प्रेमाखातर

        आजी आजोबांच्या उशाशीच बसल्या होत्या. आजोबांना आजचा पेपर वाचून दाखवत होत्या. आजकाल आजोबांचा आजार जास्तच बळावत होता. डॉक्टरांनी आता त्यांना सक्तीची bed-rest सांगितली होती. त्यामुळे आजींना आजोबांची सर्वतोपरी काळजी घ्यावी लागत होती. आजींना आजोबांची अवस्था आता सहन होत नव्हती. पण, या आजारापुढे त्यांचा काही इलाज नव्हता. आजींना आजोबांची खूप काळजी घ्यावी लागत होती. आजोबांची खूप छोटी छोटी पथ्ये त्यांना अगदी कसोशीने पाळावी लागत होती. आजींना कळत होतं की, आजोबाही कंटाळलेत या सगळ्याला. पण, त्यांना लवकर बरं व्हायचं असेल तर, हे सगळं काटेकोरपणे करणं भागच होतं.
        आजोबांना पण आजींची आपल्यामुळे होणारी फरफट समजत होती. आपल्यामुळे त्यांना सतत घराशीच बांधून राहावं लागतंय, याचं त्यांना वाईट वाटत होतं. पण, करणार काय? परिस्थितीपुढं कुणाचाच काही इलाज नव्हता. अगोदर आजी रोज क्लबात जायच्या. मैत्रिणींबरोबर थोडी मौज करून यायच्या. महिन्याकाठी एकदा क्लबतर्फे निघणाऱ्या छोट्या सहलींना जाऊन यायच्या. पण, आजोबांच्या आजारपणामुळं त्यांना आजोबांच्या औषधाच्या वेळा, नाश्ता-जेवणाच्या वेळा अगदी कसोशीने पाळाव्या लागायच्या. Bed-rest मुळं त्यांना आजोबांचं सगळंच त्यांना करावं लागायचं. या सगळ्यामुळं त्यांना घराबाहेर जास्त जाता येत नव्हतं. आजोबांनी त्यांना कितीही सांगितलं की, माझ्यामुळं उगीच घरात बांधून नको राहू. तुझं पण personal life आहे, ते enjoy कर. पण आजी यावर एकच उत्तर द्यायच्या की, 'तुम्ही पूर्ण बरे झाल्याशिवाय त्या कुठंच बाहेर जाणार नाहीत. तो क्लब, त्या सहली काही तुमच्यापेक्षा मोठ्या नाहीत. लग्न झाल्यापासूनच तुमचं आयुष्य माझं झालंय.'
        आजी जरी असं बोलत होत्या तरी, आतून त्यांना आजोबांविषयी खूप वाईट वाटायचं. आजोबा आजारी आहेत, दु:खी आहेत हे बघून आजी अजूनच नाराज व्हायच्या. तसंच आजोबांना वाटायचं, आपल्यामुळं आजींची खूप ओढाताण होते. स्वतःचं आयुष्य त्या आनंदात घालवू शकत नाहीत. हे जाणवून आजोबा अजूनच नाराज व्हायच्या. दोघंही स्वतःचा विचार करण्यापेक्षा आपल्या जोडीदाराचाच विचार करत होते. जोडीदाराच्या आनंदातच त्यांचं सुख होतं. किंबहुना, जोडीदाराला आनंदी ठेवण्यातच त्यांना धन्यता होती. ते आयुष्यभर नेहमी जोडीदाराचंच सुख शोधत राहिले. केवळ प्रेमाखातर.
        आयुष्यभर म्हणण्याचं कारण म्हणजे, अगदी लहानपणापासून आजी-आजोबा सोबत होते. लहानपणापासून म्हणजे अगदी शाळेपासून. शाळेच्या शेवटच्या वर्षापासूनच आजोबांना आजी आवडायच्या. म्हणजे अगदी आजींचा पाठलाग शाळेला जायचं, घरी यायचं पण; आजींना कळू न देता. त्यानंतरही दोघांना नशिबानं एकच कॉलेज मिळालं. कॉलेजमध्येच त्यांची पहिली बातचीत झाली. ती ही एका projectच्या कारणानं. यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. दरम्यान आजोबांना समजलं की, आपण आजींचा पाठलाग करत जायचो हे आजींना व्यवस्थित माहित होतं. किंबहुना, आजींना ते खूप भारी वाटायचं. त्यांनाही आजोबा आवडायचे. हे सगळं कळल्यावर आजोबांनी आजींना थेट proposeच केलं. आजींनीही होकारच दिला. पण त्यांनी ठरवलं होतं की, दोघंही स्थिरस्थावर झाल्याशिवाय घरी सांगायचं नाही.
ठरवल्यानुसार दोघंही स्थिरस्थावर झाले. त्यानंतर दोघांनीही घरी रीतसर सांगून लग्नही केलं. आता दोघंही अगदी एकमेकांसाठीच होते. लग्नानंतरही त्यांचं आयुष्य अगदी मजेत गेलं. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. दोघं नेहमी एकमेकांच्याच सुखाचा विचार करायचे. आपल्या वागण्यानं जोडीदार दुखावणार नाही, याची पुरेपूर काळजी घ्यायचे.
        या सुखी आयुष्याला पण एक दु:खाची छोटी किनार होतीच. त्यांचं पहिलं मुल नियतीनं हिरावून घेतलं होतं. या सोबतच आजी परत कधी आई होऊ शकणार नव्हत्या. पण, यामुळं अजून न खचता उर्वरित आयुष्य दोघांनी एकमेकांसाठीच व्यतीत करायचं ठरवलं. जणू काही त्या दोघांचा जन्म एकमेकांसाठीच होता. तरीही एक खूण मात्र राहून गेली होती.
        होता होता दोघंही retire झाले. सगळं काही सुरळीत चालू असताना अचानक आजोबांच्या आजाराचं निदान झालं. सुखी आयुष्याला अजून एक दु:खाची किनार. हा आजार नंतर बळावतच गेला आणि डॉक्टरांनी आजोबांना सक्तीची bed-rest सांगितली.
        आजोबांना पेपर वाचून दाखवल्यानंतर आजी उठून स्वयंपाकघरात गेल्या. आज रक्त उलटल्यापासून आजोबांची तब्येत अजूनच ढासळली. आजींना मात्र आता आजोबांचा हा त्रास बघवेना. काहीही करून आजोबांना या त्रासातून सोडवायचं असं आजींनी ठरवलं. त्यांनी कठोर मनानं एक निर्णय घेतला, आजोबांना त्यांच्या औषधातून हळूहळू थोडं-थोडं विष द्यायचं ठरवलं. त्यांना आजोबा आपल्या सोबत नसतील या सत्याची सवय करून घ्यायला काही दिवस लागणारच होते. त्यांनी अगदी हळूहळू औषधातली विषाची मात्रा वाढवण्याचं ठरवलं. केवळ आजोबांचा त्रास त्यांना सहन होईना आणि काहीही करून आजोबांची या त्रासातून सुटका झालीच पाहिजे म्हणून, त्या या निर्णयाप्रत आल्या होत्या. कुठल्याही वाईट हेतूने नव्हे, तर निव्वळ प्रेमाखातर.
        अशाच एका संध्याकाळी आजींनी आजोबांच्या औषधाचा डोस तयार केला. आज त्यांनी औषधामध्ये विषाची मात्रा खूप वाढवली होती. आजींनी औषध आजोबांच्या जवळ टेबलावर नेऊन ठेवलं, अगदी निश्चल मनानं आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या. विषाची मात्र मिसळायला सुरु केल्यापासून, त्यांनी कधीही आजोबांना औषध घेताना बघितलं नव्हतं. त्यांना बघवलंच नसतं. पण, आज त्यांना जास्तच वाईट वाटत होतं. आज अगदी त्यांना अनावर झालं म्हणून, त्यांनी पडदा बाजूला सारून हलकेच आजोबांकडे पाहिलं आणि त्यांना भरूनच आलं. कारण, आजोबांनी ते औषध शांतपणे उचललं होतं आणि खिडकीतून खाली फेकून दिलं होतं. रक्त उलटल्या दिवसापासून ते असंच करत होते. जेणेकरून, विनाऔषधाचं त्यांना लवकर मरण येईल आणि आजींची त्यांच्या त्रासातून सुटका होईल.

मी तोडली असती गं गाठ, जर तोडता आली असती...
प्रेमापोटी तुझ्या मी ही जिंदगी वाहिली असती...
सख्या तुझा त्रास तो तुला खात होता आतून..
सरण बरे वाटे मला तुझ्या यातना बघून..
तुझा व्याप कसला रे , तू जग आहेस माझे...
दगड ठेऊन प्रेमाखातर मी मरण सोसेल तुझे..
राणी, तुझ्या आयुष्याला मी दुःखाची किनार झालो..
उंच पण ती दलदलीतली मी डगमगती मिनार झालो..
वाटलं तुझ्या आयुष्याला एकतरी निवांत पहाट द्यावी..
देहाला या जोपासून तुला मिळणार नाही काही..
प्रेम होते म्हणून सखे बरे वाटले सरण..
तुझ्यासाठी फक्त मी मागितले ते मरण..!
सगळं केवळ प्रेमाखातर...  
                                                           -©श्रेयस जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नातं

चक्र

संवाद