तुम्हाला हवंय की टेस्टिंग यशस्वी झालं
(सूचना: जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इमर्सिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा.)
(आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.)
साकेतनं त्याचं आणि मैथिलीचं पोर्टल दोघांच्या मोबाईलमधल्या मॅप्सला लिंक केलं.
"मैथिली आत ये आता."
"झालं का तुझं सगळं नक्की? मागचा अर्धा तास मला बाहेर थांबवून ठेवलंयस."
"झालं माझं डेकोरेशन. ये आता."
मैथिली आत आली. त्यानं पोर्टल तिच्या हातात दिलं आणि म्हणाला, "हॅप्पी ऍनिव्हर्सरी!" मैथिलीला काहीच कळेना. तिला आजूबाजूला नेहमीसारखीच रूम दिसत होती. "हॅप्पी ऍनिव्हर्सरी, साकेत. मी अर्धा तास बाहेर होते. मला वाटलं बरंच काही डेकोरेशन असेल. इथं ना फुगे आहेत, ना फुलं." त्यानं तिला शांतपणे आपण काय करतोय ते बघायला सांगितलं. मग तिच्या आणि स्वतःच्या मोबाईलच्या गूगल मॅप्समध्ये ताजचा स्ट्रीट व्ह्यू सिलेक्ट केला. स्ट्रीट व्ह्यूद्वारे फिरत फिरत ते कॉरिडॉरमध्ये पोहचले आणि पोर्ट बटण दाबलं. आपल्या रूममधून ते तत्क्षणी ताजच्या कॉरिडॉरमध्ये चक्क ‘पोर्ट’ झाले. मागच्या सेकंदाला ते आपल्या रूममध्ये होते आणि या सेकंदाला चक्क ताजमध्ये! साकेतचा आनंद गगनात मावेना.
"साकेत! पोर्टींग?"
"येस!"
"थेट ताजमध्ये! साकेत आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण आलोय ते पण विना सिक्युरिटी चेक्सचं. म्हणजे मला खूप आनंद झालाय की, इतके दिवस ज्याच्यासाठी तू झपाटून काम करतोयस ते आज प्रत्यक्षात येतंय. पण मला भीती वाटतीये कोणी आपल्याला विदाऊट सिक्युरिटी चेक्स आत आलोय हे कळलं तर आपल्याला पकडतील आणि पोलिसांकडं देतील."
"शांत. मैथिली शांत. आधी इथं ये. बस टेबलवर. हे बघ गूगलचं परमिशन लेटर आहे. जेव्हा केव्हा हे फीचर टेस्ट करेन, तेव्हा त्या टेस्टिंग पुरतं मला सगळं माफ आहे. ते सगळं सोड. काय खायचंय तुला सांग."
"साकेत! खूपच कमाल सरप्राईज आहे हे माझ्यासाठी. मला खूप आवडलंय. आपल्या ऍनिव्हर्सरीपेक्षापण तुझ्यासाठी हा दिवस खूप मोठा आहे. Heartiest Congratulations! तुला जे हवं ते मागव."
"थँक्स माय डियर! मल्टिग्रेन पिझ्झा बियांका विथ एक्सट्रा चीज?"
"डन. सोबत फॉरेस्ट फायर मॉकटेल."
त्यांनी मल्टिग्रेन पिझ्झा बियांकासोबत फॉरेस्ट फायर मॉकटेलची ऑर्डर दिली. साकेत प्रचंड आनंदी झाला होता, त्याचा आनंद बघून मैथिलीपण खूप खुश झाली. इतके दिवस साकेतनं जे स्वप्न बघितलेलं ते आज सत्यात उतरत होतं.
"साकेत याचं पेटंट तर तुला मिळेलच, नाही?"
"पेटंट वगैरे मिळेलंच. पण पुढच्या वर्षीच्या फिजिक्सच्या नोबेलसाठीसुद्धा ह्याचा विचार करतील."
"वा! मग आता मी एका प्रख्यात सेलेब्रिटीची बायको म्हणून मिरवेन!
आता साकेतला या शोधाचं पेटंट तर मिळणार होतंच पण, पहिल्यांदाच कोणीतरी असा प्रयोग सक्केसफुल केल्यामुळं नोबेलसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील त्याला खुणावत होता. साकेतला आकाश ठेंगणं झालेलं. त्यांची ऑर्डर आली. त्यांनी त्यांची ऍनिवर्सरी मनापासून सेलिब्रेट केली. मस्तपैकी पार्टी केली. हे पोर्टल साकेतच्या आयुष्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार होतं. पिझ्झा खात खात त्यांनी आपल्या भविष्यावर चर्चा केली.
"मैथिली मी काय म्हणतो हे पेटंट वगैरे सगळं होईलच. मला असं वाटतंय आता अजून स्टॅबिलिटी हवीये आयुष्यात."
"म्हणजे?"
"मला असं वाटतंय की, पोर्टलच्या मागं असताना जरा तुझ्याकडं दुर्लक्ष झालं माझं. ना तुला धड कुठे डेट वर नेलं, ना कुठं फिरायला नेलं. आता पुढचं वर्षभर दोघांनी सोबत जरा मजा करूया."
"तितकं चालतं रे साकेत. मी कधी तक्रार केली अशी तुझ्याकडं?"
"तू नाहीच करणार तक्रार. तेवढं कळतंच मला आता. या वर्षी आपलं नवीन घर तर झालंच आहे. मला असं वाटतंय की, या वर्षी जरा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून येऊन मग आपण बेबी प्लॅनिंग करूया."
"साकेत! मी आत्ता तयार आहे याला. मला लहान बाळं खूपच आवडतात. स्वतःचं बाळ कधी एकदा होतंय असं झालंय मला. एक वर्ष आपण फिरायला वगैरे न जात बेबी प्लॅन केलेलं पण चालेल मला."
"बरं. बरं. तू म्हणशील तसं. पण मला जरा फिरायचंय. हे पोर्टलचं झाल्यावर जरा मोठ्ठा ब्रेक पाहिजे मला कामापासून."
मग सगळं काही ठरवत त्यांनी मस्तपैकी आपल्या डिनरचा आस्वाद घेतला. डिनरनंतर त्यांनी मस्तपैकी डेझर्टचा आस्वाद घेतला. २५ नोव्हेंबरची ही रात्र दोघांच्या आयुष्यात नवी पहाटच घेऊन आलेली.
बिल देऊन दोघे बाहेर निघणार इतक्यात त्यांना हॉटेलमध्ये गदारोळ जाणवला. काही कळायला मार्ग नव्हता. ताजचं मेन गेटपण बंद झालेलं. त्यांना सगळं काही लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला. दहशतवाद्यांनी संपूर्ण हॉटेलचा ताबा घेतला होता. बाहेर जायचे सगळे मार्ग बंद झालेले. दोघांना काहीच सुचेना. ते वाट दिसेल तसे लोकांच्या गर्दीमधून पळू लागले. दहशवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार चालू होता. या गदारोळात प्रचंड धक्काबुक्की झाली. साकेतच्या हातून पोर्टल निसटून कुठंतरी या गर्दीत पडलं आणि हरवून गेलं. आता लगेच बाहेर जायचा काहीच मार्ग त्यांच्याकडे नव्हता. अशातच या अंधाधुंद गोळीबारामध्ये साकेतला नेमक्या जागी गोळी लागली आणि तो मृत्युमुखी पडला. मैथिलीच्या हातात पोर्टल होतं पण, ते कसं वापरायचं याची तिला काहीच कल्पना नव्हती. हातातल्या पोर्टलकडं बघताना तिला असं वाटलं की, हे जे सगळं झालंय ते या पोर्टलमुळंच झालाय. तिनं दुःखातिरेकानं ते पोर्टल लांब फेकून दिलं आणि ती साकेतचा मृतदेह घेऊन लपायला कुठे सेफ जागा मिळते का ते शोधत असतानाच गर्दीचा लोंढा वाढला. या प्रचंड चेंगराचेंगरीमध्ये मैथिलीचाही घुसमटून दुर्दैवी अंत झाला.
नवी पहाट ठरू घातलेली २५ नोव्हेंबरची रात्र मैथिली आणि साकेतसाठी मात्र काळरात्र ठरली. दोघांचाही या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या गदारोळात साकेतचं पोर्टल उद्ध्वस्त झालं होतं. त्याचा शोध यशस्वी ठरून पण आता कधीच जगासमोर येणार नव्हता. त्याने डॉक्यूमेंट्स कुठेही शेअर न केल्यामुळे त्या त्याच्याच लॅपटॉपमध्ये तशाच अक्षत राहणार होत्या. कुणालाही त्या कधीच उपलब्ध होणार नव्हत्या. साकेतनं मनुष्याच्या कल्पनेच्या मर्यादा ओलांडत एक अशक्यप्राय शोध लावला होता, पोर्टींगचा पहिला यशस्वी प्रयोग झाला होता, पण आता कुणालाच याची बातमी मिळणार नव्हती. जे नाव नोबेलच्या ऑनर बोर्डवर झळकणार होतं, तेच नाव आता दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या यादीत जाणार होतं. एका महान शोधाला आणि कर्तबगार तरुणाला हे जग कायमचं मुकलं होतं.
©श्रेयस जोशी
👍 Nice
ReplyDelete