तुम्हाला हवंय करिअर वर फोकस करावा

 (सूचना:  जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इंटरॅक्टिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा.


(आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.)  

  

'Brief history of time’ वाचून झाल्यापासून साकेतच्या डोक्यात नवनवीन कल्पना घोळायला लागल्या. त्याला त्या लगेच प्रॅक्टिस मध्ये आणाव्याश्या वाटू लागल्या. त्याला टाईम ट्रॅव्हल पेक्षा पण ‘porting’ ही कन्सेप्ट प्रत्यक्षात आणावीशी वाटू लागली. ‘Porting’ म्हणजे सोप्प्या भाषेत सदेह एका जागेवरून दुसऱ्या जागेवर क्षणार्धात जाणे. ‘Porting’चा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमचा प्रवासाचा वेळ, खर्च आणि क्षीण वाचतो. यावर त्याला स्वतःहून काम करायचं होतं आणि हे आगळंवेगळं फिचर गूगल मॅप्स मध्ये ऍड करून मानाचं पेटंटसुद्धा घ्यायचं होतं. सोबत ऑफिसचं प्रोजेक्टचं काम चालू होतंच.


            अशातच जॉबला लागून वर्ष होताच आईबाबांनी लग्नाची भुणभुण चालू केली.


"साकेत, आजच मामीने तीन चार चांगली स्थळं पाठवलीत बघ. तुला सेंड करते. तुला कुठली मुलगी पसंद पडली तर सांग. लगेच आपण बघायचा कार्यक्रम ठरवून टाकू. म्हणजे गोष्टी तशा पुढं जातील."

"आई, घाई आहे का या सगळ्याची?"

"घाई? तुझ्याएवढे बाबा होते तेव्हा तू तीन वर्षांचा होतास. वर तोंड करून विचारतोस घाई आहे का म्हणून?"

"अगं आई, तेव्हाचा काळ वेगळा होता."

"काळ वगैरे काही वेगळा नाही. ही सगळी आजकालच्या पोरांची नाटकं आहेत."

"आई, आता तू विषय काढलाच आहेस तर तुला एक सांगतोच. बरेच दिवस सांगायचा विचार करतोय पण, म्हटलं आधी स्वतः क्लिअर होऊया मग तुला सांगूया."

"आता काय नवीन तुझं?"

"नवीन वगैरे काही नाही." "बाबा" साकेतने बाबांना हाक मारून बोलावून घेतलं. त्याला आज दोघांना स्वतःचा निर्णय क्लिअरली सांगायचाच होता.

"आई बाबा, मला या लग्नाच्या विषयावर स्पष्ट बोलायचंय."

"काय झालं?"

"बाबा, आईला सतत कोणी ना कोणी कुठली ना कुठली स्थळं पाठवत राहतं. मग तिचं लगेच लग्न लग्न चालू होतं. अर्थात यात तिला तुमचाही पाठिंबा आहेच. म्हणून म्हटलं दोघांनाही माझ्या मनातलं जरा नीट समजून सांगावं आणि तुम्ही पण ते समजून घ्यावं असं मला वाटतं."

"तुला कुठली मुलगी आधीच आवडलीये का?"

"नाही गं आई. हे बघा, मला सध्या 'पोर्टींग' म्हणून एका फीचरवर काम करायचंय आणि त्याचं पेटंट मिळवायचंय. यावर काम करायचं तर मला सध्या कुठलीही जास्तीची जबाबदारी नको आहे."

"पण हे पोर्टींग म्हणजे नक्की काय?"

"हे बघ, गूगल मॅप्स मध्ये स्ट्रीट व्ह्यू म्हणून फीचर असतं. स्ट्रीट व्ह्यू मध्ये आपण जगातल्या ज्या ज्या ठिकाणी हे फीचर एनेबल्ड आहे तिथं आपल्या मोबाइलमधून व्हर्च्युअली फिरून येऊ शकतो. म्हणजे आयफेल टॉवरला प्रत्यक्ष न जाता मोबाइलचा स्ट्रीट व्ह्यू वापरून आपण आजूबाजूच्या गर्दीमधून आयफेलचा आस्वाद घेऊ शकतो अगदी घरबसल्या."

"मी नाही बघितलंय कधी."

मग साकेतने स्ट्रीट व्ह्यू ओपन करून आईबाबांना आयफेल टॉवर त्यात कसा दिसतो ते दाखवलं आणि म्हणाला, "याच स्ट्रीट व्ह्यू मध्ये अजून फीचर ऍड करायचं. जे वापरून, जिथून आपण आयफेल टॉवर बघतोय त्या coordinates वर आपोआप जाऊन पोहचू. आयफेल टॉवर थेट आपल्यासमोर!"

"शक्य आहे हे नक्की?"

"शक्य तर आहे बाबा. पण थोडंसं अवघड आहे. आणि हे बघा ना जर खरंच हा प्रयोग सफल झाला तर कोणीही त्याचा कसाही वापर करू शकेल. कोणीही अगदी कुठेही कधीही कसंही जाऊ शकेल. तेही फुकट! स्वतःच्या देशात किंवा देशाबाहेरही. वेळ वाचेल. ट्रॅफिकचा त्रास संपेल. प्रवासातला नाहक खर्च आणि मनस्ताप वाचेल."

"ट्रॅव्हल आणि गाड्यांच्या कंपन्यांना तर हे तुझं फीचर अजिबातच आवडणार नाही. त्यांचा यात तोटाच आहे."

"अर्थातच बाबा. प्रत्येक गोष्टीचे फायदे असतील तर तोटेही असणारच. आता विघ्नसंतोषी माणसं याचा वापर त्यांच्या फायद्यासाठी आणि समाजाच्या तोट्यासाठी करतील. अगदी चोरी, दरोडा, खून पासून दहशतवादी कारवायांपर्यंत सगळं करणं अगदी सोप्पं होऊन जाईल. त्यामुळं या फिचरच्या वापरावर आपल्याला काही निर्बंध घालावे लागतील. त्याही आधी या फिचरचा हेतू इंटरनॅशनल कौंसिलला पटवून द्यावा लागेल."

"माझ्यासाठी खूप अवघड आहे हे सगळं लगेच समजणं."

"हे बघ आई, आधी ते फिचर प्रत्यक्षात येईल का नाही इथंपासून सुरुवात आहे. यावर विचार करून आपला वेळ आणि शक्ती वाया घालवण्यापेक्षा जेव्हा केव्हा हे फीचर अस्तित्वात आणू, तेव्हा बघूया आपण."

"मग तू अजून किती वर्षं लग्न करणार नाहीयेस? आम्हाला आत्ता होतंय तोवरच तू लग्न करावंस असं मला वाटतं आणि तुझं लग्नाचं वयही झालंय."

"किती वर्ष असं फिक्स नाही सांगता येणार आई. पण माझं हे स्वप्न पूर्ण झालं की, लगेच तुम्ही माझ्या लग्नाच्या तयारीला लागलात तरी चालेल. मग मी कसलीही आडकाठी करणार नाही. वाटल्यास तुम्हालाच जर स्वतःहून एखादी मुलगी पसंद पडली तर मला एकदा भेटवा तिला. माझी ही अट मान्य असेल आणि ती माझा प्रयोग यशस्वी होईपर्यंत थांबायला तयार असेल तर माझीही काहीच हरकत नाहीये त्या परिस्थितीत. पण सध्या मात्र मला माझ्या करिअरवरच फोकस करायचाय."

त्यानं आईबाबांना हे स्पष्ट सांगितलं. अगदी लगेचच लग्नाचा विचार करणार नसलो तरी, माझा हा प्रयोग सफल झाल्याझाल्या अगदी लगेच लग्नासाठी तयारी करायचं वचनही दिलं. मग आई बाबांनीही तो मुद्दा जास्त ताणून नाही धरला. 


     साकेतचं कंपनीमधलं नेमून दिलेलं काम चालूच होतं. त्याचं प्रोजेक्टमधल्या अरविंदसोबत चांगलंच सूत जमलेलं. दोघांनाही काही ना काही नवीन ट्राय करत राहायची भयानक आवड. प्रोजेक्टमधलं काम सोडून इतरत्र काही नवीन करता येतं का हे बघण्याकडं दोघांचा ओढा फार. सारख्या स्वभावामुळं दोघं थोड्याच दिवसात अगदी जिगरी झाले. एकमेकांच्या कल्पना एकमेकांना सांगून त्या कशा अस्तित्वात आणता येतील, त्यात काय काय अडचणी येतील, त्या खरंच अस्तित्वात आणता येतील का त्या फक्त विचारापुरत्या मर्यादित आहेत असं सगळं डिस्कशन करायला दोघांना खूप आवडायचं.


            "अरविंद, एक आयडिया तुला सांगायचीये."

"बोल."

"पोर्टींग. म्हणजे आपण आत्ता मॅप्सचं स्ट्रीट व्ह्यू फीचर वापरतोच आहे. ज्यातून आपल्याला सगळं जग जसं आहे तसं दिसतंय. पण जर यामध्ये असं एखादं फीचर ऍड केलं की, जे वापरून आपल्याला स्ट्रीट व्ह्यू मध्ये जिथं आहोत तत्क्षणी तिथं पोर्ट होऊ."

"इंटरेस्टिंग! मॅप्समधेच आपण हा पोर्टींगचा आयकॉन ऍड करू शकतो."

"हो! परवाच एक 'लॉस्ट मॅन' नावाची आयरिश शॉर्टफिल्म बघताना हे पोर्टींग प्रत्यक्षात आणायची आयडिया आली."

"ते कसं?"

"अरे त्या फिल्ममध्ये हिरोकडं एक टेनिस बॉलच्या आकाराचं एक पोर्टल असतं. त्यावर ० ते ९ आकडे, N, E, S, W, . आणि एक बटण अशा कीज असतात. आपल्याला हवे ते coordinates त्या पोर्टल मध्ये टाकायचे आणि बटण दाबायचं. लगेच हिरो त्या coordinates च्या जागेवर पोहचत असतो. ते बघून मला व्यवस्थित लिंक लागली"

"आपण थोडंसं कॉपीकॅट बनूया इथं."

"म्हणजे?"

"आपण असं करूया पोर्टलवाली आयडिया वापरूया अशी. पण आपल्याला coordinates वगैरे टाकायची काहीच गरज नाहीये. कारण आपण मॅप्स वापरून ऑलरेडी पोर्टींगच्या डेस्टिनेशनला पोहचलेले असू."

"बरोबर."

"आपण काय करू असंच राऊंड शेप मशीन तयार करू आणि प्रत्येकाच्या मोबाईलला असाईन करू. म्हणजे कोणी कोणाचं मशीन वापरू नाही शकणार."

"सोबत आपण ते मशीन गव्हर्नमेंट आयडीला पण लिंक करू. म्हणजे याचा दुरुपयोग जरा कमी होईल. अर्थात पूर्ण शून्य नाही होणार, पण काहीतरी आळा बसेल."

"हो. आणि हे पोर्टल मशीन आपल्यासोबत असेल आणि डिव्हाईसला लिंक असेल तरच स्ट्रीट व्ह्यू मधलं पोर्टींग फीचर एनेबल होईल. मग स्ट्रीट व्ह्यू मध्ये सिलेक्ट केलेल्या coordinates ला आपण आरामात पोहचू.


डिस्कशन नंतर ही कल्पना अरविंद आणि संकेतला खूपच क्लिअर झाली. हे पोर्टल डेव्हलप करायचं चॅलेंज दोघांनीही स्वीकारलं आणि ते लगेच कामाला लागले. साकेत आणि अरविंद तहानभूक विसरून यावर काम करू लागले. ट्रायल अँड एरर करत करत ते पोर्टल डेव्हलप करायच्या मागं लागले. सोबत प्रोजेक्टचं कामही चालू होतंच. दोघांना आता फक्त आणि फक्त ते पोर्टलच दिसू लागलं. झपाटून काम करत दोघांनी पोर्टलचा एक प्रोटोटाइप आणि प्रेझेंटेशन पेपर तयार केला. त्यांची कल्पना सादर करून फंडिंग मिळवण्यासाठी त्यांनी लीडरशिपला मेल केला. त्यांची कल्पना सादर करण्यासाठी एक कमिटी नेमली. त्यांनी मीटिंग मध्ये आपली कल्पना व्यवस्थितरीत्या कमिटीसमोर मांडली. बराच विचारविमर्श झाला. पण यातले संभाव्य धोके लक्षात घेऊन कमिटीने ही कल्पना त्यांना रद्द करायला सांगितली. साकेत आणि अरविंदला प्रचंड धक्का बसला. त्यांना त्यांची इतक्या महिन्यांची मेहनत पाण्यात जाताना दिसत होती.


"भेंचोत. असं कसं काय रिजेक्ट करू शकतात?"

"तेच ना. तरी नशीब आपण जास्त खोलात जाऊन नाही एक्सप्लेन केलं."

"डॉक्युमेंट्स पण नाही शेअर केले ते बरं झालं. नुसता प्रोटोटाईप आणि प्रेझेन्टेशन पेपरच सादर केला ते पण बरं झालं."

"आपली कल्पना अजूनही आपल्याकडंच आहे साकेत. आपण दोघांनी यावर काम केलंय तर मला असं वाटतंय की, हे तडीस नेऊया."

"कसं?"

"हे बघ. तुझी तयारी असेल तर माझी आयडिया ऐक."

"आहे तयारी. बोल."

"आधी ऎक तरी. आपण दोन-तीन वर्षं इथं काम करतोय. वर घरीच राहत असल्यामुळं आपलं सेविंगसुद्धा बऱ्यापैकी झालंय."

"बरोबर."

"मला असं वाटतंय की, आपण गूगल सोडायची."

"काय?"

"ऐकून घे पूर्ण. आपण गुगल सोडायची आणि दोघानीच मिळून हे फीचर डेव्हलप करायला घ्यायचं. आपलं सेविंग यामध्ये इन्व्हेस्ट करू आणि पुढं जाऊन जो काही फायदा होईल त्यातला थोडा स्वतःकडे ठेऊन बाकीचा पुढच्या शोधासाठी लावू."

"अच्छा. आणि असं कुणाकडून अप्रूव्हल घेत बसण्यापेक्षा आपणच स्वतःचा मॅप डेव्हलप करू. त्याला ते पोर्टल लिंक करू आणि जगाला दाखवून देऊ की काहीही अशक्य नसतं."

"ये बात!"

त्यांच्याकडं पोर्टलसाठी लागणारं सगळं काही तयार होतं, फक्त आता त्यांना एक नवीन मॅपसाठीचं ऍप डेव्हलप करायला लागणार होतं. दोघांची हुशारी बघता याला जास्त वेळ लागलाच नसता. सगळं काही ठरवूनच दोघं गुगलच्या बाहेर पडले. 


दोघांसमोर आता फक्त एकच ध्येय होतं की, लवकरात लवकर पोर्टल तयार करून त्याचं पेटंट घ्यायचं. परत एकदा दोघांनी झपाटून काम करायला सुरुवात केली. मॅपसाठीचं ऍपसुद्धा थोड्या दिवसात तयार होऊन प्ले स्टोअर वर आलं. त्यांनी त्याला पोर्टल मॅप्स असं नाव दिलं. आता त्यांना फक्त त्यांचं पोर्टल डेव्हलप करून ऍपमध्ये लिंक करायचं होतं. पोर्टलची पूर्वतयारी तर झालीच होती. पोर्टलच्या डेव्हलपमेंटचे कोड्स वगैरे तर तयारच होते. होता होता पोर्टलसुद्धा डेव्हलप झालं. त्यांनी दुसऱ्या दिवशी पोर्टलचं टेस्टिंग करायचं ठरवलं. 


दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली ती दोघांसाठी आश्चर्याचा धक्का घेऊनच!


"आज रात्रीच आपण पोर्टल मॅप टेस्ट करूया. एक मिनिट! अरविंद गूगलचा मेल आलाय."

"मी पण जस्ट बघितला."

"साले, परत बोलावतायत. यांना नक्की कुठून तरी खबर लागली असणार की, दोघंही कंपनीच्या बाहेर पडून porting फिचर डेव्हलप करतायत आणि त्यात जवळपास यशस्वी झालेत."

"म्हणूनच जॉब रिजॉईन करायचा मेल केलाय आपल्याला त्यांनी. त्यांना वाटत असेल की, आता जर हे फीचर स्वतंत्रपणे मार्केटमध्ये आलं आणि आपण आपली सक्सेस स्टोरी जगासोबत शेअर केली तर कोंपेटीटर्समध्ये गूगलची नाचक्की होईल."

"त्यामुळंच आपल्याला परत बोलावतायत. म्हणजे पोर्टींगचा प्रयोग यशस्वी करणारी गूगल पहिली कंपनी होईल. हा गुगलचा आपल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध एक मोठा विजय ठरेल."

"म्हणून कंपनीनं दोघांनाही पोर्टलच्या डेव्हलपमेंटचा योग्य तो मोबदला देऊन सोबत आपला पगार वाढवून परत बोलावलंय. या शोधाचं पेटंटसुद्धा आपल्या दोघांच्या नावे करायचं आश्वासन दिलंय."

"तसंही सगळी डॉक्युमेंट्स आपल्याकडंच असल्यामुळं गूगल आपल्या मदतीशिवाय पोर्टींग फीचर प्ले स्टोअर वर आणू शकत नाही. मला वाटतं आपण आपलं टेस्टिंग पार पाडूया आज रात्री आणि मग आपला निर्णय गूगलला कळवूया. तुला काय वाटतंय?"

"सेम. डन."


दोघांनी ठरवलं की, रात्री ताज हॉटेलचा स्ट्रीट व्ह्यू सिलेक्ट करायचा आणि थेट ताजच्या कॉरिडॉर मध्ये पोर्ट व्हायचं. 


आता तुम्हाला काय वाटतंय? साकेतचं आणि अरविंदचं पोर्टींग टेस्टिंग यशस्वी झालं असेल आणि त्यांनी परत गूगल जॉईन केलं असेल का टेस्टिंग फसलं असेल आणि ते वेगळ्याच अडचणीत अडकले असतील?




तुम्हाला साकेतचं टेस्टिंग यशस्वी करायचं आहे <- (क्लिक करा).




तुम्हाला साकेतचं टेस्टिंग फसवायचं आहे <- (क्लिक करा). 


©श्रेयस जोशी


Comments

Popular posts from this blog

साकेतची गोष्ट । Interactive story । Interactive Marathi story

तुम्हाला हवंय आईबाबांचं ऐकून लग्न करावं

नातं