनदा गाडी चालवत होतास तेव्हा तिचा फोन आला तर मला उचलायला सांगून तिला सांगायला लावलंस की गाडी चालवतोय परत करतो म्हणून. म्हटलं एवढं काय अर्जंट असणारे? मग थोडा थोडा वॉच ठेवला आणि समजलं मला की नक्कीच काहीतरी चालू आहे."
"आई! तू पण ना. आता ओळखलंच आहेस तर स्टोरी ऐकायचीये का तुला आमची?"
"अर्थात!"
"अगं मला मैथिली ऑफिसमध्येच भेटली. सिक्रेट सांता म्हणून एक टाईमपास मीटिंग असते ख्रिसमसच्या आधी तेव्हा. मला तेव्हाच आवडली ती. दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत असून पण आमची भेट कधीच झाली नव्हती."
"सिक्रेट सांता म्हणजे काय असतं?"
"सिक्रेट सांता म्हणजे ख्रिसमसच्या आधी प्रोजेक्ट मधल्या लोकांना आपसात एकमेकांचा ‘सांताक्लॉज’ म्हणून असाइन करतात. असाइन केलं जाताना माहित नसतं की आपला सांताक्लॉज कोण आहे ते. मग प्रत्येकाकडून त्याची विशलिस्ट घेतात आणि मग जो सांताक्लॉज असतो त्यानं आपल्याला नेमून दिलेल्या माणसाला त्या विशलिस्ट मधली एक गोष्ट भेट म्हणून मीटिंग मध्ये द्यायची. प्रचंड मजेदार खेळ असतो. फुल टाईमपास."
"मग तुझा सिक्रेट सांता होती का मैथिली?"
"नाही! ऍक्च्युअली अरविंदचा सिक्रेट सांता म्हणून मैथिलीची निवड झाली. अरविंद माझा चांगला कलीग आहे ऑफिस मधला."
"अरविंदचं नाव नाही ऐकलं कधी जास्त तुझ्याकडून"
"अगं कमाल मुलगा आहे. आम्ही सेम एजचेच आहोत. त्याला पण काही ना काही नवीन ट्राय करत राहायची भयानक आवड आहे. प्रोजेक्टमधलं काम सोडून इतरत्र काही नवीन करता येतं का हे सतत बघत असतो. माझ्याशी डिस्कस करत असतो. सारख्या स्वभावामुळं अगदी जिगरी झालाय माझा ऑफिस मध्ये."
"वा! चांगलंय. एकाला दोन असले की, कामं पण पटपट होतात."
"ते झालंच. कामाशिवाय पण सगळं काही आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो. अडचणींमध्ये एकमेकांना मदत करायला नेहमी तयार असतो आम्ही. बरं ते जाऊ दे सध्या. मी काय सांगत होतो, अरविंदचा सिक्रेट सांता म्हणून मैथिलीला निवडलेलं आणि मला मैथिलीचा! अर्थात असाईन केलं तेव्हा मला माहित नव्हतं की, मला मैथिली म्हणून कुठल्या तरी मुलीला गिफ्ट द्यायचंय."
"मग तुला कधी कळलं की, ती मैथिलीच आहे?"
"डायरेक्ट मीटिंगवेळी. अगं सिक्रेट सांता असाइन झाल्यानंतर सगळ्यांच्या विशलिस्ट्स मागवून घेतात HR लोक. मलाही विशलिस्ट मिळाली. पण खेळाच्या नियमानुसार मला माहित नव्हतं की, ही मैथिलीची विशलिस्ट आहे. अर्थात तेव्हा मला मैथिलीच माहिती नव्हती कारण, त्या मीटिंग आधी आम्ही कधी भेटलोच नव्हतो."
"काय होतं विशलिस्ट मध्ये? "
"मी विशलिस्ट पाहिली आणि मला अंदाज आला की शंभर टक्के कुठल्यातरी मुलीलाच गिफ्ट घ्यायचेत. कारण विशलिस्ट होती पेंग्वीनचं सॉफ्ट टॉय किंवा मेबीलीनच मेकअप कीट किंवा झाराचं व्हाऊचर."
"काहीही! मग तू काय दिलंस?"
"त्यातल्या त्यात बरं वाटलं म्हणून पेंग्वीनचं सॉफ्ट टॉय घेऊन गेलो मीटिंगला. तसा माझा गूगलमधला पहिलाच सिक्रेट सांता."
"मागच्या वर्षी पण झाला असेल ना? तुला आता दोन वर्ष होतील कंपनी जॉईन करून."
"मागच्या वर्षी सिक्रेट सांता मी सिक लिव्हचं कारण देऊन जॉईन नव्हता केला कारण, मला वाटलं ही सगळी उगाचच वेळकाढूपणाची कामं असतील. पण नंतर अरविंदनं मला सांगितलं की, या मिटींग्स मजेशीर असतात आणि सोबत वेगवेगळे खेळ पण घेतात म्हणून, यावर्षी भाग घेतला."
"आणि मला सूनबाई मिळाली."
"गप गं. सूनबाई म्हणे. पुढं तर ऐक."
"बोल."
"मीटिंग चालू झाली आणि पहिलंच नाव माझं आलं. सोबत मैथिलीलाही बोलावलं त्यांनी. गिफ्ट देताना पहिल्यांदाच तिला पाहिलं आणि मला ती जामच आवडली! अगदी लव्ह ऍट फर्स्ट साईट! मीटिंग नंतर मला चैन पडेना. मग मी लगेच अरविंदला सगळं सांगून टाकलं. सोबत हे ही सांगितलं की जरा आऊट ऑफ अवर लीग वाटतीये पण, जर मी काहीच प्रयत्न केला नाही तर प्रॉब्लेम होईल. मॅच मध्ये सहभागी न होताच दुसऱ्याला जिंकताना बघण्यापेक्षा मॅच खेळून मॅच हरलेलं दुःख परवडलं!"
"वा रे वा डायलॉगबाजी. काय म्हणाला मग तो?"
"तो म्हणाला आपण ही मॅच जिंकायचीच. मग आम्ही छोटासा प्लॅन केला. अरविंदच्या दृष्टीनं मुलीला जर पटवायचं असेल, तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तिला आपली सवय लागली पाहिजे. एकदा का सवय झाली की मग कुठल्याही छोट्या छोट्या कारणासाठी ती तुमच्याकडंच मदतीला येणार. त्यावेळी तिला जरासं समजून घ्यायचं आणि थोडी मदत करायची. मग आपोआप तिला तुमची सवय होत जाते आणि तुमच्याशी बोलल्याशिवाय तिला अजिबात चैन पडत नाही. मी पण मग ही स्टेप व्यवस्थित पार पाडली."
"कामं सोडून हे पण करत बसता का काय ऑफिसमध्ये?"
"इतकं चालतं. तसंही तुम्हालाच माझ्या लग्नाची घाई झालीये. तुमचंच काम सोप्पं केलंय मी. असं झालं सगळं. मग मी तिला प्रपोज केलं आणि हो म्हणाली ती लगेच. हा बघ आमचा सोबतचा फोटो."
"वा! सुंदर दिसतीये जोडी."
"हे हे! आता बाबा घरी आले की, बाबांना पण सांगून टाकतो."
"हो सांग. पण मला आधी सांगितलंयस म्हणून नको सांगू. दोघांना एकत्र बोलावून सांग. मी पहिल्यांदाच ऐकतिये अशी ऍक्टिंग करेन."
"आई तू पण ना!"
"हो. नाहीतर सगळं हिलाच सांगतो असं वाटेल त्यांना म्हणून."
अरविंद आणि साकेतनं ठरवल्यानुसार मैथिलीला भेटल्यापासून साकेत रोज या ना त्या कारणाने तिच्याशी बोलत होता. कधी लीव्ह्ज पॉलिसी बद्दल बोल, कधी इन्शुरन्स बेनेफिट्स बद्दल विचार असं करत करत त्यानं तिच्याशी आपलं अवांतर बोलणं वाढवत नेलं. साकेतच्या अंदाजानुसार तिला खरंच त्याच्याशी बोलायची ‘सवय’ लागली आणि हळू हळू छोट्या छोट्या गोष्टी ती त्याच्याशी शेअर करू लागली.
"साकेत, तू बोलतोयस आणि तिला तुझी सवय लागलीये."
"येस बॉस. हळू हळू जाऊ की पुढं."
"भावा, फक्त इतकंच करून भागणार नाहीये. नाहीतर मैत्री मैत्रीपुरतीच मर्यादित राहिल"
"मग आता काय करू? आत्ताच प्रपोज केलं तर नाही म्हणेल ती."
"अरे मूर्खा, नुसतं बोलणं सोडून सोशल मीडियावर पण काहीतरी कर. मुली जाम ऍक्टिव्ह असतात सोशल मीडियावर."
"मी एक काम करतो मग. तसंही मी कॉलेजमध्ये लिहिलेल्या शायऱ्या आणि चारोळ्या आहेतच. सगळ्या प्रकारच्या आहेत. दर्दभऱ्या, प्रेमाच्या, दुःखाच्या. थोड्या थोड्या दिवसांनी एक एक टाकतो तिला उद्देशून."
"तिला उद्देशून नको टाकू."
"मग?"
"अरे नुसत्या पोस्ट कर. मी आणि बाकीचे लोक तिचं नाव न घेता कमेंट्स करतो. बघू तिला हिंट्स मिळतात का. तशा या बाबतीत मुली हुशार असतात. त्यांना लगेच कळतं आपल्याबद्दल कोण कुठल्या अर्थाने काय बोलतंय ते."
झालं. साकेतनं अशा चारोळ्या, शेरोशायऱ्या फेसबुक, इंस्टावर टाकायला चालू केलं. मग अरविंद आणि मित्रमंडळी त्यावर कमेंट्स करणार, मैथिलीचं नाव न घेता पण मैथिलीलाच उद्देशून. हा प्रयोग जाम यशस्वी झाला आणि खरोखरच मैथिली आणि साकेतमधलं अंतर कमी होत गेलं. मैथिलीलाही अरविंद आणि मित्रमंडळींच्या फेसबुक,इंस्टाच्या कमेंट्सचा रोख हळू हळू कळायला लागला. तरीही ती कळून न कळल्यासारखं करायची. यातच व्हॅलेन्टाईन्स वीक चालू झाला.
"काय मग साकेत. वॅलेंटाइन्स वीक चालू झालाय. काय स्पेशल मग?"
"अरे हे एक नवीनच आहे. कळत नाहीये काय करू. गिफ्ट देऊ का रोज एक?"
"चल हॅट. असं केलं तर तिला कळेल हा आपल्याला प्रपोज करणारे वॅलेंटाइन्स डे ला. मग ते सरप्राईज नाही राहणार."
"मग?"
"तुला रेखता माहितीये का?"
"ऑफ कोर्स. कमाल कलेक्शन आहे त्या साईट वर."
"झालं तर मग. रेखता वर वॅलेंटाइन्स वीक मधल्या प्रत्येक दिवशी त्या दिवसाशी रिलेटेड एक शायरी येते. गिफ्ट्स देण्यापेक्षा बोलता बोलता तिला ती सेंड करत जा. आणि जर तिनं मुद्दाम विचारलंच की, मला का पाठवतोयस, तर सांग 'मित्र मैत्रिणींसोबत' पण आपण वॅलेंटाईन्स वीक साजरा करू शकतो."
मग साकेतनं व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये मैथिलीला एकही गिफ्ट न देता प्रत्येक दिवसाची एक एक शायरी तिला पाठवली आणि बरोबर व्हॅलेंटाईन्स डे ला तिला प्रपोज केलं. मैथिलीला याचा अंदाज आला होताच. त्यामुळं तिनं कसलेही आढेवेढे न घेता होकार दिला. साकेतनं प्रपोज पण एकदम फसक्लास केलं. अरविंदची मदत घेऊन हॉटेलमध्ये एक टेबल बुक केलं. एक बुके ऑर्डर केला आणि तो तिला सगळ्या हॉटेल समोर गुडघ्यावर बसून दिला! मैथिली एकदम इमोशनल झाली.
"हे बघ मैथिली, रिलेशनशिप वगैरे सगळं ठीक आहे. पण जर हे रिलेशन लग्नापर्यंत न्यायचं असेल तरच हो म्हण."
"ऑफ कोर्स साकेत. आपलं आता काही टाईमपासचं वय नाहीये. जर रिलेशन सुरु झालं तर लग्नापर्यंत न्यायचंच. कोणी काही म्हटलं तरी."
साकेतनं मैथिलीबद्दल मग बाबांना पण सांगून टाकलं घरी. बाबांनाही याची कल्पना आली होतीच. त्यामुळे त्यांनी पण आढेवेढे न घेता त्यांच्या लग्नाला मान्यता दिली. मैथिलीच्या घरुनही काही विरोध झाला नाही. एकदम थाटामाटात त्यांचं लग्न पार पडलं आणि साकेत-मैथिलीच्या संसाराला सुरुवात झाली. या सगळ्या धामधुमीत तो porting च्या ध्येयापासून मात्र तसूभरही हलला नव्हता. त्यानं हे मैथिलीसोबत लग्नाआधीही शेअर केलं होतं. मैथिलीचाही त्याला यामध्ये मनापासून सपोर्ट होता. आपला नवरा काहीतरी जगावेगळा प्रयत्न करतोय, जरी तो यशस्वी झाला-न झाला तरी साकेत खूप फेमस होईल, यासाठी तिला त्याचा खूप अभिमान वाटायचा.
"साकेत, तू नक्की कशावर काम करतोयस? म्हणजे पोर्टींग म्हणजे नक्की काय? म्हणजे आमचा तास ऑडिट वगैरे आणि HR रिलेटेड गोष्टींशीच संबंध येतो म्हणून मला जरा नीट सांगशील का?"
" अगं, Porting ची कल्पना तशी समजायला खूप सोप्पी आहे. पण ती खरंच प्रत्यक्षात आणता येईल का, हाच मोठा मुद्दा आहे."
"पण नक्की काय पोर्टींग म्हणजे?"
"हे बघ, गूगल मॅप्स मध्ये स्ट्रीट व्ह्यू म्हणून फीचर असतं. स्ट्रीट व्ह्यू मध्ये आपण जगातल्या ज्या ज्या ठिकाणी हे फीचर एनेबल्ड आहे तिथं आपल्या मोबाइलमधून व्हर्च्युअली फिरून येऊ शकतो. म्हणजे आयफेल टॉवरला प्रत्यक्ष न जाता मोबाइलचा स्ट्रीट व्ह्यू वापरून आपण आजूबाजूच्या गर्दीमधून आयफेलचा आस्वाद घेऊ शकतो अगदी घरबसल्या."
"मी नाही बघितलंय कधी."
मग साकेतने स्ट्रीट व्ह्यू ओपन करून तिला आयफेल टॉवर कसा दिसतो त्यात ते दाखवलं आणि म्हणाला, "याच स्ट्रीट व्ह्यू मध्ये अजून एक आयकॉन ऍड करायचा. ज्यावर क्लिक केलं की, जिथून आपण आयफेल टॉवर बघतोय त्या coordinates वर आपोआप जाऊन पोहचू. आयफेल टॉवर थेट आपल्यासमोर!"
"शक्य आहे हे नक्की?"
"शक्य तर आहे. पण थोडंसं अवघड आहे. आणि हे बघ ना जर खरंच हा प्रयोग सफल झाला तर कोणीही त्याचा कसाही वापर करू शकेल. कोणीही अगदी कुठेही कधीही कसंही जाऊ शकेल. तेही फुकट! स्वतःच्या देशात किंवा देशाबाहेरही. वेळ वाचेल. ट्रॅफिकचा त्रास संपेल. प्रवासातला नाहक खर्च आणि मनस्ताप वाचेल."
"ट्रॅव्हल आणि गाड्यांच्या कंपन्यांना तर हे तुझं फीचर अजिबातच आवडणार नाही. त्यांचा यात तोटाच आहे."
"अर्थात. प्रत्येक गोष्टीचे फायदे असतील तर तोटेही असणारच. आता विघ्नसंतोषी माणसं याचा वापर त्यांच्या फायद्यासाठी आणि समाजाच्या तोट्यासाठी करतील. अगदी चोरी, दरोडा, खून पासून दहशतवादी कारवायांपर्यंत सगळं करणं अगदी सोप्पं होऊन जाईल. त्यामुळं या फिचरच्या वापरावर आपल्याला काही निर्बंध घालावे लागतील. त्याही आधी या फिचरचा हेतू इंटरनॅशनल कौंसिलला पटवून द्यावा लागेल."
"माझ्यासाठी खूप अवघड आहे हे सगळं लगेच समजणं."
"हे बघ, आधी ते फिचर प्रत्यक्षात येईल का नाही इथंपासून सुरुवात आहे. यावर विचार करून आपला वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा जेव्हा केव्हा हे फीचर अस्तित्वात आणू, तेव्हा बघूया आपण."
एक दिवस एक आयरिश शॉर्ट फिल्म बघता बघता त्याच्या मनात porting प्रत्यक्षात आणण्याची आयडिया आली. त्या शॉर्ट फिल्म मध्ये हिरोकडं एक टेनिस बॉलच्या आकाराचं एक पोर्टल असतं. त्यावर ० ते ९ आकडे, N, E, S, W, . आणि एक बटण अशा कीज असतात. आपल्याला हवे ते coordinates त्या पोर्टल मध्ये टाकायचे आणि बटण दाबायचं. लगेच हिरो त्या coordinates च्या जागेवर पोहचत असे. ती शॉर्ट फिल्म बघून साकेतला आपल्या कल्पनेची व्यवस्थित लिंक लागली.
"हे बघ मैथिली. समज, तुझ्याकडं एक टेनिस बॉलच्या आकाराचं मशीन आहे."
"ओके."
"आता असंच मशीन प्रत्येकाला द्यायचं. आणि ते ज्याच्या त्याच्या मोबाईल सोबत गव्हर्मेंट आयडीलाही लिंक करायचं."
"गव्हर्मेंट आयडीमुळं दुरुपयोगाला जरा तरी आळा बसेल."
"अगदीच तसं नाही होणार. पण कुणाला दुरुपयोग करता येऊ नये म्हणून काय करायचं त्याचा अभ्यास चालूच आहे माझा. पुढं ऎक."
"बोल."
"प्रत्येकाला असंच एक मशीन असाइन करायचं. आपण त्याला पोर्टल म्हणूया आणि ते पोर्टल आपल्यासोबत असेल आणि मोबाईलला लिंक असेल तरच स्ट्रीट व्ह्यू मधलं porting फिचर एनेबल होईल आणि आपण स्ट्रीट व्ह्यू मध्ये सिलेक्ट केलेल्या coordinates ला आरामात पोहचू."
"ओह! थोडं थोडं समजतंय मला आता! तू कर हे डेव्हलप. तुला लवकरात लवकर फेमस झालेलं मला बघायचंय. मग मी पण एका सेलेब्रिटीची बायको म्हणून मिरवेन!"
त्याच्या कल्पनेनुसार हे पोर्टल डेव्हलप करायचं चॅलेंज साकेतनं स्वीकारलं आणि तो लगेच कामाला लागला. साकेत तहानभूक विसरून यावर काम करू लागला. ट्रायल अँड एरर करत करत तो पोर्टल डेव्हलप करायच्या मागं लागला. सोबत प्रोजेक्टचं कामही चालू होतंच. त्याला आता फक्त आणि फक्त ते पोर्टलच दिसू लागलं. झपाटून काम करत त्याने पोर्टलचा एक प्रोटोटाइप आणि प्रेझेंटेशन पेपर तयार केला. त्याची कल्पना सादर करून फंडिंग मिळवण्यासाठी त्याने लीडरशिपला मेल केला. त्याची कल्पना सादर करण्यासाठी एक कमिटी नेमली. त्याने मीटिंग मध्ये आपली कल्पना व्यवस्थितरीत्या कमिटीसमोर मांडली. बराच विचारविमर्श झाला. यातले संभाव्य धोके लक्षात घेऊन कमिटीने, ते धोके टाळण्याबद्दलचे मुद्दे साकेतला सांगितले आणि हे धोके टळतील असं पोर्टल जर साकेतने डेव्हलप केलं तर त्याबद्दलचं पेटंटही मिळवून देण्याचं आश्वासन देत ही कल्पना मान्य केली. साकेतला प्रचंड आनंद झाला. सोबतच पोर्टलवर काम करण्यासाठी हवी असलेली नवीन उभारी मिळाली.
लवकरच त्याने पोर्टल डेव्हलप केलं आणि टेस्टिंग साठी स्वतःच्या गूगल मॅप्समध्ये लिंक केलं. या फीचरला त्याने ‘स्मार्ट पोर्ट’ असं नाव दिलं होतं. फीचर पूर्ण डेव्हलप होताच त्यानं पहिल्या टेस्टिंगसाठी गूगलचं परमिशन लेटर मिळवलं आणि त्याच रात्री मैथिलीला सरप्राईज द्यायचं ठरवलं. त्याला कारणही तसंच होतं. त्यांची ऍनीवर्सरी! त्यानं ठरवलं रात्री बारा वाजता मैथिलीला सोबत घेऊन ताज हॉटेलचा स्ट्रीट व्ह्यू सिलेक्ट करायचा आणि थेट ताजच्या कॉरिडॉर मध्ये पोर्ट व्हायचं आणि मस्तपैकी आपली ऍनीवर्सरी साजरी करायची.
आता तुम्हाला काय वाटतंय? साकेतचं आणि मैथिलीचं पोर्टींग टेस्टिंग यशस्वी झालं असेल का टेस्टिंग फसलं असेल आणि ते वेगळ्याच अडचणीत अडकले असतील?
तुम्हाला साकेतचं टेस्टिंग यशस्वी करायचं आहे <- (क्लिक करा).
तुम्हाला साकेतचं टेस्टिंग फसवायचं आहे <- (क्लिक करा).
©श्रेयस जोशी
Comments
Post a Comment