साकेतची गोष्ट । Interactive story । Interactive Marathi story
नमस्कार. ही साकेतची एक ‘इंटरॅक्टिव्ह एक्सपेरियन्स’ गोष्ट आहे. साकेतच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुमच्या निर्णयावर ठरणार आहेत. प्रत्येक भागाच्या शेवटी तुम्हाला साकेतच्या आयुष्यात पुढं काय व्हायला हवं हे ठरवण्यासाठी दोन पर्याय आहेत. तुम्हाला जो योग्य वाटतो तो पर्याय तुम्ही निवडायचा आणि साकेतचं आयुष्य पुढं न्यायचं. साकेतचं सगळं भविष्य तुमच्या निवडलेल्या पर्यायावर अवलंबून आहे. तेव्हा विचार करून प्रत्येक भागाच्या शेवटी तुम्हाला ‘योग्य’ वाटणाऱ्या निळ्या रंगातील पर्यायावर क्लिक करून साकेतचं भविष्य घडवा! साकेतसाठी सध्या तुम्हीच ‘देव’ आहात कारण, त्याच्या आयुष्यातल्या इथून पुढच्या गोष्टी तुम्हीच ठरवणार आहात.
नुकतंच साकेतनं ‘Brief history of time’ वाचून हातावेगळं केलं. तसा साकेत लहानपणापासूनच हुशार. हल्ली सगळेच करतात म्हणून त्यानं इंजिनीरिंग नाही निवडलं. खरं तर त्याला लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रयोगांची आवड होती. अभ्यासासोबत प्रॅक्टिकल शिकण्यावर त्याचा भर होता. पुस्तक वाचल्यावर त्याचं आणि बाबांचं बोलणं चालू होतं.
"बाबा , भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये तुमची मेमरी स्ट्रॉंग असेल तर उत्तम मार्क पडतात, पण ते शिक्षणानंतर व्यवसाय किंवा नोकरी करायला अजिबात उपयोगी नसतात."
"पण, जर चांगले मार्क मिळालेच नाहीत, तर चांगलं कॉलेज मिळेलच कसं? आणि जर चांगलं कॉलेज नसेल तर पुढं जॉब पण चांगला नाहीच मिळणार." इति बाबा.
"बाबा, मला फार काळ जॉब वगैरे नाही करायचाय. मला फिजिक्समध्ये काहीतरी नवीन शोध लावायचाय. आत्ताच मी हे 'Brief History' वाचलं. टाईम ट्रॅव्हल, बिग बॅंग, क्वांटम मेकॅनिक्स वगैरेंच्या चांगल्या कन्सेप्ट्स आहेत यात. टाईम ट्रॅव्हल आणि पोर्टींगमध्ये मला आधीपासूनच आवड आहे. हे पुस्तक वाचून मला या कंसेप्ट्स क्लीअर झाल्यात. मला पोर्टींगमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट आलाय. त्याच क्षेत्रात मी काहीतरी करेन."
"अरे पण त्यासाठी आर्थिक पाठबळ लागेल आपल्याला. अर्थात मी आहेच. पण जर नवीन शोध वगैरे असेल, तर अधिकचं पाठबळ लागतंच आजकाल."
"तो भार मी कुणावरच टाकणार नाही. आत्ता लास्ट ईयर चालूच होईल. कॅम्पस पण चालू होतील आता. मला शक्यतो गूगलच पाहिजे. जेणेकरून नवीन काम शिकता शिकता मला स्वतःच्या पोर्टींगच्या आयडियावर पण काम करता येईल. गुगलमध्ये जर पहिल्याच प्रयत्नात मला जॉब मिळाला तर माझ्यासाठी ड्रीम कम ट्रू मोमेन्ट असेल ती!"
"नक्कीच. कॅम्पस साठी तुला ऑल द बेस्ट! आणि परत तेच सांगतोय, तुला कसलीही मदत लागली तरी आम्ही आहोतच हे लक्षात ठेव."
साकेतचं आईबाबांवर खूप प्रेम होतं. त्यात तो एकुलता एक असल्यामुळे दोघांची जबाबदारी साहजिकच त्याचीच होती. बाबांना दोन वर्षांपूर्वी कँसर डिटेक्ट झालेला. सुरुवातीच्या स्टेजलाच डिटेक्ट झाल्यामुळं ट्रीटमेंट व्यवस्थित झालेली. अर्थात केमोदरम्यान त्यांना झालेला त्रास बघून साकेत त्यांच्याविषयी अधिकच हळवा झालेला. ट्रीटमेंट अजूनही चालूच होती, त्यामुळं त्यानं कॅम्पस दरम्यान एखाद्या कंपनीची विदेशातली ऑफर मिळाली तर नाकारायचं ठरवलेलं. त्याला बाबा पूर्ण बरे होईपर्यंत सोबतच राहायचं होतं.
प्रत्येक गोष्टीविषयी बोलताना तार्किक मुद्दे मांडायचा साकेतचा प्रयत्न असायचा. काहीही नवीन गोष्ट समजली तर तेवढ्यावरच न थांबता त्याविषयी प्रयोग करून किंवा त्याबद्दल अधिक माहिती वाचून आपल्या ज्ञानात भर टाकायचा त्याचा प्रयत्न असायचा. त्याचा हाच चौकस स्वभाव त्याला आयुष्यात अधिकाधिक यशस्वी होण्यात मदत करत गेला. साकेतच्या हुशारीवर त्यानं IIT मधून शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलं. त्याला लगेच बिझनेस मध्ये उतरायचंच नव्हतं. त्याला नोकरीचा अनुभव घ्यायचा होता. कॉर्पोरेट दुनियेशी थोडं मिळवून घ्यायचं होत. देशात किंवा विदेशात स्वतःची प्रॉपर्टी घ्यायची होती आणि मगच नोकरी सोडून फ्रीलान्सिंग चालू करायचं होतं. याच कारणासाठी तो कॅम्पस दरम्यान वेगवेगळ्या प्रथितयश कंपन्यांचे इंटरव्ह्यू देत होता. होता होता त्याला गूगलची खूप तगडी ऑफर मिळाली पण, त्यांची अट होती की त्याला लगेच ऑन साईट शिफ्ट व्हावं लागेल. त्यानं इंटरव्ह्यू दरम्यानच सांगितलं होतं की, त्याला बाहेरून काम करायला सध्या जमणार नाही कारण त्याच्या बाबांची कॅन्सरची लॉंग टर्म ट्रीटमेंट चालू होती. एकुलता एक असल्यामुळं त्याला किमान दोन वर्षं तरी घरी थांबणं भाग होतं. त्याला कळत नव्हतं की आता यांना कन्व्हिन्स कसं करावं. त्यानं त्याच्या परीनं HR ला घराची सध्याची परिस्थिती समजावून सांगितली. त्याच्या नशिबानं त्याची हुशारी आणि तत्परता बघून गूगलनं त्याची शिफ्ट होण्याची अट तात्पुरती मागं घेतली पण, त्याचं पॅकेज त्यामानानं कमी केलं. साकेतनं विचार केला की, पहिल्याच प्रयत्नात आपल्याला ड्रीम जॉब मिळतोय तर पॅकेज मध्ये थोडं उन्नीस बीस चालेल. त्यानं गूगलला त्वरित होकार दिला.
शिक्षण संपलं आणि त्याचा गूगल मधला ड्रीम जॉब चालू झाला. सुरुवातीलाच त्याला डेव्हलपमेंट मध्ये काम करायची संधी मिळाली! IT मध्ये पहिल्याच प्रयत्नात डेव्हलपमेंट जॉब म्हणजे जणू स्वर्गच. ह्या बातमीसोबतच साकेत पेढे घेऊनच घरी आला.
"आई बाबा, हे घ्या पेढे."
"अरे जॉब चालू होऊन तर दोन आठवडे होऊन गेले. आता कसले पेढे आणि परत?"
"अगं आई, मला डेव्हलपमेंट जॉब मिळाला. पहिलाच प्रोजेक्ट गूगलमधला आणि तो पण डेव्हलपमेंटचा!"
"पण जॉब करायचाय तर कुठल्या ना कुठल्या प्रोजेक्ट वर काम करावंच लागेल ना?"
"अहो बाबा, फ्रेशरला डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मिळणं सोप्पं नसतं. डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने शिकायला तर मिळतंच, पण वेळेचं बंधन अजिबात नसतं. तुम्ही हवं तेव्हा लॉगिन करू शकता, हवं तेव्हा लॉगआऊट."
"वा! हे बरं झालं. म्हणजे लॉगिन लॉगऑऊटची झंझट नसेल. मग काय आता दर महिन्याला नवीन पुस्तकं घरात येणार का काय?"
"बरोबर बोललात. वर अजून पीव्हीआर, सिनेपोलिसवाल्यांची पण चंगळ होईल!"
"काय ओ आई बाबा. तुम्हाला माझ्या पुस्तकांचा आणि सिनेमा बघायचा इतका त्रास आहे का?"
डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये साहजिकच तुम्हाला कामासोबत तुमचे छंद, आवडीनिवडी जोपासता येतात. साकेत पहिलाच प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मिळाल्यामुळं अतिशय खूश झालेला. त्याला वाचनाची प्रचंड आवड. जे हातात येईल ते तो वाचायचा. वाचण्याबद्दल त्याची काहीच रेस्ट्रिक्शन्स नव्हती की, हेच वाचायचं तेच वाचायचं असं. आत्मचरित्र, कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह, ललित लेखन, सामाजिक, नाटक सगळं वाचायला त्याला आवडायचं. सोबत त्याला सिनेमाचीपण प्रचंड आवड. वाचायला भाषेच्या मर्यादा होत्या म्हणजे, हिंदी, मराठी किंवा इंग्रजी. पण सिनेमामध्ये सबटायटल्स मुळं भाषेच्याही मर्यादा नव्हत्या. अगदी मल्याळम पासून आसामीज पर्यंत, फ्रेंच पासून कोरियन पर्यंत सगळे सिनेमे तो प्रचंड आवडीनं बघायचा. यामुळं त्याला जगभरातल्या जगण्याच्या पद्धतींपासून वेगवेगळ्या समाजांच्या रितीरिवाजापर्यंत सगळं समजत गेलं. त्याला पुस्तकांच्या आणि सिनेमाच्या दुनियेत रममाण व्हायला प्रचंड आवडायचं. डेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट मुळं त्याला त्याचे छंद जोपासायलाही मदत होणार होती.
साकेतचा जॉब चालू झाला. तो हळू हळू कंपनी मध्ये रूळायलाही लागला. आठवड्यातून तीन दिवस ऑफीस कंपलसरी असल्यामुळं अगदीच शंभर टक्के तो घरी बसून नव्हता. त्यामुळं त्याची वेगवेगळ्या लोकांशी ओळख होऊ लागली. कॉर्पोरेट कल्चर मध्ये तो मस्तपैकी फिट होत गेला. त्याला आवड असल्यामुळं तो fun friday वगैरे सारख्या एम्प्लॉयी एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज मध्ये HR लोकांना मदतही करायचा. यामुळं त्याला त्याचं फील्ड सोडून बाकी लोकांचीही ओळख व्हायला मदत झाली.
"बाबा, उद्या घरी यायला उशीर होईल. तुमच्या उद्याच्या अपॉइंटमेंटला एक दिवस आईला घेऊन जा. पुढच्या अपॉइंटमेंटला येईन मी."
"का रे? अचानक काय ओव्हरटाईम आला का काय?"
"नाही ओ. ते परवा कंपनीमध्ये एक इव्हेंट ऑर्गनाईझ करायचाय. त्यासाठी HR लोकांनी मला आयडियाज डिस्कस करायला बोलावलंय. सोबत क्लायंटचं एक बिलिंग रिलेटेड सोल्युशन मला मिळालंय. ते मॅनेजरनं मला वर्किंग अवर्सनंतर एक्सप्लेन करायला सांगितलंय."
"वा वा! पण सोल्युशन तुला मिळालंय तर तूच पोहचव क्लायंटपर्यंत. मॅनेजरला नको त्याचं क्रेडिट मिळायला."
"ऑफ कोर्स बाबा. IT चा हा थंब रुल आहे. भले काम कमी करा, पण केलेलं काम खूप मोठं करून दाखवा. जेणेकरून लोकांना वाटेल की, खूपच कष्टाळू आहे हा! चला येतो मी."
हुशारी आणि हरहुन्नरी स्वभावामुळं ऑफिस मिटींग्स पासून ऑफिस पार्टीज पर्यंत साकेत कंपनीमधला एक महत्त्वाची व्यक्ती ठरू लागला. तो गूगल मध्ये हळू हळू स्थिरस्थावर झाला. मुलगा स्थिरस्थावर होतोय म्हटल्यावर सगळ्यांसारखीच त्याच्या घरच्यांनी पण त्याच्यामागं ‘आता जॉब चांगला मिळालाय. स्टेबल झालायस. आता लवकर लग्नाचा विचार कर’ अशी भूणभूण चालू केली.
तुम्हाला साकेतनं काय करावंसं वाटतंय? त्यानं घरच्यांचं ऐकून लग्नाचा विचार करायला हवा का करिअर वर अजून फोकस करून स्वतःच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करावं?
साकेतनं आईबाबांच्या म्हणण्यानुसार खरंच लग्नाचा विचार करावा <- (क्लिक करा).
साकेतनं करिअर वर अधिक फोकस करावा, म्हणून त्यानं आईबाबांना स्पष्ट नकार द्यावा <- (क्लिक करा).
©श्रेयस जोशी
Carrier sathi thode divas थांबावे लग्नाची घाई करू नये
ReplyDeleteतुम्ही दुसरा पर्याय निवडून साकेतसोबत पुढं काय झालं ते नक्की जाणून घ्या !
Delete