तुम्हाला हवंय की टेस्टिंग फसलं
(सूचना: जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इंटरॅक्टिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा.)
(आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.)
साकेतनं त्याचं आणि मैथिलीचं पोर्टल दोघांच्या मोबाईलमधल्या मॅप्सला लिंक केलं.
"मैथिली आत ये आता."
"झालं का तुझं सगळं नक्की? मागचा अर्धा तास मला बाहेर थांबवून ठेवलंयस."
"झालं माझं डेकोरेशन. ये आता."
मैथिली आत आली. त्यानं पोर्टल तिच्या हातात दिलं आणि म्हणाला, "हॅप्पी ऍनिव्हर्सरी!" मैथिलीला काहीच कळेना. तिला आजूबाजूला नेहमीसारखीच रूम दिसत होती. "हॅप्पी ऍनिव्हर्सरी, साकेत. मी अर्धा तास बाहेर होते. मला वाटलं बरंच काही डेकोरेशन असेल. इथं ना फुगे आहेत, ना फुलं." त्यानं तिला शांतपणे आपण काय करतोय ते बघायला सांगितलं. मग तिच्या आणि स्वतःच्या मोबाईलच्या गूगल मॅप्समध्ये ताजचा स्ट्रीट व्ह्यू सिलेक्ट केला. स्ट्रीट व्ह्यूद्वारे फिरत फिरत ते कॉरिडॉरमध्ये पोहचले आणि पोर्ट बटण दाबलं. आपल्या रूममधून ते तत्क्षणी ताजच्या कॉरिडॉरमध्ये चक्क ‘पोर्ट’ झाले. मागच्या सेकंदाला ते आपल्या रूममध्ये होते आणि या सेकंदाला चक्क ताजमध्ये! साकेतचा आनंद गगनात मावेना.
"साकेत! पोर्टींग?"
"येस!"
"थेट ताजमध्ये! साकेत आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण आलोय ते पण विना सिक्युरिटी चेक्सचं. म्हणजे मला खूप आनंद झालाय की, इतके दिवस ज्याच्यासाठी तू झपाटून काम करतोयस ते आज प्रत्यक्षात येतंय. पण मला भीती वाटतीये कोणी आपल्याला विदाऊट सिक्युरिटी चेक्स आत आलोय हे कळलं तर आपल्याला पकडतील आणि पोलिसांकडं देतील."
"शांत. मैथिली शांत. आधी इथं ये. बस टेबलवर. हे बघ गूगलचं परमिशन लेटर आहे. जेव्हा केव्हा हे फीचर टेस्ट करेन, तेव्हा त्या टेस्टिंग पुरतं मला सगळं माफ आहे. ते सगळं सोड. काय खायचंय तुला सांग."
"साकेत! खूपच कमाल सरप्राईज आहे हे माझ्यासाठी. मला खूप आवडलंय. आपल्या ऍनिव्हर्सरीपेक्षापण तुझ्यासाठी हा दिवस खूप मोठा आहे. Heartiest Congratulations! तुला जे हवं ते मागव."
"थँक्स माय डियर! मल्टिग्रेन पिझ्झा बियांका विथ एक्सट्रा चीज?"
"डन. सोबत फॉरेस्ट फायर मॉकटेल."
त्यांनी मल्टिग्रेन पिझ्झा बियांकासोबत फॉरेस्ट फायर मॉकटेलची ऑर्डर दिली. साकेत प्रचंड आनंदी झाला होता, त्याचा आनंद बघून मैथिलीपण खूप खुश झाली. इतके दिवस साकेतनं जे स्वप्न बघितलेलं ते आज सत्यात उतरत होतं.
"साकेत याचं पेटंट तर तुला मिळेलच, नाही?"
"पेटंट वगैरे मिळेलंच. पण पुढच्या वर्षीच्या फिजिक्सच्या नोबेलसाठीसुद्धा ह्याचा विचार करतील."
"वा! मग आता मी एका प्रख्यात सेलेब्रिटीची बायको म्हणून मिरवेन!
आता साकेतला या शोधाचं पेटंट तर मिळणार होतंच पण, पहिल्यांदाच कोणीतरी असा प्रयोग सक्केसफुल केल्यामुळं नोबेलसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील त्याला खुणावत होता. साकेतला आकाश ठेंगणं झालेलं. त्यांची ऑर्डर आली. त्यांनी त्यांची ऍनिवर्सरी मनापासून सेलिब्रेट केली. मस्तपैकी पार्टी केली. हे पोर्टल साकेतच्या आयुष्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जाणार होतं. पिझ्झा खात खात त्यांनी आपल्या भविष्यावर चर्चा केली.
"मैथिली मी काय म्हणतो हे पेटंट वगैरे सगळं होईलच. मला असं वाटतंय आता अजून स्टॅबिलिटी हवीये आयुष्यात."
"म्हणजे?"
"मला असं वाटतंय की, पोर्टलच्या मागं असताना जरा तुझ्याकडं दुर्लक्ष झालं माझं. ना तुला धड कुठे डेट वर नेलं, ना कुठं फिरायला नेलं. आता पुढचं वर्षभर दोघांनी सोबत जरा मजा करूया."
"तितकं चालतं रे साकेत. मी कधी तक्रार केली अशी तुझ्याकडं?"
"तू नाहीच करणार तक्रार. तेवढं कळतंच मला आता. या वर्षी आपलं नवीन घर तर झालंच आहे. मला असं वाटतंय की, या वर्षी जरा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून येऊन मग आपण बेबी प्लॅनिंग करूया."
"साकेत! मी आत्ता तयार आहे याला. मला लहान बाळं खूपच आवडतात. स्वतःचं बाळ कधी एकदा होतंय असं झालंय मला. एक वर्ष आपण फिरायला वगैरे न जात बेबी प्लॅन केलेलं पण चालेल मला."
"बरं. बरं. तू म्हणशील तसं. पण मला जरा फिरायचंय. हे पोर्टलचं झाल्यावर जरा मोठ्ठा ब्रेक पाहिजे मला कामापासून."
मग सगळं काही ठरवत त्यांनी मस्तपैकी आपल्या डिनरचा आस्वाद घेतला. डिनरनंतर त्यांनी मस्तपैकी डेझर्टचा आस्वाद घेतला. २५ नोव्हेंबरची ही रात्र दोघांच्या आयुष्यात नवी पहाटच घेऊन आलेली.
बिल देऊन ते बाहेर आले, तर समोर त्यांना गेट वे ऑफ इंडिया दिसलंच नाही.
"साकेत, आपण याच कॉरिडॉर मधून आत गेलो ना?"
"हो तर."
"गेट वे ऑफ इंडिया का दिसेना? आपण दुसऱ्या बाजूने नाही ना बाहेर आलो?"
"नाही तर. हे काय मागं हेच आहे ताज. इथूनच हा लाल घुमट दिसतो बाहेरून."
"काहीतरी गडबड वाटतीये मैथिली. आपण टॅक्सी करून घरी जाऊया सगळ्यात आधी."
काय गडबड होतीये त्यांना कळेना. जास्त विचार न करता त्यांनी सरळ आपल्या घरचा रस्ता पकडला. ट्रिप पूर्ण होईपर्यंत कॅबवाला त्यांच्याकडं विचित्र नजरेनं बघत होता. त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. कॅबमधून दोघे उतरले तर साकेतच्या घराची ती बिल्डिंग नव्हतीच.
"साकेत आपण बरोबर आलोय ना?"
"इतकी वर्षं मी या एरियामध्ये राहतोय. कसं काय चुकेल इतकं? आपण एक काम करू. याच समोरच्या बिल्डिंगमध्ये जाऊ."
त्यांचा प्रचंड गोंधळ उडालेला. तरीपण समोरच्या बिल्डिंगमध्ये आपल्या घराच्या मजल्यावर जात त्यांनी घराची बेल वाजवली. कुठल्यातरी अनोळखी माणसानेच दार उघडलं. साकेत अतिशय गोंधळला. तो काही बोलणार इतक्यात समोरच्या माणसाने इतक्या बेरात्री घराची बेल वाजवून झोपमोड केल्याबद्दल दोघांना शिव्यांची लाखोली वाहिली आणि हाकलून दिलं. तिथून बाहेर येत शांतपणे विचार करायला ते समुद्र किनाऱ्यावर आले. तिथं बसून विचार करताना साकेतच्या डोक्यात यू ट्यूब वरची ‘ओम्लेट्टो’ चॅनेलची फिल्म घुमू लागली.
"मैथिली, माझं काहीतरी चुकतंय."
"म्हणजे?"
"मी ‘ओम्लेट्टो’ चॅनेलवर एक शॉर्ट फिल्म बघितलेली. त्यात असं होतं की, हिरोकडे एक कॉम्पुटर माउसच्या आकाराचं पोर्टल असतं. ते वापरून तो हिरोईनला प्रपोज करत असतो. प्रपोज केल्यावर हिरोईनने जर नकार दिला तर, तो पोर्टल वरचं बटण दाबून परत हिरोईनसमोर नव्याने प्रकट होत असतो. शेवटी एकदाची ती होकार देते."
"याचा आणि 'आपलं काहीतरी चुकतंय' चा काय संबंध?"
"मैथिली, त्या शॉर्ट फिल्ममध्ये गोम अशी होती की, हिरोने जितक्या वेळा ते पोर्टल वापरलं तितक्या वेळा तो एका युनिव्हर्स मधून दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये पोर्ट झालेला असतो. सदतिसाव्या युनिव्हर्समध्ये हिरोईन त्याला होकार देते. पण यामुळे मागच्या छत्तीस युनिव्हर्समध्ये तो मरण पावलेला असतो."
"आपण बोलतोय म्हणजे नक्कीच जिवंत आहोत साकेत. तुझं फिक्शन तुझ्यापाशी ठेव. फिक्शनला खऱ्याशी नको जोडूस. आणि मला लवकरात लवकर घरी घेऊन चल. हे जे काही चाललंय ते माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे."
"थांब. आपण काम करू. पुन्हा एकदा स्ट्रीट व्ह्यू मध्ये आपल्या घराचं लोकेशन टाकतो. आपण परत तिथंच पोहचतो का बघूया."
साकेतने स्ट्रीट व्ह्यू मध्ये आपलं घराचं लोकेशन सर्च करून पोर्टल फीचर वापरायचा प्रयत्न केला. पण काहीच झालं नाही. नक्कीच काहीतरी विपरीत झालं होतं.
"साकेत काहीच होत नाहीये. हे पोर्टल कामच करत नाहीये. मला तर हे नाही वापरता येत पण, मला असं वाटायला लागलंय की, काहीतरी चुकीचं घडतंय. मला हे सगळं छान नाही वाटत आहे."
"मैथिली, मला असं वाटतंय की, बहुतेक आपला डिमेन्शस रिलेटेड काहीतरी चेक मिस झालाय. आपण पोर्ट तर झालोय, पण डिमेन्शनचा कुठलातरी चेक मिस झाल्यामुळं वेगळ्याच जगात पोहचलोय. आपले लॅपटॉप्सपण घरीच राहिलेत, आता घरी गेल्याशिवाय आपण हे चेकच नाही करू शकत."
"साकेत, मला हे काहीही कळत नाही. तू आधी आपल्याला घरी घेऊन चल."
खरंच टेस्टिंगच्या आधी डिमेन्शन्स रिलेटेड कुठलातरी चेक राहून गेला होता. त्यामुळं पोर्ट होताना ते स्वतःच्या दुनियेत न राहता एका वेगळ्याच जगात अवतरले होते. आता या वाटण्या - न वाटण्याला काहीच अर्थ नव्हता. ते कधीच घरी पोहचू शकणार नव्हते आणि साकेत कधीच चेक करू शकणार नव्हता की नक्की कुठला डिमेंशन रिलेटेड चेक मिस झाला होता. हे ना धड पोर्टींग नव्हतं, ना टाईम ट्रॅव्हल. दोघं कुठंतरी मधेच अडकले होते. या नव्या दुनियेत ना त्यांना कोणी वाली होता, ना त्यांचं नेहमीचं जीवन होतं, ना कोणी ओळखीचं होतं, ना त्यांचं पोर्टल ऍप-ऍप जाऊ दे, त्यांचा मोबाईलच बिनकामाचा होता. यातून कुठलाच सुटकेचा मार्ग नव्हता. साकेत आणि मैथिली आता पूर्णतः या नव्या दुनियेत सदेह अडकले होते.
त्यांचा शोध यशस्वी ठरला नव्हता. आता कधीच दोघे जगासमोर येणार नव्हते. त्यांच्याशी त्यांचे आप्त, त्यांचे कलीग, त्यांचे मित्र कधीच संपर्क साधू शकणार नव्हते. साकेतने डॉक्यूमेंट्स कुठेही शेअर न केल्यामुळे त्या त्यांच्याच लॅपटॉपमध्ये तशाच अक्षत राहणार होत्या. कुणालाही त्या कधीच उपलब्ध होणार नव्हत्या. साकेतनं मनुष्याच्या कल्पनेच्या मर्यादा ओलांडत एक अशक्यप्राय शोध लावायचा प्रयत्न केला होता. हा पोर्टींगचा पहिला यशस्वी प्रयोग ठरू शकला असता, पण कुठल्यातरी छोट्याशा त्रुटीमुळे काहीतरी विपरीत झालं होतं. आता कुणालाच त्यांची खबरबात मिळणार नव्हती. जो अभिमानानं नोबेल स्वीकारायची स्वप्नं बघत होता, तोच आता त्याच्या दुनियेतून आपल्या बायकोसोबत कुठलाही मागमूस न ठेवता गायब झाला होता. एका महान शोधाला आणि कर्तबगार तरुणाला हे जग कायमचं मुकलं होतं.
©श्रेयस जोशी
Comments
Post a Comment