हृदयां-तर

        तशी त्याला वाचनाची आवड लहानपणापासूनच. लहानपणापासून  व.पू., मतकरी अगदी जवळचे. बोकील, पु.ल., शिरवळकर यांच्याशी सोयरिक. दररोज अग्रलेखाचं वाचन तर अगदी न चुकता. एकूणच  पुस्तकांशी माणसांपेक्षा मैत्री जास्त. रोज न चुकता काही ना काही वाचणारच. त्याशिवाय त्याला चैन पडत नसे. सगळे भले लेखक त्याचे आदर्श. पण, अभ्यासात मात्र तो अतिशय साधारण होता. यावरून घरच्यांची बोलणीही त्याला ऐकावी लागत. त्याच्या आजूबाजूच्या शेजारील मुलांशी त्याची अनेकदा तुलना होई. शेवटी काही म्हटलं तरी, हाताची पाचही बोटं सारखी नसतात. याला तो तरी काय करणार!? 

        तो पुढे कॉलेजला आला. व्यासंगात तरी खंड नव्हता. त्याचं कॉलेज म्हणजे आंतरमहाविद्यालयीन नाट्य-स्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी कटू स्वप्न. या नाट्य-स्पर्धेत त्यांचा प्रचंड दबदबा. केवळ यांचं नाव ऐकूनच प्रतिस्पर्धी शांत होत. अशा कॉलेजमध्ये तो दाखल झाला.  होताहोता कलामंडळाशी त्याचा संपर्क आला. नाटक म्हणजे काय, याची वरवर माहिती अगोदर असल्यामुळे तो हळूहळू कलामंडळात रुळला. या एका शैक्षणिक वर्षात त्याला बऱ्यापैकी नाटकाचा अर्थ कळू लागला. नाटक म्हणजे काय, ते कसं उभं करतात, संहिता कशी असावी, दिग्दर्शकीय पैलू, नेपथ्य-प्रकाशयोजना-संगीत यांचं नाटक उभं राहण्यामागचं महत्त्व अशा बऱ्याच गोष्टींची मूलभूत माहिती त्याला मिळत होती. बऱ्याच स्पर्धा त्याच्या ओळखीच्या झाल्या. महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा म्हणजे नक्की काय, हे त्याला समजलं.

        दरम्यानच्या काळात या सगळ्या गोष्टी घडत असतानाच त्याचं अभ्यासावरचं लक्ष मात्र हललं नव्हतं. पण, निकालावरून घरच्यांची बोलणी बसणं चालूच होतं. परीक्षापूर्व अभ्यास तो जोमाने करत होता. त्याला अपेक्षित निकालही येत होता, पण तो निकाल घरच्यांच्या अपेक्षेपेक्षा कमीच होता. सोबत, त्याच्या कलामंडळात जाण्याला घरच्यांचा विरोधही होताच. तरी नेटाने तो या सर्व आघाड्या पार पाडत होता.

        होता होता त्याचं शेवटचं वर्ष आलं. या दोन वर्षात कलामंडळात त्यानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. अगोदरच वाचन खूप असल्यामुळं त्याची शब्दसंपदा अमाप होती. तसंच त्याला आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचं, तसंच सामाजिक भानही होतं. प्रेक्षकांची, तसंच स्पर्धेची नाडीही त्यानं अचूक ओळखली होती. याचा फायदा त्याला लिखाणात होत गेला. प्रथमवर्षी त्याला बऱ्याच स्पर्धा ओळखीच्या झालेल्या. पण, आता 'या बऱ्याच स्पर्धांना मी ओळखीचा होईन' अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. याला कारणही तसंच होतं, त्यानं नुकतंच लिहून हातावेगळं केलेलं 'हृदयांतर'. त्याला असं वाटत होतं की, हे नाटक नक्कीच रंगभूमी गाजवणार. नाटक परीक्षकांना आवडेलसं सामाजिक, तसंच प्रेक्षकांना आवडेलसं फार्सिकलही होतं. 

        पुढच्या शैक्षणिक सत्रात होणाऱ्या स्पर्धेसाठी आता तो तयार होता. सुट्टी संपून कॉलेज सुरु व्हायला अवकाश होता. पण, सुट्टीदरम्यान त्याचे घरातल्यांशी असलेले वाद विकोपाला गेले आणि त्यानं लवकरात लवकर स्वतंत्र होण्याचं ठरवलं. यासाठी कोणतीतरी नोकरी लवकरात लवकर मिळवणं भाग होतं त्याला. म्हणून त्यानं नोकरीचं मनावर घेतलं. त्याला ते वर्ष संपेपर्यंत मनाजोगती नोकरी मिळालीही. परंतु, दरम्यान त्याला 'हृदयांतर' पूर्णपणे अंतरली होती. या दरम्यान कलामंडळातील कोणी नाटकाविषयी-तालमीविषयी विचारलं तर, तो त्याला उडवाउडवीची उत्तरं देत असे.   

        कॉलेज संपलं. नोकरीसाठी तो दुसऱ्या शहरात स्थायिक झाला होता. पण, नोकरीत त्याचं काही जमेना. दरम्यान, नाटक या गोष्टीला तो पूर्णपणे विसरून गेला होता. नोकरीतही आषाढी-कार्तिकी वाऱ्या चालू होत्या. आज ही तर, उद्या ती. सतत नवीन कंपन्यांत अर्ज. मग मुलाखती. मग कुठंतरी निवड झाली तर झाली. नाहीतर परत अर्ज. दोन वर्ष असंच अस्थिर आयुष्य जगत, रडतखडत दिवस ढकलणं चालू होतं. नवनवीन कंपन्या, नवनवीन अर्ज! पण, होता होता एका कंपनीत तो स्थावर झाला.

        एके दिवशी त्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण होतं, ज्या स्पर्धेसाठी खूप मेहनतीनं त्यानं 'हृदयांतर' लिहलं होतं. या वर्षी त्याच्या कॉलेजनं 'सांघिक प्रथम'चा बहुमान पटकावला होता. 'हृदयांतर'! 

        तो दुसऱ्या शहरात जाऊन एक वर्ष झालं असेल. तेव्हा, त्याच्या मित्रानं त्याच्याकडं 'हृदयांतर' विषयी विचारणा केली. 'हृदयांतर'बाबत त्यानं त्याच एकाशी चर्चा केली होती. त्यामुळं फक्त त्याच मित्राला 'हृदयांतर' विषयी माहिती होती. त्याला 'हृदयांतर'विषयी मित्राने विचारण्यामागचं कारण म्हणजे, मागील दोन वर्ष कॉलेज बॅकफूटवर आलं होतं. कॉलेजला नवसंजीवनीची गरज होती. त्यामुळं, त्यावेळच्या कलामंडळातील मुलांनी संहितेसाठी सिनिअर्सकडं विचारणा केली होती.

        त्यानं अधिक काही न विचारता, आढेवेढे न घेता 'हृदयांतर' देऊन टाकली. नंतर, ही गोष्ट तो विसरूनही गेला. त्यावर्षीच्या स्पर्धेचा मागोवाही त्यानं घेतला नाही. कारण, या सगळ्यातला त्याचा रस निघूनच गेला होता. तसंच नवीन कंपनीतही तो हळूहळू रुळत होता. 

        निकालाच्या रात्री स्पर्धेचं पारितोषिक वितरण चालू होतं. आणि इकडे 'हृदयांतर' लिहिणारे हात दुसऱ्या दिवशीसाठीचा रजेचा अर्ज लिहिण्यात मग्न होते. हृदयांतर प्रसिद्ध झाली होती , मात्र 'स्पर्धेला तो ओळखीचा होणं' राहून गेलं होतं! 


                   और तो क्या था बेचने के लिए ।
                  अपनी आँखों के ख़्वाब जो बेचे हैं ।।
                  ख़्वाब वैसे तो इक इनायत है ।
                  आँख खुल जाए तो मुसीबत है ।।

©श्रेयस_जोशी

Comments

Popular posts from this blog

नातं

चक्र

संवाद