...

एक विक्रेता होता. Specifically खेळणीविक्रेता. म्हणजे त्याच्याकडं सगळ्या प्रकारची खेळणी होती. जी लहान मुलांना खूप आवडतात, अशी सगळी खेळणी. या खेळण्यांमध्ये सगळं आलं हां. म्हणजे बघा ती छोटी छोटी घरं, मेकॅनो, लहान लहान गाड्या आणि गुल्लक - ते पैसे ठेवल्यावर कुत्रं बाहेर येऊन पैसे घेऊन आत जातं बघा- तसला गुल्लक वगैरे. आणि हा बाहुल्या पण होत्या हां. सगळ्या एकाच आकाराच्या पण वेगवेगळ्या रंग-रूपाच्या. तर असं सगळं होतं त्या विक्रेत्याकडं. पण त्या विक्रेत्याचा एकच problem होता. त्याच्याकडं दुकान नव्हतं. त्यामुळं त्याला या सगळ्या गोष्टी एका stall वरच विकाव्या लागायच्या. आता stall च असल्यामुळं त्याला रोजच्या रोज रात्री सगळं सामान एका box मध्ये ठेवावं लागायचं. ok? म्हणजे कसं की, रात्र झाली की, stall रिकामा करा, सगळं सामान box मध्ये टाका. Box गोडाऊन मध्ये टाका. घरी जा. परत दुसऱ्या दिवशी सकाळी box गोडाऊनमधनं घ्या. Stall ची साफसफाई करा. सगळं सामान परत मांडा. आणि हां, एक मिनिट. आपल्या विक्रेत्याची stall वर सामान मांडायची पण एक पद्धत होती बरं का! पद्धत म्हणजे त्यानं सगळ्या सामानाचं grouping केलेलं. म्हणजे size नुसार, height नुसार आणि दिसण्यानुसार. दिसण्यानुसार म्हणजे ज्या वस्तू गिऱ्हाईकाच्या नजरेत भरतील त्या अगदी समोर, ज्या ठीकठाक असतील दिसायला त्या मध्ये आणि अगदीच basic दिसणाऱ्या गोष्टी मागे. हां, तर आपण कुठं होतो? हां. सगळं सामान परत मांडा. मग वस्तू विका. रात्र झाली की, सगळ्या वस्तू परत box मध्ये टाका आणि box परत गोडाऊनला टाका. पुढच्या दिवशी repeat. तर असं त्याचं schedule होतं. ok?

ह्या सगळ्यात एक मजा होती. Toy story बघितलाय ना? ok! नसेल बघितला तर थोडक्यात म्हणजे toy story मध्ये खेळण्यांची दुनिया दाखवलीये. सगळी खेळणी जिवंत वगैरे असतात आणि खतरनाक उद्योग करत असतात. तर हां. Toy story सारखंच या stall वरच्या खेळण्यांचं होतं. म्हणजे सगळी खेळणी संध्याकाळनंतर जिवंत व्हायची आणि सूर्योदयापर्यंत त्यांच्यात जान असायची, ती हालचाल करू शकायची. म्हणजे दिवसभर त्यांना आजूबाजूला काय चाललंय ते कळायचं, पण ती हालचाल करू शकत नव्हती. ठीकाय? हां. तर संध्याकाळनंतर त्यांची वेगळीच दुनिया सुरु व्हायची. गोडाऊनमधली. ती काहीही करू शकत होती पण सुर्योदयापर्यंतच. या काळात ती चालू-फिरू शकत होती, खेळू शकत होती. म्हणजे, त्यांच्यामध्ये भावना असायच्या या काळात. जशी आपली दुनिया असते अगदी तशीच दुनिया. फक्त बाहुल्यांची, खेळण्यांची. 

तर हा झाला आपल्या गोष्टीचा premises. ok? तर या ज्या बाहुल्या होत्या ना, त्यातल्याच एका बाहुल्याची गोष्ट आहे ही. तर हा जो बाहुला होता ना, तो याच box मधल्या बाहुल्यांपैकी होता. हां? हा जरा थोडासा introvert type चा होता. Introvert म्हणजे अगदीच एकटा राहणारा नव्हे, introvert म्हणजे, म्हणजे असा proper शब्द सापडेना मला, म्हणजे त्याच्याशी तुम्ही जितकं बोलाल ना, तितकंच तो बोलणार. स्वतःहून कुठला नवीन विषय नाही काढणार तो. ok? तर असा होता हा. पुढच्या reference साठी आपण त्याला ''तो'' असं म्हणूया. हां, तर जेव्हा ही बाहुल्यांची दुनिया सुरु व्हायची ना, तेव्हा सगळी खेळणी मौजमजा करायला लागायची. दंगामस्ती करायची. मस्त जगायची. पण हा अबोल स्वतःच्याच जगात असायचा. कोणी बोललं, तर तेवढ्यापुरतं बोलायचा. कोणी बोलावलं तरी, तेवढ्यापुरतच जाऊन यायचा. सगळ्यांना याचा हा स्वभाव माहित होता. पण, सगळेजण याला आपल्यात सामावून घ्यायचे. सगळ्या गोष्टींमध्ये याला include करून घ्यायचे. तरीही हा थोडासा आपल्याच दुनियेत असायचाच. अरे हो, एक सांगायचं राहिलं. मगाशी म्हटलं नाही का, stall वर सामान लावताना आपला विक्रेता grouping करून गोष्टी ठेवायचा, हां, तर आपला हा ''तो'' सामान्य category तला होता. सामान्य म्हणजे याला विक्रेता अगदी पहिल्या क्षणी नजरेत नाही येणार अशा ठिकाणी ठेवायचा. त्यामुळं त्याचं box-stall मधलं आयुष्य कधी change होईल हे सांगता नाही यायचं. ok? तर, इथपर्यंत सगळं कळलं? हां. आणि एक, 'तो' ला दोन मित्र होते. म्हणजे, अगदी कट्टर, जानी वगैरे नाही. पण, बऱ्यापैकी होते.

तर एक दिवस काय झालं की, आपल्या box मधली सगळी खेळणी, त्यांना गोडाऊनमध्ये टाकल्यावर एका रात्री बाहेर आली. तर त्यांना समोर दुसरा box दिसला. अगदी तसाच. Same to same. ही खेळणी त्या box ला बाहेरून observe करत असतानाच तो box हलायला लागला. Box हलायला लागल्यावर ही खेळणी घाबरली. दूर जाऊन एकत्र थांबली.  पण, या समोरच्या box मधून पण बाहुल्याच बाहेर आल्या. सगळीजणं त्या box पाशी आली. नवीन बाहुल्यांना भेटली. आपल्या खेळण्यांना आनंद झाला, नवीन मित्र मिळाल्याचा. त्या नवीन बाहुल्या पण लगेच mix up झाल्या. तर, बाहेर आपल्या जगात, असं घडलं होतं की, एका नवीन माणसानं आपल्या विक्रेत्याच्या stall समोरच नवीन stall टाकला होता. फक्त बाहुल्यांचा. निरनिराळ्या तऱ्हेच्या, निरनिराळ्या बाहुल्या. त्याच या बाहुल्या. या बाहुल्यांकडं बघतानाच आपल्या ''तो'' ला एक बाहुली खूप आवडली. म्हणजे अगदी आवडलीच. Love at first sight असतं ना, हां, तसं. स्वभावानुसार तो तर बोलायला घाबरायचा. त्यामुळं काय करावं, तिच्याशी कसं बोलावं हे त्याला कळेना. अर्थातच मित्रांनी यात त्याला मदत केलीच असती, पण तीच स्वतःहून 'तो' शी बोलायला आली. तसं बघायला गेलं तर ती स्वभावानं खूप खेळकर होती. Reference साठी आपण आता ह्या बाहुलीला 'ती' म्हणू. ok? तर त्या पहिल्याच दिवशी ती ची सगळ्यांशी मस्त दोस्ती झाली. ती खूप लवकर open up होणाऱ्यापैकी होती. खूप मौजमजा केली सगळ्यांनी मिळून त्या दिवशी.

आता आपण जरा आपल्या जगात बघूया. हां, तर जिथं आपल्या विक्रेत्याचा stall होता ना, त्याच्याच बाजूला नवीन विक्रेत्याचा stall होता. त्यामुळं सगळ्या बाहुल्या दिवसभर एकमेकांशेजारीच असणार होत्या. ही गोष्ट आपल्या 'तो' च्या पथ्यावरच पडली. कारण तो दिवसभर त्याच्या जागेवरून तिला पाहू शकत होता! त्याला खूप बरं वाटलं. Atleast दिवसभर ती त्याच्या जवळच असणार होती. त्याला अजून काय हवं होतं? आता त्याला दिवसाचे तास मोजत बसायला लागणार नव्हतं. 

आता नवीन box त्या गोडाऊन मध्ये येऊन बरेच दिवस होऊन गेले होते. दरम्यान तो आणि ती ची ओळख खूप वाढली होती. अर्थात दोघांच्याही मित्रांनी-मैत्रिणींनी या दोघांना एकत्र आणायला बरेच किस्से केलेले. अर्थातच दोन्ही बाजूंना यांची जोडी खूपच आवडली होती. काही बाहुल्यांना तर हे दोघं अगदी made for each other च वाटायचे. अरे हां, अजून एक गोष्ट सांगायची राहिली, आपली 'ती' पण सामान्य category मधलीच होती हां.म्हणजे बघताक्षणी कुणाची तिच्यावर नजर गेली नसती, मगाशी सांगितलं ना तसं. हां, तर नंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं, मग कोणीतरी कोणालातरी propose केलं. ते काही सांगत नाही बसत. ते तुम्ही समजून घ्या, पण finally ते दोघं एकत्र आले. ok? 

असाच एक दिवस दोन्ही box गोडाऊन मध्ये येऊन पडले. सगळेजण box मधून बाहेर आले. तो पण बाहेर आला. आज थोडा नाराज होता तो. कारण सकाळपासून त्याला ती दिसलीच नव्हती. कारण, विक्रेत्यानं त्याला त्याच्या जागी ठेवल्यावर तो पहिल्यांदा तिच्या जागेकडं बघायचा. तिला बघून सुखावायचा. ती पण त्याला बघून आनंदी व्हायची.  अगदी रोज. पण आज त्याला ती दिसलीच नव्हती. ती न दिसण्याच्या Possibilities तर खूप होत्या. म्हणजे, ती मधल्यामध्ये कुठंतरी पडली असेल, किंवा त्या नवीन विक्रेत्यानं तिला दुसऱ्या कुणालातरी देऊन टाकली असेल किंवा तिला कोणीतरी लहान मुलगा घेऊन गेला असेल, किंवा..... किंवा.....असंख्य. पण राहून राहून त्याला हेच वाटत होतं की, कोणीतरी लहान मुलगाच तिला त्याच्यापासून दूर करून घेऊन गेला. त्याला या लहान मुलांचा प्रचंड राग यायचा. त्याला त्याच्या एका मित्रापासून असंच एका लहान मुलानं तोडलं होतं. हां, तर back to story. त्यानं समोरच्या box मधल्या सगळ्यांना तिच्याबद्दल विचारायला सुरुवात केली. पण कुणालाच तिच्याबद्दल माहित नव्हतं. तिच्याबरोबरच अजून दोघेजण दिसत नव्हते. सगळ्यांनाच हा shock होता. कुणालाच कळेना ती अशी कशी अचानक गायब झाली. सगळ्यांनी ठरवलं की, तिला शोधायचं. पण कसं शोधायचं, हे कुणालाच कळेना. तो दिवस खूप शांततेत गेला. तो तर केवळ राडायचाच बाकी होता.

दुसऱ्या दिवशी सगळ्यांना परत stall वर ठेवलं गेलं. त्यानं पुन्हा बघितलं, पण तिची जागा रिकामीच होती. तो अजूनच नाराज झाला. होता होता हा दिवस पण पार पडला. सगळेजण पुन्हा गोडाऊन मध्ये आले. Box बाहेर आल्या आल्या तिची मैत्रीण त्याला भेटायला गेली. तिनं नवीन विक्रेत्याचा call ऐकला होता. त्यातून तिला असं समजलं होतं की, त्या नवीन विक्रेत्याच्या हातून ती पडली होती. त्यामुळं तिला लागलं होतं. म्हणून ती अचानक नाहीशी झाली होती. पण, दोन दिवसातच परत येणार होती. म्हणजे, actually झालं असं होतं, की समोरच्या तीन बाहुल्या repairy साठी पाठवल्या होत्या. त्यात ती पण होती. हे कळल्यावर मग कुठं त्याच्या जीवात जीव आला. 

होता होता दोन दिवस होऊन गेले. ती परत box मध्ये आली. परत असं काही होऊ नये म्हणून, त्यानं आता तिला direct लग्नासाठीच विचारलं. म्हणजे, लग्नानंतर ते दोघं एकाच box मध्ये राहू शकले असते. एकत्र फिरू शकले असते. आणि मुळात ते दोघंही विक्रेत्यांच्या नावडते असल्यामुळं त्यांनी box जरी change केला असता तरी कुणाला काही जाणवलं नसतं. हां, तर त्यानं तिला लग्नासाठी विचारलं, ती पण 'हो' म्हणाली. त्याच्या आनंदाला पारावारच उरला नाही. त्यांनी पुढच्या आठवड्यातच लग्न करायचं ठरवलं. त्यासाठी गोडाऊनमधलाच एक rack book केला. त्यांनी सगळी खरेदी केली. त्याच्या box मधलं एक घर पण विकत घेतलं लग्नानंतर राहायला. दोघंही आनंदात होती. लग्नाच्या आदल्या दिवशी दोघांनी छोटेखानी bachelor party पण केली!

लग्नाचा दिवस उजाडला. त्या दिवशीच रात्री दोघं लग्न करणार होते आणि ती त्याच्या box मध्ये येणार होती. कायमचीच. हां, तर आता सकाळी विक्रेत्यांनी परत सगळी खेळणी मांडली. तो आज प्रचंड खूष होता. मनातल्या मनात future plans आखत होता. तिची पहिली भेट आठवत होता. पहिल्या भेटीपासून आत्तापर्यांतचा प्रवास तो परत एकदा खुशिखुशीत करत होता. हे सगळं त्याला भयंकर सुखावत होतं. त्याला हां दिवस संपून कधी एकदा रात्र होतीय आणि कधी एकदा तिला आपल्याघरी घेऊन येतोय असं झालेलं. कारण उद्यापासून दोघं एकत्रच असणार होते. दोन stall मधली दूरी पण राहणार नव्हती उद्यापासून. दोघं दिवसभर सोबत बसू शकणार होते. सगळंच मस्तपैकी जुळून आलेलं.

हा विचार चालू असतानाच त्याला 'आई, हीच. हीच.' असं काहीतरी ऐकू आलं म्हणून त्यानं समोर बघितलं, तर त्याला धक्काच बसला. एक मुलगी तिच्याकडं बोट दाखवून 'हीच. हीच.' असा हट्ट करत होती. पण, आई ती बाहुली विकत घ्यायला तयार नव्हती. तिच्या आईचं असं म्हणणं होतं की, 'तू दाखवतेयस त्यापेक्षा बाकीच्या खूप cute आहेत. त्यातली घे ना एखादी.' दुकानदार पण आईच्या sideनंच  तिला समजावत होता. कारण, अर्थात तिच्यापेक्षा चांगल्या बाहुलीमुळे त्याचा profit होणार होता. पण, ती मुलगी हट्टालाच पेटली होती. मुलीला 'ती' खूप आवडलेली म्हणून मुलीला 'ती'च हवी होती. 'त्याला' खूप राग आला त्या मुलीचा. पण, आईचं आणि दुकानदाराचं समजावणं ऐकून मात्र जरासा relax झाला तो. त्याला वाटलं की, मुलगी मानेल आता आणि 'ती'चा हट्ट सोडून देईल. तो काय घडतंय हे जीव मुठीत घेऊन पाहत होता. बऱ्याच वेळानं शेवटी, त्या आईनं माघार घेतली आणि तिच्या मुलीचा हट्ट पूर्ण केला.   

त्याचे डोळे भरून आले. त्याला खूप काही करून 'ती'ला परत आणावंसं वाटत होतं. पण सकाळ असल्यामुळे तो हालचालच करू शकत नव्हता. जे होतंय ते निमुटपणे बघत राहणंच त्याच्या हातात होतं. मुलगी 'ती'ला घेऊन चालली होती अगदी आनंदात उड्या मारत; त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवत, त्याची कहाणी अधुरीच ठेवत.

-©श्रेयस जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नातं

चक्र

संवाद