ती...

          " चल . आम्ही निघतो . आजीला २ आठवडे बेड-रेस्ट सांगितली आहे . तिला जरा बरं वाटेपर्यंत मला आणि बाबांना तिथंच राहावं लागेल . तिकडचा जास्त विचार नको करू . तुझं हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे . अभ्यासावर लक्ष दे . इतकं जास्त नाहीये आजारपण ."

          "........"

          " अरे हो . तुला सांगितलं ना , तिकडं नको लक्ष देऊ . आहे आता ती बरी . तू अभ्यास व्यवस्थित कर . आणि हो , दूधाचं सांगितलंय मी . फक्त सकाळी त्याला आठवण करून दे . काकूंना सांगितलंय . त्या देतील रोज सकाळचा डबा . रात्रीचं त्यांना नाही जमणार . बघ तू . हां ? निघतो . "

          ऐकत बसलेलो मी . सगळ्या सूचना . मुलगा कितीही मोठा होऊ दे , आई वडिलांसाठी तो नेहमीच ' बाळ ' असतो , या तत्त्वानुसार त्या सूचना चालू होत्या . शेवटी निघाले ते . गावी . २ आठवडे तरी आता मला माझ्या मनाप्रमाणे वागायची मुभा होती . त्यांच्या सूचना चालू असताना , मी मनातल्या मनात , या २ आठवड्यांची " TO-DO " लिस्ट तयार करत होतो . अभ्यास तर होताच . या काळात बघायचे पिक्चर , नाटकं , football चे रात्री चालणारे सामने , सगळं planning चाललेलं . हॉस्टेलच्या मित्रांसोबत २-३ night-out पण पक्क्या झाल्या मनातल्या मनात . पण , या सगळ्यामध्ये एक गोष्ट मी विसरलो नव्हतो , तन्वी ! 

          तीच ! गेल्या महिन्यापासून घरच्यांचं जरा जास्तंच चाललेलं तिच्याबद्दल , विसर तिला आणि काही काही . बराच वेळ समजावत बसलेले मला . त्यानंतर , ४ आठवडे तिचा message नाही , call नाही ; काहीच contact नव्हता . त्यानंतर , २-३ दा भेटायला बोलावलं तिला , पण आलीच नाही तेव्हा . खूप वेळ वाट बघून परतलो मी घरी , प्रत्येक वेळी . त्यानंतर काहीच पत्ता नाही तिचा . मग , मी पण २ आठवडे तिला call करायचा प्रयत्न नव्हता केला . आत्ता सगळे समज-गैरसमज दूर करायला चांगली संधी होती . आई-बाबा गेल्यानंतर दोनेक तासांनी मी तिला बोलवायचं ठरवलं होतं .

          एका क्षणात सगळं काही आठवत होतं . पाहिल्या-पाहिल्याच ती माझ्या नजरेत भरली होती . LOVE AT FIRST SITE ! असं असतं की , बऱ्याचदा पहिलं प्रेम असफल ठरतं . अयशस्वी होतं . पण , माझ्या बाबतीत मात्र ही गोष्ट सपशेल खोटी ठरली होती . सगळं कसं मस्त जमून आलेलं . तिनं , तिनं म्हणण्यापेक्षा तिच्या गोड हास्यानं माझ्या मनावर गारुड केलं होतं . खूपच सुंदर होती ती . मला सारखं वाटायचं की , हिची सोबत मिळाली तर जगणं आनंदी होईल . SHE WAS A PERFECT MATCH FOR ME ! 

          एक एक पायरी अनन्वित आनंदाने सर करत होतो मी . ओळख , फोन नंबरची देवाणघेवाण , गप्पा , भेटीगाठी , फिरस्ती , निरुद्देश भटकंती , मग propose आणि शेवटी , तिचा expected होकार ! सगळं अगदी सुरमयी गाण्याच्या चालीवर हसत-खेळत , मजेत चालू होतं . काही अडथळे पण आले होते , नक्कीच , नव्याने जन्मणाऱ्या या नात्यात ! पण , विश्वास , नातं , काळजी , अतूट प्रेम यांच्या बळावर सगळे अडथळे सर केले होते . हा प्रवास खूप रम्य होता . तो असंच चालू राहावा , शेवटपर्यंत , ही माझी एकमेव इच्छा ! तिला बोलावलं तर होतं आज . बऱ्याच दिवसांनी contact झाला होता .           


          " अगं , किती उशीर ? नशीब , आज तरी फोन लागला तुझा . कुठं गायब होतीस ४ आठवडे ? काहीच पत्ता नाही . किती वेळा भेटायला बोलवायचं ? कुठं होतीस ? काय चाललेलं तुझं ?  मला वाटलं , आज पण नाही लागणार तुझा फोन . नशीब , लागला . अरे , sorry . अजून तिथंच उभी आहेस . ये , आत ये . बस इथं . थांब , पाणी आणतो " 

          " आई-बाबा आजच गेले गावाला . २ आठवडे . सांगितलं न तुला ? तेच . बरं , ते सोड . काय खाणार ? का जेवून आलीस ?  ........  अच्छा ! मग मागवूया घरीच . बऱ्याच दिवसांनी मोकळेपणानं बोलायला वेळ मिळाला आपल्याला . खूप मस्त ! खूप काळानंतर एकत्र जेवू , टाईमपास करत ! खूप खूप बोलायचं आहे . पण , ते काहीही असो , तू यायला नेहमीप्रमाणे अर्धा तास उशीर केलास ! कारण तयार असेलच ! ........ तेच ! वाटलेलंच ! तू सांगायची वाट बघत होतो ! सोड . नेहमीचंच आहे ते . काही करू नाही शकत . "

          " .......... वेगळं वगैरे नाही ग . असंच . काही सुचत नाहीये . समजत नाहीये काय बोलायचं . ४ आठवडे झाले . खूप काही बोलायचं आहे . बरंच काही घडून गेलं , या काळात . पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय . .......... असं special वगैरे असं काही नाही . पण , बऱ्याच घटना घडल्या या काळात . चालायचंच . कुरबुरी नेहमीच्याच . सगळे अडथळे पार केले , आता हे ही करू . त्याबद्दलच जरा सांगायचं होतं . पण , तुमचा पत्ताच नाही . असो . अगं झालं अस की , .......... थांब हा , एक मिनिट . "

          " हां , बोल . अगं हो . केलंय सगळं . किती वेळा फोन करणार आहेस ? दुसरा आहे हा तुझा निघाल्यापासून . ........ हो , आहे सगळं लक्षात . करतो . ........ हो , गं . नाही बोलावत . ठेऊ आता ? ........ bye "

          " लहानच समजून ठेवलंय ह्यांनी . जाऊ दे , नेहमीचंच . आज संध्याकाळी काय काय करायचं सांग ? Movie , Dinner , coffee ? काय करायचं ? ........ हो , माहितीये . तुझ्या हॉस्टेलचा in-time असतो ९ वाजताचा . सांग न पण , काय करूया ? ........ Coffee ? चालेल . Cafe Express ? ........ चालेल . दुपारी एखादा पिक्चर बघू , मस्तपैकी , घरीच . एखादा classical वगैरे . मग निघू संध्याकाळी . तिथूनच तुला drop करतो . हॉस्टेल वर . pizza येईलच इतक्यात . "

          " काहीतरी बोल . तू आल्यापासून एकटाच बोलतोय मी , कितीतरी वेळ . स्वतःशीच बोलल्यासारखा . बोल , बोल काहीतरी . ऐक , तुला propose केलेलं , कधीच नाही विसरणार मी . माझा वाढदिवस , तुला पार्टी द्यायला बोलावलं आणि propose . ........ हो , ना . उत्तर द्यायला दोन दिवस लावलेस . मला तेव्हा वाटलं , विस्कटलं आता सगळं . आशा सोडलेल्या मी सगळ्या . पण , दोन दिवसांनी भेटून होकार कळवलास , तो पण कॉलेजच्या पाठी ! कसे गेले होते ते २-३ दिवस , मलाच माहित ! "

          " ........ . हो . पक्कं . सिंहगडाला चाललेलो . माहीतच नव्हतं मला की , गाडीत कितपत पेट्रोल आहे . तरी नशीब आपलं , पंपासमोरच बंद पडली गाडी ! नाहीतर काही खरं नव्हतं . ........ हो ! कमाल ! भाकरी भाजी आणि ताक . ती मजा आपल्याला त्या candle-light dinner मध्ये कधीच नाही येणार . तो दिवस पण खूप भारी होता , अविस्मरणीय ! अचानक आपला ग्रुप भेटला माथ्यावर , तेव्हा त्यांना काय काय सांगितलेलं ! बाप रे ! बरं , ऐक , कुठला पिक्चर बघायचा ? एखादा classical सांग , तुझ्या आवडीचा . एकचं मिनिट हा . "

          " आई , हा तुझा तिसरा फोन आहे . सगळं आहे लक्षात माझ्या . ........ . हो ,गं . नाही बोलावत मी तनूला . सांगतोय ना ? ठेव फोन . bye . "

          " काय प्रॉब्लेम आहे , काय माहित ? ........ तू बस . बघतो मी . pizza आला असेल . ........ . रवी , तू ? आत्ता ? काय झालं ? " 

          " आयुष , काकूंनी फोन करून मला घरी यायला सांगितलं . आजच निघाल्या न ?"
          " हो , पण का ? काय झालं ? "
          " तनू विषयी सांगत होत्या ."
          " अरे , काय होतंय यांना . बोलावलं मी तनूला . तिच्याशी बोलायचं होतं जरा , म्हणून . "
          " कुठाय ती ? "
          " आत आहे , किचन मध्ये "
          " बोलंव तिला . "
          " तनू , बाहेर ये एक मिनिट . ........ . आली बघ ."
          " आयुष , नाहीये कोणी तिथे ."
          " रवी , ती तुझ्याशी बोलतीये . "
          " आयुष , भानावर ये . १ महिना होऊन गेला . ती आणि तिची family फिरायला गेलेली . येताना त्यांची बस दरीत कोसळली . कोणीही वाचलं नाही . आयुष , तन्वी नाहीये . Accept कर , प्लीज . नाहीये तन्वी . "

          रवी बोलतंच होता . माझी नजर मात्र माझ्या पाकिटातल्या , " तिच्या " फोटोवर खिळली होती .  तन्वीचं ते स्मितहास्य मला नेहमीच सत्यापासून दूर नेणारं होतं , हे मात्र नक्की !

©श्रेयस_जोशी

  

Comments

Popular posts from this blog

नातं

चक्र

संवाद