हृदयां-तर

तशी त्याला वाचनाची आवड लहानपणापासूनच. लहानपणापासून व.पू., मतकरी अगदी जवळचे. बोकील, पु.ल., शिरवळकर यांच्याशी सोयरिक. दररोज अग्रलेखाचं वाचन तर अगदी न चुकता. एकूणच पुस्तकांशी माणसांपेक्षा मैत्री जास्त. रोज न चुकता काही ना काही वाचणारच. त्याशिवाय त्याला चैन पडत नसे. सगळे भले लेखक त्याचे आदर्श. पण, अभ्यासात मात्र तो अतिशय साधारण होता. यावरून घरच्यांची बोलणीही त्याला ऐकावी लागत. त्याच्या आजूबाजूच्या शेजारील मुलांशी त्याची अनेकदा तुलना होई. शेवटी काही म्हटलं तरी, हाताची पाचही बोटं सारखी नसतात. याला तो तरी काय करणार!? तो पुढे कॉलेजला आला. व्यासंगात तरी खंड नव्हता. त्याचं कॉलेज म्हणजे आंतरमहाविद्यालयीन नाट्य-स्पर्धेत त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसाठी कटू स्वप्न. या नाट्य-स्पर्धेत त्यांचा प्रचंड दबदबा. केवळ यांचं नाव ऐकूनच प्रतिस्पर्धी शांत होत. अशा कॉलेजमध्ये तो दाखल झाला. होताहोता कलामंडळाशी त्याचा संपर्क आला. नाटक म्हणजे काय, याची वरवर माहिती अगोदर असल्यामुळे तो हळूहळू कलामंडळात रुळला. या एका शैक्षणिक वर्षात त्याल...