तुम्हाला हवंय की टेस्टिंग फसलं

            (सूचना:  जर तुम्ही गोष्टीची सुरुवात न वाचता थेट या पानावर आला असाल तर थांबा. ही एक इंटरॅक्टिव्ह एक्सपेरियन्स गोष्ट आहे. ती पहिल्यापासून वाचण्यासाठी कृपया इथं भेट द्या. साकेतची गोष्ट <- क्लिक करा.


(आणि जर तुम्ही तुमचा पर्याय निवडून या पानावर आला असाल तर कृपया आपला

इमर्सिव्ह एक्सपेरियन्स कंटिन्यू करा.)  


अरविंद आणि साकेतनं आपापलं पोर्टल मोबाईलमधल्या मॅप्सला लिंक केलं. ताजचा स्ट्रीट व्ह्यू सिलेक्ट केला. स्ट्रीट व्ह्यूद्वारे फिरत फिरत ते कॉरिडॉरमध्ये पोहचले आणि पोर्ट बटण दाबलं. आपल्या रूममधून ते तत्क्षणी ताजच्या कॉरिडॉरमध्ये चक्क ‘पोर्ट’ झाले. मागच्या सेकंदाला ते आपल्या रूममध्ये होते आणि या सेकंदाला चक्क ताजमध्ये! त्यांचा आनंद गगनात मावेना. त्वरित ते एका टेबलवर बसले.

"काय कमाल वाटतंय!"

"हो ना राव. आजपर्यंत पोर्टिंग वगैरे सगळं स्वप्नंच वाटत होतं. आज आपण एका क्षणात घरातून ताजमध्ये येऊन बसलोय. ना ट्रॅफिकची झंझट, ना हॉर्नचा त्रास."

"रिलॅक्स वाटतंय आता. इतके दिवस नुसतं हात धुवून मागं लागलेलो पोर्टींग फीचरच्या. आज प्रत्यक्षात आलंय."

"लेट्स सेलिब्रेट! काय ऑर्डर करायचं बोल."

"मल्टिग्रेन पिझ्झा बियांका विथ एक्सट्रा चीज."

"आणि फॉरेस्ट फायर मॉकटेल,"


त्यांनी ऑर्डर दिली. त्यांना एकमेकांशी पुढं बोलायला शब्द सुचेनात. इतके दिवस त्यांनी जे स्वप्न बघितलेलं ते आज सत्यात उतरत होतं. आता त्यांना या शोधाचं पेटंट तर मिळणार होतंच पण, पहिल्यांदाच कोणीतरी असा प्रयोग सक्सेसफुल केल्यामुळं नोबेलसारख्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील त्यांना खुणावत होता. दोघांना आकाश ठेंगणं झालेलं. 


त्यांची ऑर्डर आली. त्यांनी हा दिवस त्यांच्या पद्धतीनं सेलिब्रेट केला. मस्तपैकी पार्टी केली.

"आपण याचं पेटंट घ्यायचंच. पण सोबत आपल्याला स्वतंत्रपणे डेव्हलप करायला जो काही खर्च केलाय ती पण भरपाई गूगल कडून घेऊया."

"मलाही तेच वाटतंय. गूगल जॉईन करूया परत. त्या कमिटीच्या नाकावर टिच्चून. त्यांना पण कळलं असेल आता की, हा साकेत काय चीज आहे."

"आपण या फीचरचं गूगल मॅप्ससोबत मर्जींग करताना त्याचा गुगलकडून एक्सट्रा ‘मोबदला’ घेऊया. त्यांना पण गरज आहे. आपली कुठलीही मागणी मान्य करून आपल्याला परत घेतील ते!"

"२ ५ नोव्हेंबर! आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. कॉलेजपासून या पोर्टींगच्या मी मागं लागलेलो. आज माझं सगळ्यात मोठ्ठं स्वप्न पूर्ण झालंय. आता आई बाबांना पण सांगून टाकतो बघा मुली तुमच्या पद्धतीनं. लग्न करायला आता तयार आहे मी."

"आजच घरी जाऊन सांग त्यांना. दुहेरी आनंद होईल त्यांना. स्वतःच्या मुलानं काहीतरी जगावेगळं करून दाखवलंय याचा प्रचंड अभिमान वाटेल त्यांना."

"यात तुझाही मोलाचा वाटा आहे. मी फक्त आयडिया सांगितलेली. सुरुवातीच्या डेव्हलपमेंट पासून तू सोबत आहेस. जे काही आहे ते दोघांचं आहे."

"असंच सोबत नवीन नवीन शोध लावत राहू आणि वेगवेगळी पेटंट घेत राहू. चल बराच वेळ झाला, आता निघूया."


बिल देऊन ते बाहेर आले, तर समोर त्यांना गेट वे ऑफ इंडिया दिसलंच नाही.

"साकेत, आपण याच कॉरिडॉर मधून आत गेलो ना?"

"हो तर."

"गेट वे ऑफ इंडिया का दिसेना? आपण दुसऱ्या बाजूने नाही ना बाहेर आलो?"

"नाही तर. हे काय मागं हेच आहे ताज. इथूनच हा लाल घुमट दिसतो बाहेरून."

"काहीतरी गडबड वाटतीये अरविंद. आपण टॅक्सी करून घरी जाऊया सगळ्यात आधी."


काय गडबड होतीये त्यांना कळेना. जास्त विचार न करता त्यांनी सरळ साकेतच्या घरचा रस्ता पकडला. ट्रिप पूर्ण होईपर्यंत कॅबवाला त्यांच्याकडं विचित्र नजरेनं बघत होता. त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. कॅबमधून दोघे उतरले तर साकेतच्या घराची ती बिल्डिंग नव्हतीच.


"साकेत आपण बरोबर आलोय ना?"

"इतकी वर्षं मी या एरियामध्ये राहतोय. कसं काय चुकेल इतकं? आपण एक काम करू. याच समोरच्या बिल्डिंगमध्ये जाऊ."


त्यांचा प्रचंड गोंधळ उडालेला. तरीपण समोरच्या बिल्डिंगमध्ये साकेतच्या घराच्या मजल्यावर जात त्यांनी घराची बेल वाजवली. कुठल्यातरी अनोळखी माणसानेच दार उघडलं. साकेत अतिशय गोंधळला. तो काही बोलणार इतक्यात समोरच्या माणसाने इतक्या बेरात्री घराची बेल वाजवून झोपमोड केल्याबद्दल दोघांना शिव्यांची लाखोली वाहिली आणि हाकलून दिलं. तिथून बाहेर येत शांतपणे विचार करायला ते समुद्र किनाऱ्यावर आले. तिथं बसून विचार करताना साकेतच्या डोक्यात यू ट्यूब वरची ‘ओम्लेट्टो’ चॅनेलची फिल्म घुमू लागली.


"अरविंद, आपलं काहीतरी चुकतंय."

"म्हणजे?"

"मी ‘ओम्लेट्टो’ चॅनेलवर एक शॉर्ट फिल्म बघितलेली. त्यात असं होतं की, हिरोकडे एक कॉम्पुटर माउसच्या आकाराचं पोर्टल असतं. ते वापरून तो हिरोईनला प्रपोज करत असतो. प्रपोज केल्यावर हिरोईनने जर नकार दिला तर, तो पोर्टल वरचं बटण दाबून परत हिरोईनसमोर नव्याने प्रकट होत असतो. शेवटी एकदाची ती होकार देते."

"याचा आणि 'आपलं काहीतरी चुकतंय' चा काय संबंध?"

"अरविंद, त्या शॉर्ट फिल्ममध्ये गोम अशी होती की, हिरोने जितक्या वेळा ते पोर्टल वापरलं तितक्या वेळा तो एका युनिव्हर्स मधून दुसऱ्या युनिव्हर्स मध्ये पोर्ट झालेला असतो. सदतिसाव्या युनिव्हर्समध्ये हिरोईन त्याला होकार देते. पण यामुळे मागच्या छत्तीस युनिव्हर्समध्ये तो मरण पावलेला असतो."

"आपण बोलतोय म्हणजे नक्कीच जिवंत आहोत साकेत. फिक्शनला खऱ्याशी नको जोडूस."

"थांब. आपण काम करू. पुन्हा एकदा स्ट्रीट व्ह्यू मध्ये माझ्या घराचं लोकेशन टाकतो. आपण परत तिथंच पोहचतो का बघूया."


साकेतने स्ट्रीट व्ह्यू मध्ये आपलं घराचं लोकेशन सर्च करून पोर्टल फीचर वापरायचा प्रयत्न केला. पण काहीच झालं नाही. नक्कीच काहीतरी विपरीत झालं होतं.


"साकेत काहीच होत नाहीये. आपलं पोर्टल कामच करत नाहीये."

"अरविंद, मला असं वाटतंय की, बहुतेक आपला डिमेन्शस रिलेटेड काहीतरी चेक मिस झालाय. आपण पोर्ट तर झालोय, पण डिमेन्शनचा कुठलातरी चेक मिस झाल्यामुळं वेगळ्याच जगात पोहचलोय. आपले लॅपटॉप्सपण घरीच राहिलेत, आता घरी गेल्याशिवाय आपण हे चेकच नाही करू शकत."


खरंच टेस्टिंगच्या आधी डिमेन्शन्स रिलेटेड कुठलातरी चेक राहून गेला होता. त्यामुळं पोर्ट होताना ते स्वतःच्या दुनियेत न राहता एका वेगळ्याच जगात अवतरले होते. आता या वाटण्या - न वाटण्याला काहीच अर्थ नव्हता. ते कधीच घरी पोहचू शकणार नव्हते आणि कधीच चेक करू शकणार नव्हते की नक्की कुठला डिमेंशन रिलेटेड चेक मिस झाला होता. हे ना धड पोर्टींग नव्हतं, ना टाईम ट्रॅव्हल. दोघं कुठंतरी मधेच अडकले होते. या नव्या दुनियेत ना त्यांना कोणी वाली होता, ना त्यांचं नेहमीचं जीवन होतं, ना कोणी ओळखीचं होतं, ना त्यांचं पोर्टल ऍप-ऍप जाऊ दे, त्यांचा मोबाईलच बिनकामाचा होता. यातून कुठलाच सुटकेचा मार्ग नव्हता. साकेत आणि अरविंद आता पूर्णतः या नव्या दुनियेत सदेह अडकले होते. 


त्यांचा शोध यशस्वी ठरला नव्हता. आता कधीच दोघे जगासमोर येणार नव्हते. त्यांच्याशी त्यांचे आप्त, त्यांचे कलीग, त्यांचे मित्र कधीच संपर्क साधू शकणार नव्हते. त्यांनी डॉक्यूमेंट्स कुठेही शेअर न केल्यामुळे त्या त्यांच्याच लॅपटॉपमध्ये तशाच अक्षत राहणार होत्या. कुणालाही त्या कधीच उपलब्ध होणार नव्हत्या. साकेत आणि अरविंदनं मनुष्याच्या कल्पनेच्या मर्यादा ओलांडत एक अशक्यप्राय शोध लावायचा प्रयत्न केला होता. हा पोर्टींगचा पहिला यशस्वी प्रयोग ठरू शकला असता, पण कुठल्यातरी छोट्याशा त्रुटीमुळे काहीतरी विपरीत झालं होतं. आता कुणालाच त्यांची खबरबात मिळणार नव्हती. जे दोघे अभिमानानं नोबेल स्वीकारायची स्वप्नं बघत होते, तेच दोघे त्यांच्या दुनियेतून कुठलाही मागमूस न ठेवता गायब झाले होते. एका महान शोधाला आणि दोन कर्तबगार तरुणांना हे जग कायमचं मुकलं होतं. 


©श्रेयस जोशी

     


Comments

Popular posts from this blog

साकेतची गोष्ट । Interactive story । Interactive Marathi story

तुम्हाला हवंय आईबाबांचं ऐकून लग्न करावं

नातं