साक्षीदार

        " मेरी धड़कने तुझे सुनाना चाहता था मैं...
         तेरी आँखों की गहराईयो मे खोना चाहता था मै...

        आज २१ ऑक्टोबर . त्या घटनेला आज पाच वर्ष पूर्ण झाली . म्हणायला तो एक अपघात होता , म्हणायला एक नकळत घडलेली चूक . पण अपराधी कोण , हे मला ठरवता येत नव्हतं . त्या दिवशी काय काय घडलं होतं , अजूनही मला लख्ख आठवतंय . काही वाटत नाही त्या घटनेबद्दल मला . अजूनही . त्या दिवशी असं का घडलं , हे ही नाही माहीत . घडलं ते चूक का बरोबर , नाही माहीत . पण , तो एक बचाव होता , समाजापासून , हे नक्की !
        
        माधवी . माझी Classmate . आधी मला ती अती हुशार , पुढं पुढं करणारी वाटायची . वर्गात उत्तरं देणारी , शिक्षकांच्या पुढं मागं करणारी . अभ्यास नेहमीच तयार . Assignments वेळच्या वेळी तपासलेल्या . टिपिकल First-bencher.
        
        एकदा , शेवटच्या वर्षाला , एका कार्यक्रमाच्या कारणास्तव तिची माझी ओळख झाली . मी कॉलेजच्या कल्चरल ग्रुपचा , तीन वर्षांपासून ACTIVE MEMBER होतो . त्यामुळे कॉलेजच्या एका छोटेखानी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शिक्षकांनी माझ्यावर सोपवली . एक मनोरंजक कार्यक्रम करायचा होता , सगळे शिक्षक उपस्थित असणार होते . 

        मग कार्यक्रमात सादरीकरण करण्यास इच्छूक लोकांची यादी मागवली . त्यात माधवीचं नाव बघून जरा चक्रावलोच . तिनं गाण्यासाठी नाव दिलेलं . तशी इच्छूकांची यादी कमीच होती . त्यामुळे सगळ्यांना आपापली कला सादर करण्याची संधी मिळाली . कार्यक्रम व्यवस्थित पार पडला . 
        
        याच दरम्यान , माझी आणि माधवीची ओळख झाली . ती लहानपणापासूनच सुरक्षित वातावरणात वाढलेली . शाळाही मुलींचीच . Junior college ला आल्यानंतरही आजूबाजूला सुरक्षित वातावरण . अशी एकदम protected वातावरणातच ती लहानाची मोठी झाली . तिचा स्वभाव बोलका होता . त्यामुळं , कुणाशीही पटकन मैत्री होऊन जायची तिची . तशीच माझ्यासोबतही झाली . 
        
        हळू हळू बोलणं वाढू लागलं . मला ती कधी आवडायला लागली , कळलंच नाही . तिच्याशी संवाद वाढतच होता . हळू हळू ती ही जरा खुलू लागली . त्या protected वातावरणातून बाहेर येऊ लागली . आमच्या भेटीगाठी , फिरस्ती , मजामस्ती वाढू लागली . एकदा मी तिला माझ्या मनातलं सांगायचं ठरवलं . तळजाई टेकडी खूप प्रसिद्ध आहे पुण्यातली . एकदम मनोरम . तिथं तिला विचारायचं ठरवलं . तारीखही पक्की केली , २१ ऑक्टोबर . तिचा वाढदिवस .
        
        इतक्यात तिचाच कॉल आला . योगायोग ! तिनं मला surprise द्यायला 'तळजाई'लाच बोलावलेलं ! वेळही मी सांगणार होतो तिला , तीच ! निव्वळ योगायोग ! मी निघालो सर्व तयारी करून . तिलाच surprise द्यायचं ठरवलेलं . 
        
        पोहचलो . तर तिच्यासोबत एक मुलगा होता . तिनं ओळख करून दिली . " तिचा प्रियकर " ! ऐकताच एक विलक्षण कळ गेली डोक्यातून . मी काय करतोय मला समजत नव्हतं . स्वतःला सावरू नव्हतो शकत . तिला रागाने बाजूला ढकललं मी . पण , आम्ही टेकडीच्या कडेवर होतो ,  हे तिची शेवटची किंकाळी ऐकताना मला जाणवलं . तो खूप घाबरला . 
        
        " काय केलंस ! अरे , ती थट्टा....." बोलत असतानाच तो दरीत कोसळला . कोणी साक्षीदार उरला नव्हता आता , पहिल्या खुनाचा आणि दुसऱ्याही !

        अजून काय करू शकत होतो मी , समाजापासून , पोलिसांपासून बचावण्यासाठी . दुसरा खून करण्याशिवाय पर्याय नव्हता . दोषी कोण , कोण निर्दोष यापेक्षा मला निष्कलंक आयुष्य जगणं महत्त्वाचं होतं . पण , माधवीच्या आठवणीने त्रास होत होता . माझ्याच चुकीने मी तिला गमावलं होतं . आता पश्चात्ताप करूनही फायदा नव्हता . 
        
        कॉलेज संपलं . मनासारखी नोकरीही मिळाली . माझं पूर्ववत आयुष्य सुरू झालं . नलिनी . नोकरीच्या टूर दरम्यान ओळख झाली तिची . पसंत होती मला . घरच्यांचाही विरोध नव्हता . सगळं सोयीस्कररित्या पार पडलं . सुखी संसार सुरू आहे . 
        
        हे कोणाशी बोलू नव्हतो शकत . पाच वर्षे त्रस्त होतो . खूप घालमेल होत होती . कुणाला सांगू नाही शकत , म्हणून लिहायचं ठरवलं . आता जरा मोकळं वाटतंय . "
        
        नलिनीला वाचून घाम फुटला . काय हे ? कुणासोबत राहतो आपण ? असे असंख्य प्रश्न तिच्या डोळ्यासमोर नाचत होते . बेल वाजल्याने तंद्री भंगली तिची . डायरी टेबलवर तशीच ठेवून तिनं दार उघडलं . निशांत आज फ्रेश मूड मध्ये वाटत होता . आल्या आल्याच म्हणाला , " नलू , चल , फिरायला जाऊ . वाटेतच काहीतरी खाऊ . आवर , मी जरा फ्रेश होऊन येतो . "
        
        नलिनीच्या तोंडून शब्द फुटत नव्हता . ती अस्वस्थपणे तयार होत होती . निशांतचा आवाज आला आतून ," नलू , डायरी इथं कशी आली ?" नलिनीला ते ऐकून घाम फुटला . परत आवाज आला , " कामवालीला सांग , ही रूम साफ नाही केली तरी चालेल . मी करेन या रूमची देखरेख . " हे ऐकून जरा तिच्या जीवात जीव आला . लगेचच ते निघाले....
        
        " मेरी धड़कने तुझे सुनाना चाहता था मैं... 
          तेरी आँखों की गहराईयो मे खोना चाहता था मै...
          पर जनाजा उठते तेरा...  रो भी न पाया मै... 
         "गुनहगार" नही था , बस जिना चाहता था मै...

        आज तळजाई तिसऱ्या खुनाची भागीदार होती . डायरी माझ्या नकळत वाचण्याची चूक तिनं का केली , समजत नव्हतं . मला खुनाच्या साक्षीदाराची भीती वाटते , म्हणून मी फक्त स्वतःचा बचाव केला . झालं असं की , ..."

©श्रेयस_जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नातं

चक्र

संवाद