तुम्हाला हवंय की टेस्टिंग यशस्वी झालं
(सूचना: जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इंटरॅक्टिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा.)
(आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.)
अरविंद आणि साकेतनं आपापलं पोर्टल मोबाईलमधल्या मॅप्सला लिंक केलं. ताजचा स्ट्रीट व्ह्यू सिलेक्ट केला. स्ट्रीट व्ह्यूद्वारे फिरत फिरत ते कॉरिडॉरमध्ये पोहचले आणि पोर्ट बटण दाबलं. आपल्या रूममधून ते तत्क्षणी ताजच्या कॉरिडॉरमध्ये चक्क ‘पोर्ट’ झाले. मागच्या सेकंदाला ते आपल्या रूममध्ये होते आणि या सेकंदाला चक्क ताजमध्ये! त्यांचा आनंद गगनात मावेना. त्वरित ते एका टेबलवर बसले.
"काय कमाल वाटतंय!"
"हो ना राव. आजपर्यंत पोर्टिंग वगैरे सगळं स्वप्नंच वाटत होतं. आज आपण एका क्षणात घरातून ताजमध्ये येऊन बसलोय. ना ट्रॅफिकची झंझट, ना हॉर्नचा त्रास."
"रिलॅक्स वाटतंय आता. इतके दिवस नुसतं हात धुवून मागं लागलेलो पोर्टींग फीचरच्या. आज प्रत्यक्षात आलंय."
"लेट्स सेलिब्रेट! काय ऑर्डर करायचं बोल."
"मल्टिग्रेन पिझ्झा बियांका विथ एक्सट्रा चीज."
"आणि फॉरेस्ट फायर मॉकटेल,"
त्यांनी ऑर्डर दिली. त्यांना एकमेकांशी पुढं बोलायला शब्द सुचेनात. इतके दिवस त्यांनी जे स्वप्न बघितलेलं ते आज सत्यात उतरत होतं. आता त्यांना या शोधाचं पेटंट तर मिळणार होतंच पण, पहिल्यांदाच कोणीतरी असा प्रयोग सक्सेसफुल केल्यामुळं नोबेलसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील त्यांना खुणावत होता. दोघांना आकाश ठेंगणं झालेलं.
त्यांची ऑर्डर आली. त्यांनी हा दिवस त्यांच्या पद्धतीनं सेलिब्रेट केला. मस्तपैकी पार्टी केली.
"आपण याचं पेटंट घ्यायचंच. पण सोबत आपल्याला स्वतंत्रपणे डेव्हलप करायला जो काही खर्च केलाय ती पण भरपाई गूगल कडून घेऊया."
"मलाही तेच वाटतंय. गूगल जॉईन करूया परत. त्या कमिटीच्या नाकावर टिच्चून. त्यांना पण कळलं असेल आता की, हा साकेत काय चीज आहे."
"आपण या फीचरचं गूगल मॅप्ससोबत मर्जींग करताना त्याचा गुगलकडून एक्सट्रा ‘मोबदला’ घेऊया. त्यांना पण गरज आहे. आपली कुठलीही मागणी मान्य करून आपल्याला परत घेतील ते!"
"२ ५ नोव्हेंबर! आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. कॉलेजपासून या पोर्टींगच्या मी मागं लागलेलो. आज माझं सगळ्यात मोठ्ठं स्वप्न पूर्ण झालंय. आता आई बाबांना पण सांगून टाकतो बघा मुली तुमच्या पद्धतीनं. लग्न करायला आता तयार आहे मी."
"आजच घरी जाऊन सांग त्यांना. दुहेरी आनंद होईल त्यांना. स्वतःच्या मुलानं काहीतरी जगावेगळं करून दाखवलंय याचा प्रचंड अभिमान वाटेल त्यांना."
"यात तुझाही मोलाचा वाटा आहे. मी फक्त आयडिया सांगितलेली. सुरुवातीच्या डेव्हलपमेंट पासून तू सोबत आहेस. जे काही आहे ते दोघांचं आहे."
"असंच सोबत नवीन नवीन शोध लावत राहू आणि वेगवेगळी पेटंट घेत राहू. चल बराच वेळ झाला, आता निघूया."
"अरविंद, यांना काय झालं अचानक? आरडाओरडा कसला चालू आहे इथं?"
बिल देऊन दोघे बाहेर निघणार इतक्यात त्यांना हॉटेलमध्ये गदारोळ जाणवला. काही कळायला मार्ग नव्हता. ताजचं मेन गेटपण बंद झालेलं. त्यांना सगळं काही लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला. दहशतवाद्यांनी संपूर्ण हॉटेलचा ताबा घेतला होता. बाहेर जायचे सगळे मार्ग बंद झालेले. दोघांना काहीच सुचेना. ते वाट दिसेल तसे लोकांच्या गर्दीमधून पळू लागले. दहशवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार चालू होता. या गदारोळात प्रचंड धक्काबुक्की झाली. दोघांच्याही हातून पोर्टल निसटून कुठंतरी या गर्दीत पडलं आणि हरवून गेलं. आता लगेच बाहेर जायचा काहीच मार्ग त्यांच्याकडे नव्हता. अशातच या अंधाधुंद गोळीबारामध्ये साकेतला नेमक्या जागी गोळी लागली आणि तो मृत्युमुखी पडला. तशाही स्थितीत अरविंद साकेतचा मृतदेह घेऊन लपायला कुठे सेफ जागा मिळते का शोधत असतानाच गर्दीचा लोंढा वाढला आणि प्रचंड चेंगराचेंगरीमध्ये अरविंदचा घुसमटून मृत्यू झाला.
नवी पहाट ठरू घातलेली २५ नोव्हेंबरची रात्र अरविंद आणि साकेतसाठी मात्र काळरात्र ठरली. दोघांचाही या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या गदारोळात त्यांचं पोर्टल उद्ध्वस्त झालं होतं. त्यांचा शोध यशस्वी ठरून पण आता कधीच जगासमोर येणार नव्हता. त्यांनी डॉक्यूमेंट्स कुठेही शेअर न केल्यामुळे त्या त्यांच्याच लॅपटॉपमध्ये तशाच अक्षत राहणार होत्या. कुणालाही त्या कधीच उपलब्ध होणार नव्हत्या. साकेत आणि अरविंदनं मनुष्याच्या कल्पनेच्या मर्यादा ओलांडत एक अशक्यप्राय शोध लावला होता, पोर्टींगचा पहिला यशस्वी प्रयोग झाला होता, पण आता कुणालाच याची बातमी मिळणार नव्हती. जी नावं नोबेलच्या ऑनर बोर्डवर झळकणार होती, तीच नावं आता दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या यादीत जाणार होती. एका महान शोधाला आणि दोन कर्तबगार तरुणांना हे जग कायमचं मुकलं होतं.
©श्रेयस जोशी
सुंदर, interesting.
ReplyDelete