चक्र

" हॅलो मोहिते, आहात तिथून लवकर निघा. अजून एक खून झालाय. साखळीत अजून एका मुलीच्या मृतदेहाची भर पडलीये. साहेबांनी ताबडतोब नाकाबंदीची ऑर्डर दिली आहे. त्वरित निघा."
        मोहिते लगेच पोशाख चढवून चौकीकडे निघाले. काय करावं समजत नव्हतं. दोन दिवसाआड एका मुलीचा बळी जात होता. तो ही विनाकारण. कोण करतंय हे सगळं, त्यामागचा त्याचा हेतू काय, कोणाच्या आदेशानुसार हे सगळं चाललंय काहीच समजायला मार्ग नव्हता. पोलिसांनी गेला एक महिना रात्रीचा दिवस करून आरोपीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. पण, काहीच हाती लागत नव्हतं. आरोपी अतिशय चतुर होता. तो कोणतेच पुरावे पाठीमागे सोडत नव्हता. त्यानं शहरातल्या केवळ मध्यमवयीन तरुणींनाच लक्ष्य केलं होतं. का? कशासाठी? तरुणीच का? काहीच कळायला मार्ग नव्हता. गेला एक महिना मोहिते आणि टीमचं लक्ष्य एकच होतं, तो सिरीयल किलर ! त्याला आता काही करून....
        हे सगळे विचार चालू असतानाच मोहितेंना वाटेत, एका बंगल्यासमोर आत जाण्याच्या स्थितीत उभी असलेली पांढरीशुभ्र SUV उभी असलेली दिसली. तसा मोहितेंच्या घरासमोरील, मुख्य रस्त्याला लागेपर्यंतचा रस्ता, एकेरी वाहतुकीसाठीच होता. त्यामुळे मोहितेंना पुढे जाता येईना. बराच वेळ वाट बघितली, तरी ती जागची हलेना. खूप वेळा हॉर्न वाजवूनही काही उत्तर नाही, म्हटल्यावर मोहिते त्या गाडीपाशी गेले. काचेवर टकटक केली, तरी काही उत्तर नाही. काचेतून आत बघितल्यावर मोहितेंना धक्काच बसला. आतमध्ये ड्रायव्हर सीट वर एक तरुणी मृतावस्थेत पडली होती. मागच्या सीट वर कोणीच नव्हतं. ' तिच्या डोक्याच्या आरपार एक गोळी गेली होती ', आणि कपाळातून एक रक्ताची धार वाहत होती. एकाच दिवसात दुहेरी घातपात ! मोहितेना काय करावं सुचत नव्हतं.
       
______________________________________________
         भरधाव वेगाने येणारी SUV अचानक थांबली, ब्रेक्सचा कर्णकर्कश आवाज करत. एक माणूस अचानक गाडीसमोर आल्यामुळे प्रांजलला गाडी थांबवण्यावाचून पर्याय नव्हता. त्या माणसाचे प्रयोजन समजण्यासाठी तिने खिडकीतूनच विचारणा केली.
         "मॅडम, कुठे निघाला आहात...?"
         शहरात सिरीयल किलर चे वाढते प्रस्थ माहित असल्यामुळे, एका अनोळखी व्यक्तीला बघून प्रांजलने जरा चाचरतच उत्तर दिले, "म..मी... मी...घरी."
         "कुठे राहता...?"
         "खूप रात्र झालीये. Please, मला जाऊ द्या. "
         "अहो, पण चाललात कुठे...?"
         "मला तुमच्या प्रश्नांची उत्तर देत बसायला वेळ नाहीये. निघते मी. "
         "अहो, ऐका तरी. माझे सगळे साथीदार, मला उशीर झाल्यामुळे, अगोदरच निघून गेले. मला घरी जाण्यासाठी लिफ्ट हवीय. बस. इतकंच. "
         "मी नाही लिफ्ट देऊ शकत, सॉरी. "
         "हे बघा मॅडम, आधीच शहरात सिरीयल किलरचं प्रस्थ वाढतंय. मी तुमच्यासोबत असेन तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. "
         सिरीयल किलर हा शब्द ऐकूनच प्रांजल तंतरली. तिला काय करावं सुचेना. ती काही बोलणार...
         "हे बघा मॅडम, मी तुम्हाला माझी ओळख नाही पटवून देऊ शकत. पण, एक मिनिट... हे बघा माझं ATM कार्ड... "
         बराच वेळ वादविवाद झाल्यावर शेवटी प्रांजल त्या अज्ञाताला लिफ्ट देण्यासाठी तयार झाली. केवळ त्याच्या त्या ATM कार्डवरच्या नावावरून. तो तिच्या घराजवळच राहत होता. तिच्या घरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. त्यामुळे ती त्याला लिफ्ट द्यायला बऱ्याच वेळानंतर तयार झाली.
         "इतक्या रात्री का बाहेर राहता..? समजत नाही का...? बातम्या वगैरे वाचता का नाही...? पेपर वाचता का नाही...?"
         " मित्राची पार्टी होती. त्यामुळे जावं लागलं. मी काही मूर्ख नाही की, रात्री उगाच बाहेर फिरत बसेन, बिनकामाचं...!!"
         "हो, हो, ठीक आहे. इतका चिडायचं कारण नव्हतं..!!"
         "...."
         "तो पाठीमागे कोण बसलाय..?"
         "तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकश्या..?"
         "सहज विचारलं. प्रत्येक वाक्यावर चिडचिड करायची गरज नाहीये.."
         "सॉरी. तो अनमोलचा मित्र आहे. अनमोल, माझा मित्र. त्याचीच पार्टी होती. "
         "हा आपल्या परिसरातच राहतो का?"
         "नाही..."
         "मग..?"
         "अनमोलची पार्टी होती. त्याच्या प्रमोशन निमित्त. तर, हा त्याचा खूप जवळचा मित्र आहे. मित्राची पार्टी होती म्हणून, हा जरा जास्तच प्यायला. आणि अनमोलच्या सांगण्यावरूनच मी याला लिफ्ट देतेय... "
         इतक्यात त्याने त्याच्याजवळची एअर-गन काढून समोर ठेवली. ते पाहून प्रांजल अजूनच भांबावली. तिच्या मनात एक एक घटना अलगद सरकून गेल्या. अनमोलचं पार्टी साठीचं आमंत्रण. त्याला, शक्य नसल्यामुळे, दिलेला नकार. नंतर मिळालेली सवड. नंतरची जंगी पार्टी. पार्टीमधलं बेधुंद नाचणं. नंतर निघताना पाठीमागे बसलेल्या त्या अनमोलच्या मित्राची भेट. नंतर गाडीसमोर आलेला तो अज्ञात इसम. ATM कार्ड पाहून त्याच्यावर ठेवलेला विश्वास ते ती एअर-गन !
         "तुम्ही कोण आहात नक्की..?"

         "अहो, घाबरू नका बिलकुल. गन ना ? ती, ती माझ्या संरक्षणासाठी बाळगतो. बरं, ते जाऊ दे. तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होता. बोला."
         "..."
         "अहो, बोला."
         "..."
         " खरंच घाबरण्याचं काही कारण नाही. बोला."
         "तो, तो अनमोलचा मित्र आहे, असं म्हणाला. पिऊन पार तारांबळ उडलेली त्याची. धड चालताही येत नव्हतं. मग, त्यानं मला आज रात्री साठी घरी घेऊन जाण्याची विनंती केली. प्रथम मी अनमोलला विचारलं की, विकास म्हणून तुझा मित्र आहे का कोणी ? नंतरच मी तयार झाले, त्याला घरी न्यायला. तोच आहे तो, विकास. "
         "अहो, पण हा राहतो कुठं ?"
         "नाही विचारलं, पण असेल राहत इथेच जवळपास."
         "जपून राहत जा. एक तर त्या सिरिअल किलरनं जगणं हराम केलंय शहराचं, आणि तुम्ही सर्व काही माहित असूनही 'दोन' अनोळखी माणसांसोबत निघालाय. काहीही होऊ शकतं. काय ? "
         प्रांजलने अचानक ब्रेक दाबला. SUV जागीच थांबली. तो इसम म्हणाला, "अहो फक्त सावध केलं तुम्हाला. चला तुम्ही."
         "आलं माझं घर, जाऊ शकता आपण. "
         खरंच बोलता बोलता ते प्रांजलच्या घरासमोर आले होते. तो इसम उतरला आणि चालत निघाला. होता होता घरी पोहचला आणि काहीतरी काम आठवलं म्हणून गाडी घेऊन परत निघाला. इतक्यात त्याला call आला.
" हॅलो मोहिते, आहात तिथून लवकर निघा. अजून एक...."

©श्रेयस_जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नातं

संवाद