नातं

  एक दुहेरी कुटुंब. बाबा आणि मुलगी. तिची आई तिच्या लहानपणीच गेलेली. पण त्यानंतरची तिच्या आयुष्यातली आईची पोकळी बाबांनीच भरून काढलेली. बाबांसाठी मुलगी आणि मुलीसाठी बाबा इतकंच त्यांचं विश्व. त्यांच्या नात्यातही बरीच मोकळीक. इतकी की, मुलीच्या प्रियकराबद्दलही बाबांना माहिती! अर्थात ती आणि तो, आर्थिक आणि सगळ्याच बाबतीत, पूर्णपणे स्थिर असल्याने बाबांचीही त्यांच्या नात्याला मान्यता.

  दोघंही नोकरीत व्यस्त. मुलगी बाबांनंतर कामासाठी निघायची आणि बाबांनंतरच घरी यायची. त्यामुळे हे दिवस इतकं बोलणंच नाही व्हायचं त्यांचं. पण, त्यांना शनिवार रविवार मोकळा मिळायचा. त्यामुळं त्यांनी ठरवलं की, काहीही झालं तरी शनिवार पूर्णपणे एकमेकांसाठी द्यायचा. जे काही झालं असेल ते, शनिवारी, एकमेकांना सांगायला त्यांची एक खास जागा ठरलेली. ती म्हणजे, त्यांच्या घराजवळचा, सर्वदूर पसरलेला, शांत, रम्य समुद्रकिनारा. त्यांच्या सगळ्या कानगोष्टी या समुद्राला माहित होत्या. त्यांच्या सगळ्या आनंदी-दु:खी घटनांचा साक्षीदार होतं तो. त्यांचे प्रत्येक सुखसोहळे या समुद्राने साजरे केले होते तसंच, सगळ्या दु:खात तितक्याच गंभीरपणे तो त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता.

  बाबांची एक सवय होती, किनाऱ्यावरून फेरफटका मारताना जितके शिंपले दिसतील ते उलगडून बघण्याची. मुलीला खूप वेगळं वाटायचं ते. पण, तिनं कधी त्या बाबत बाबांकडं विचारणा केली नव्हती. असंच एक दिवस दोघं किनाऱ्यावर बसले होते. मुलगी बोलत होती. बाबांचं नेहमीचं काम चाललेलं, आजूबाजूचे शिंपले तपासून बघणं. आज तिचं आणि तिच्या प्रियकराचं बिनसलं होतं. कारण अगदीच क्षुल्लक. त्याबद्दलच ती बाबांशी बोलत होती. बाबांचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही असे वाटल्याने, ती चिडली जराशी त्यांच्यावर.

“मी इतका वेळ काहीतरी सांगतीये. तुमचं अजिबात लक्ष नाहीये त्याकडे.”
“नाही गं. ऐकतोय. बोल की पुढं! तो उशिरा आला पाच-दहा मिनिटं. मग काय?”
“काही नाही. जाऊ दे.
“अगं चिडू नको अशी. खरंच ऐकतोय मी. बोल पुढं.
“ते सांगते. पण, तुम्ही काय करत होता ते सांगा आधी. मी इतका वेळ बोलत होते, तुमचं माझ्याकडं लक्ष नव्हतं अजिबात. आणि हे नेहमी नेहमी शिंपल्यात काय असतं तुमचं? मी लहान असल्यापासून बघतीये.”
“काही नाही ते. सोड. तुला नाही कळायचं.”
“मला कळलंच पाहिजे. सांगा आधी. काय बघता त्या फालतू शिंपल्यांत?”
“कालव शोधतो.”
“का? शिंपल्यांत कालव वगैरे मिळणं अशक्य गोष्ट आहे!”
“माहितीये. पण आमचं ठरलेलं तसं. “
“आमचं? कुणाचं? सांगा न स्पष्ट.”
“आई आणि मी साखरपुडा ठरल्यानंतर याच इथे फिरायला आलो होतो. प्रेमी युगुलासारख्या गप्पा मारत बसलेलो. असंच मजेत काहीही गप्पा चाललेल्या. सहजच मी तिला विचारलं- ‘समज, माझी कुठं तरी दूर बदली झाली चुकून. इथून खूप दूर. तुला तिथं नेता येण्यासारखं नसेल अशा ठिकाणी. आणि समज, तरीही मी ती बदली स्वीकारली आणि कामाच्या ठिकाणी निघून गेलो एकटाच. तुला इथंच ठेऊन. नंतर एखाद दिवस तुला माझी खूप आठवण आली तर तू काय करणार?’”
“मग?”
“यावर ती म्हणाली- ‘माझी आजी सांगायची. दूर गेलेल्या प्रिय माणसाची आठवण आली, तर समुद्रावर जायचं शांतपणे. एक एक शिंपला उलगडून बघायचा. जर एखाद्यात कालव सापडलं तर समजायचं की, ती प्रिय व्यक्ती आपल्या जवळंच आहे. सुखरूप आहे.’”
“बाबा, असं काही नसतं. भाकडकथा आहेत सगळ्या. काल्पनिक असतं हे सगळं. काही नसतं असं.”

बाबा बोलण्यात गर्क होते. ते पुढं बोलू लागले.   

“अशाच गप्पा चालत राहायच्या आमच्या. होता होता साखरपुडा, लग्न सुरळीत पार पडलं. तू झालीस. सगळं मजेत. संसार पण सुखात चाललेला. पण, तू तिसरी-चौथीत असतानाच ती गेली अचानक. त्यानंतर मला अचानक एकटं पडल्यासारखं झालं. घर, मुलगी, सगळी जबाबदारी अंगावर आल्यासारखं झालं. तिचे शब्द आठवायचे नेहमी. एक दिवस मी खरंच समुद्राकाठी येऊन शिंपले उलगडून बघितले. अजून तरी तसा शिंपला नाही मिळाला. पण तो खरंच मिळेल कधीतरी, खात्री आहे मला. ती मला विसरणं शक्यच नाही!”
“बाबा, खरंच नसतं असं काही. जरी तुमच्यासारखं समजायचं ठरवलं तरी, असं समजू की, आई आहे आजूबाजूला. आहे तुमच्यासोबतच. असं शिंपले उचलून बघणं बंद करा आता. अंधश्रद्धा आहेत या.”
“श्रद्धा-अंधश्रद्धा हे सगळं आपल्या मानण्यावर असतं. आस्तिकासाठी ‘देव’ ही श्रद्धा, तिच नास्तिकासाठी अंधश्रद्धा! बरं, आता रात्र होईल. निघूया. बोलू यावर नंतर. आणि हे बघ, नातं म्हटलं की, अशी छोटी-मोठी भांडणं होतंच असतात. एकानं मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्यानं रडल्यासारखं. अशा कुरबुरींशिवाय नात्याची मजाच नाही. आता तू उगीच ताणू नको. बोल त्याच्याशी. हं? आणि हो, मी ऐकत होतो मगाशी सगळं, तू बोलताना!”
“पण बाबा त्यानं असं....”
“मी सांगतोय तसं कर. ताणू नको उगीच!”

  तिला आज नात्यातली भांडणाची मजा पण कळली होती आणि बाबांच्या सवयीमागचं कारणही कळलं होतं. अजूनही बाबांच्या तशा कृतीला तिचा विरोधच होता. तिला यामध्ये काही अर्थ वाटत नव्हता. पण, बाबांना उगाच वाईट नको वाटायला म्हणून, ती त्यावर जास्त काही बोलली नव्हती. होता होता तिचा आणि तिच्या प्रियकराचा साखरपुडा निश्चित झाला. थोड्याच दिवसात ते विवाहबंधनात अडकणार होते. असंच एक दिवस बाबा घरातून निघताना ती काहीतरी विसरली.

“काय गं? निघू का?”
“हो. मी पण निघेनच.”
“काहीतरी विसरतेयस का?”
“नाही. डबा दिला ना तुमचा?”
“हो. पण काहीतरी विसरलीस.”
“नाही ओ.”
“खरंच? नक्की?”
“हो बाबा. खरंच.”
“ठीके. मी निघतो. भेटू संध्याकाळी.”

        बाबांचा वाढदिवस होता आज! आणि ती सोयीस्कररीत्या विसरली असं बाबांना वाटलं. पण तिनं मुद्दाम तसं केलं. तिच्या मनात वेगळंच होतं. तिनं बाबा बाहेर पडल्याची पक्की खात्री करून ठरल्याप्रमाणे प्रियकराला बोलावलं आणि वाढदिवसाची जय्यत तयारी केली. बाबांची गिफ्ट शक्य तिथं तिथं लपवून ठेवली. बाबांना छोटासा खेळ खेळायला लावायचा, असं तिच्या मनात होतं. दोघांनी सगळी व्यवस्थित तयारी केली. संध्याकाळी तिला, बाबा येण्याच्या वेळेआधीच, त्यांचा फोन आला.

“हा, बाबा, कुठाय तुम्ही? कधी येणारे?”
“  देसाईच च? एक emergency आहे.”
“हो, मी त्यांचीच मुलगी. पण आपण कोण बोलताय?”
“मी सायन शवागारातून बोलतोय. रेल्वे पुलावर आज झालेल्या चेंगराचेंगरीमुळे बरीच जीवितहानी झालीये. दुर्घटनेच्या ठिकाणीच आम्हाला हा मोबाईल सापडला. तुम्हाला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सायन हॉस्पिटलला यावं लागेल आत्ता.”

  तिच्या हातातून फोन गळून पडला. सकाळी ठरल्याप्रमाणे तिनं बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच नव्हत्या आणि परत कधी देऊही शकणार नव्हती. काही वर्षांपूर्वीच बाबांवर आलेली वेळ आज तिच्यावर आली होती. कथा तीच होती, फक्त पात्रं बदलली होती. तिच्या आयुष्यातली सगळ्यात मौल्यवान आणि महत्त्वाची गोष्ट हरवली होती. तिला या धक्क्यातून सावरायला बरेच दिवस गेले.

  काही दिवसांनी ती पूर्णपणे यातून सावरली. अर्थात प्रियकराची यामध्ये तिला बरीच मदत झाली. ती आणि तिच्या प्रियकराने यथावकाश लग्नाचा निर्णय घेतला. त्यांचा संसार सुरळीत सुरु झाला. शनिवार-रविवार समुद्रावर फिरायला जाण्याची तिची जुनी सवय मात्र अजूनही तशीच होती. फक्त आता बाबांऐवजी प्रियकर होता.

  असेच एक दिवस ते दोघं समुद्राकाठी बोलत बसलेले. तिला अचानक बाबांचे शब्द आठवले. “आपण परिस्थितीनुसार बदलावं. सगळी माणसं आपलीच असतात. सगळ्या गोष्टीही व्यवस्थित असतात. जिथल्या तिथं. आपल्याला फक्त त्या मान्य कराव्या लागतात, परिस्थितीच्या गरजेनुसार.” तिनं हळूच बाजूला पडलेला एक शिंपला उचलला. उलगडून बघितला. आत काही आहे-नाही याचा फरक तिला आता पडला नाही. तिनं तो शिंपला हळूच हाताच्या मुठीत आवळला आणि प्रियकराला घट्ट मिठी मारली. तिच्या मनातलं वादळ शमलं होतं. ती समुद्रासारखी शांत होत होती. हळूहळू.

©श्रेयस_जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चक्र

संवाद