हे ही दिवस जातील...

          नुकताच १२वीचा निकाल लागला. कोणी ९०% च्या वर मिळवले तर , कोणी अगदीच ३५. कोणाच्या घरी आनंदसोहळा , तर कोणाच्या घरी मौनव्रत. काही जण नापासही झाले. त्यांच्या घरचं वातावरण तर नकोच विचारायला नको. तर , असं संमिश्र वातावरण सगळीकडं निकालानंतर. निकाल म्हटलं की , असं वातावरण ठरलेलंच. निकाल म्हणजे फक्त tension , त्यात आणि बोर्डाचा म्हणजे संपलंच. आजकालची जीवघेणी स्पर्धाच या tension चं मूळ. त्यात आणि निकालावरच पुढील प्रवेशाची स्पर्धा ठरलेली. त्यामुळं tension मध्ये अजूनच वाढ! निकाल म्हटलं की एक तणाव पसरलेला असतो वातावरणात. आजकाल निकालावरच admission च्या categories ठरतात ना. साधारण ८५ च्या वर म्हणजे सायन्स , अभियांत्रिकी , वैद्यकीय . त्या खालोखाल कॉमर्स , आणि मग आर्टस्! असा हा उतरता क्रम. हे झालं पास होणाऱ्यांविषयी. काही जणांना हा अडथळा पार नाही करता येत. मग त्यांना घरात , घराबाहेर अनेक टोमण्यांना सामोरं जावं लागतं. काही जण मानसिकदृष्ट्या कमजोर असतात , असे आत्महत्येचा भीषण मार्ग निवडतात. आजही निकालानंतरच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे.
         निकाल आत्ताचा महत्त्वाचा मुद्दा , म्हणून अधोरेखित केला. निकालानंतर वाईट वाटून घेणारे , आपण लायक नाही , अपल्याला जमणार नाही , आपण काहीच करू शकत नाही , इथपासून ते आपण जगायलाच लायक नाही इथपर्यंत वाटणारे खूप. अगदी ८५-९०% पडणारेसुद्धा नाराज असतात आजकाल.
          आजकाल नाराजीचं प्रमाण वाढतंय समाजात. याची कारणं अनेक आहेत. अगदी प्रेमभंगापासून ते नोकरीतील पदावनतीपर्यंत. समाजातील सुखी लोकांचं प्रमाण अगदीच व्यस्त आहे. नाराजीचं एक मोठं कारण म्हणजे तुलना. सततची तुलना.
- त्याच्याकडं मोठा टीव्ही आहे , आपण कधी घेणार...
- अमक्यांच्या मुलाला ९०% पडले , तुझ्या मित्राला ८५ पडले , तू काय मिळवलंस...
- त्यांच्या मुलाने घर पण घेतलं , तू अजून गाडीवरच अडकलायस...
- त्यांचं प्रमोशन आलं , तुम्ही कधी प्रयत्न करताय...
- त्याची placement होऊन पगार पण सुरु झाला , तू बस interviews देत...
- एक ना अनेक...
          फक्त आणि फक्त तुलना. लहानपणापासूनच याची सुरुवात. यातूनच इर्ष्येचा जन्म होतो , आणि हवं ते हवं तसं नाही मिळालं कि नाराजी. मग परत तुलना , अजून नाराजी. आजकाल तर नाराजीचं प्रमाण खूपच वाढतंय. या 'तुलने'मुळं तर नाराजीचं प्रस्थ(!) खूपच वाढतंय. लोक अगदी क्षुल्लक कारणांमुळं नाराज होतात. त्यांचे "संकटाचे दिवस" सुरु झालेत , आता काही होऊ नाही शकत असं त्यांना वाटू लागतं. आणि मग सुरु होतो , "दुःखाचा काळ(!)" , "साडेसाती" , "संकटाचा विळखा" , आणखी काही , आणखी काही. मग नाराजीचं प्रमाण अजूनच वाढत जातं.
          एक कथा आठवली मित्रांनो. या नाराजीवरून...
एकदा अकबराने दरबारात सांगितलं की , मला एक अंगठी हवीय. जिच्यावर काहीतरी मजकूर कोरलेला असेल. जो वाचून मला सगळ्या दुःखांचा विसर पडेल आणि मी सगळं विसरून पुन्हा आनंदाने दिवसाची सुरुवात करेन ; आणि जर मी आनंदी असेन तर तिच्याकडे बघून मला वास्तवाची जाणीव होईल आणि मी हवेत नाही जाणार...
या कामासाठी अकबराने दरबाऱ्यांना ३ दिवसांची मुदत दिली. ३ दिवसात जो कोणी अशी अंगठी बनवून आणेल त्याला जंगी इनाम घोषित केलं.
३ दिवसांनी कामकाज संपल्यानंतर अकबराने दरबारात अंगठी बाबतची आठवण करून दिली. तर सगळ्यांनी त्यांना जमेल तशी अंगठी बनवून आणलेली.
सगळ्या अंगठ्यांवर केवळ आणि केवळ अकबराची स्तुतीसुमने होती , सुविचार होते . पण ते वाचून काही अकबर खूष होईना . त्याला हवी तशी अंगठी मिळत नव्हती .
सरतेशेवटी बिरबलाने त्याची अंगठी पेश केली . त्यावरील मजकूर वाचून अकबर आनंदला , त्याला हवी तशी अंगठी मिळाली . बिरबलाला त्याने विजयी घोषित केले.
काय लिहलं होतं त्या अंगठीवर माहितीये ?
त्यावर लिहलेलं , "हे ही दिवस जातील..."
         म्हटलं तर ही एक छोटीशी कथा. म्हटलं तर आनंदी किंवा समाधानी राहण्याची छोटीशी गुरुकिल्ली. आपण दुःखी असतो , नाराज असतो तेव्हा एकच आठवायचं , " हे ही दिवस जातील." आनंदी असू प्रसन्न असू तर , बाकीच्यांना उगाच खिजवायचं नाही. समाधानी राहायचं. लक्षात ठेवायचं ," हे ही दिवस जातील!" आपण काय करतो माहितीये? स्वतः सुखी असलो ना , बस्स! बाकीचे गेले खड्ड्यात! आपल्याला काय करायचंय...! हो ना? मित्रांनो , आपण सुखी असू तर थोडे प्रयत्न करून बाकीच्यांना सुद्धा सुखी केलं , प्रसन्न केलं तर काय बिघडतंय? आपल्या आजूबाजूचे समाधानी असतील तर , आपल्याला छान नाही का वाटणार?
        
कधी केलाय विचार?
रस्त्यात कुणा आजोबांना रस्ता पार करताना थोडी मदत केली तर...?
कुणी मित्र-मैत्रीण नाराज असताना २-३ फालतू जोक्स सांगून तिला हसवलं तर...?
कोणाला एकटं एकटं वाटत असताना त्याला समजून घेऊन त्याला साथ दिली तर...?
कुणा गरजूची गरज भागवली तर...?
नक्कीच यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर येणाऱ्या स्मितहास्याने आपल्याला समाधान वाटेल...हो का नाही?
त्यांच्या आयुष्यातील एक खराब दिवस आपण आनंदी केला , तर नक्कीच आपल्यालाही आनंद होईल.
आणि हो , त्यांना पण आपण जरूर सांगायचं कि , "हे ही दिवस जातील!"
यामुळे आपण काही काळ तरी आपलं दुःख विसरु , नक्कीच.
-आवडता संघ जिंकू शकला नाही...नाराजी
-त्याने/तिने नकार दिला...नाराजी
-परीक्षेत मार्क्स कमी मिळाले...नाराजी
-एखादवेळी हवं तसं नाही घडलं...नाराजी
-घरचे ओरडले...नाराजी
-नोकरीत / व्यवसायात एखादा उतार आला...नाराजी
-एक ना अनेक...
-नाराज होणं अशावेळी , नक्कीच मान्य आहे. पण यातून लवकरात लवकर बाहेर पडणं , आपल्यासाठी नाही तर इतरांसाठीही गरजेचं असतं. अशावेळी नक्की वरील वाक्य आठवायचं , आणि सगळं विसरून समाधानाने जगायचं. "हे ही दिवस जातील !"
          मित्रांनो , एक लक्षात घ्यायलाच हवं कि , प्रत्येकाच्या आयुष्यातली दुःख , संकटं वेगळी असतात , नक्कीच. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या दुःखांची खोली वेगवेगळी. दोन जणांची दुःख कधीच compare नाही करू शकत आपण. प्रत्येकाला जाणवणारी दुःख वेगळी. प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ घातलेली संकटं वेगवेगळी. पण काही असलं तरी आपला उपाय मात्र लक्षात ठेवायचा. फक्त लक्षातच नाही ठेवायचा , तर अमलात पण आणायचा. कुठला उपाय विचारताय...? अहो हाच, "हे ही दिवस जातील..."
          तर , मित्रांनो , नेहमी खुशीत आणि समाधानात जगायचं. इतकंच नाही तर, आपल्या आजूबाजूच्यांना पण समाधानी करायचं. सगळ्यांना आनंदात ठेवायचं , आपण पण आनंदी राहायचं. आयुष्य सुंदर आहेच , ते अजून जास्तीत जास्त कसं सुंदर होईल , हे पाहायचं. आपण आनंदी , तर जग आनंदी. आपण समाधानी तर , समाज सुखी. मजेत राहायचं. आणि , जर कधी tension आलं, संकट आलं, एकटं एकटं वाटत असेल , सगळ्याचा कंटाळा आला असेल तर एक मात्र लक्षात ठेवायचं , "हे ही दिवस जातील!!!"

©श्रेयस_जोशी

Comments

Popular posts from this blog

नातं

अडथळ्याची शर्यत

संवाद