अडथळ्याची शर्यत

लग्न...
असं म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या असतात. म्हणजे कुठले २ जीव आयुष्यभर एकमेकांची साथ निभावणार हे अगोदरच ठरलेलं असतं. असो...
आता , लग्न म्हणजे २ जीवांचे आयुष्यभरासाठी मिलन ( फक्त त्यांच्यासाठीच . बाकीच्यांकरिता १ दिवसाचा आनंदसोहळा(!) ). आपल्या संस्कृतीनुसार अगदी "साता-जन्मासाठीचं" ! पण , काळाच्या ओघात 'काळ'च बदलला आणि या मिलनासाठी सुद्धा एक ना अनेक अडथळे उभारले गेले आणि लग्न म्हणजे जणू अडथळ्यांची एक शर्यतच झाली ! एखाद्याला लग्न करायचं असेल , तर हे अडथळे पार केल्याशिवाय तो सुखानं वैवाहिक जीवन जगूच शकत नाही. कारण , लग्न ठरवताना , त्या २ जीवांना काय वाटतं यापेक्षा ; समाज काय म्हणेल , शेजारी काय म्हणतील , सामाजिक प्रतिमा डागाळेल का , जोडा कसा दिसतो ,  हे मुद्दे महत्त्वाचे ना !!! मग जरी ती दोघं एकमेकांना पसंत असेनात का , ती एकमेकांसोबत compatible असेनात का , वरील महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतल्याशिवाय आणि हे ९ कोटी ५७ लाख अडथळे पार केल्याशिवाय त्यांचं वैवाहिक जीवन सुखी होऊच शकत नाही . कारण , ते एकमेकांसाठी किंवा एकमेकांच्या कुटुंबासाठी नाही , तर समाजासाठी जगत असतात ना... !!!
समाज काय म्हणेल हा अडथळा तर सर्वात मोठा . सगळ्यात मोठी उंची याचीच . याला पार केलं , कि ते २ जीव मोकळे !
"अरे , ती किती सुंदर आहे , हा कुठे ?"
"अरे , त्याच्या पेक्षा जास्त कमावते ना ? मग हिला भिकेचे डोहाळे कुठं लागले ?"
"अगं , तो किती उंच आहे ! त्याच्या खांद्याला पण नाही लागत ती ! Eifel Tower  आणि आपल्या सोसायटीच्या बिल्डिंगचं लग्न असल्यासारखं वाटतंय !"
"अगं , ती किती गोरीपान आहे , ह्या काळ्याला कसं काय पसंत केलं ? काय डोळ्यावर पट्टी बांधून गेलेली का पसंतीच्या वेळी !!!"
"जात जमत नाही हा , तरी लग्न करतायत ! शिव , शिव , शिव ! आमच्या वेळी चालायचं नाही बाबा असं ! मला तर हाकलूनच दिलं असतं घरातून . आजची पिढी जुमानत नाही बघ कुणाला ! असो ."
"अरे तो शहरात आहे ना नोकरीला ? ह्या गावठीला कुठून पसंत केलं ? शहरातल्या मुली संपल्या का काय !!"
"अगं , किती जाड आहे तो ? आणि ती बघ , अगदी चवळीची शेंग ! कित्ती विजोड !!"
"अगं , निदान आपल्यातली तरी बघायची ! हे गुजराती वगैरे काय ??"
अशा एक ना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करायची असते , त्या दोघांना . हो , फक्त त्या दोघांनाच ! मुलांचं लग्न ठरवताना , लग्नानंतरची आपली(कुटुंबाची) सामाजिक प्रतिमा काय असेल, हा घरातल्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न ! कारण , समाज महत्त्वाचा शेवटी ! समाज त्यांच्यावर सुखी , तर ती दोघं एकमेकावर सुखी ! काय...?
बरं , ह्यात अजून भर म्हणजे , असतील तर , एकमेकांविषयी अचानक उदभवणाऱ्या अटी ! आता समाजालाच कळतं ना , कि त्या दोघांचं सुख कशात आहे ते ! तर , अशाच काही सामाजिक घटकांकडून , ज्यांना त्या दोघांची , त्यांच्या विवाहोत्तर आयुष्याची अपूर्व काळजी (!) असते  , या अटींचा उगम होतो ! आणि जन्म होतो नवीन अडथळ्यांचा ! यात अनेक अटी असतात , काही "अती" असतात ! घर , compatibilty , वेळ देणे / घेणे , वगैरे ,असो...सुज्ञास सांगणे न लगे...!
हे अडथळे पार केले की मग घरचे अडथळे सुद्धा पार करावेच लागणार ! मग यात पत्रिका मिलनापासून ते लग्न खर्चापर्यंतचे सगळे ! महत्त्वाचे ते पत्रिका मिलन ! मुलीच्या पत्रिकेत "मंगळ" असला की , ते अशुभ असतं ना...मुलगी नापसंत  ! मग तुमच्यात किती का understanding असेना !
त्या ३६ पैकी १८ गुण जुळले तर तुम्हाला licence मिळू शकतं , बोहल्यावर चढण्याचं ! मग तुम्ही किती का compatible असा एकमेकांना , गुण मिलन महत्त्वाचं . १८ च्या वर गुण जुळले तरच तुम्ही एकमेकांशी "जुळवून" घेऊ शकता , असं त्या कागदाचं म्हणणं !
हा काही(!) लोकांच्या श्रद्धेचा भाग असल्यामुळं , असो...
या अडथळ्याच्या शर्यतीत खूप जपून धावावं लागतं त्या २ जीवांना . काळजीपूर्वक , एकमेकांना समजून घेऊन पार करावा लागतो एक-एक अडथळा !कारण एखादा अडथळा तुम्हाला पार नाही करता आला तर, तुमची "पसंती किंवा प्रेम" नावाची नौका 'पार' नाही होऊ शकत , 'लग्ना'च्या काठी! काय?...
जर Love-Marriage असेल तर या अडथळ्यांची उंची दुप्पट होते , as compared to Arrange marriage ! तुम्हाला खूप अडथळे , उंच उंच उड्या मारून पार करावे लागतातच , १००% ! अशा case मध्ये घरच्या अडथळ्यांची उंचीही वाढते ! यातला सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे 'जात' .( महाराष्ट्रात आंतरजातीय विवाहाचं प्रमाण केवळ ५% इतकं आहे ! ) त्यानंतर उंची , वर्ण , पगार , रहिवास सगळे आलेच ! Arrange Marriage मध्ये त्यामानाने कमी त्रास होतो घरगुती अडथळ्यांचा ! अनुभवी सांगतीलच तुम्हाला...काय?...
असे अनेक अडथळे पार करून मग झालाच(!) तर एक लग्नसोहळा संपन्न होतो... आणि त्या दोन जीवांचं वैवाहिक जीवन सुरु होतं (अर्थात समाजाच्या कृपेनेच). होता होता त्यांनाही मूल होतं . मोठं होतं , वयात येतं आणि धावायला लागतं , एका नवीन "अडथळ्याच्या शर्यतीत" !...
कुर्यात सदा मंगलम् |
शुभ मंगल "सावधान"(!)||

©श्रेयस_जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नातं

संवाद