स्वप्नातलं सत्य

"काही समजलं का पत्रिका बघून? का होत असेल असं?"
हृषीकेश ज्योतिषाचार्य भार्गवांसमोर बसला होता. त्याचे घरगुती गुरुजी. हृषीकेशच्या घरचे भार्गवांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करत नसत. आज हृषीकेशचं वैष्णव घराणं एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित घराणं म्हणून समाजात वावरत होतं. असं असलं तरीही वैष्णवांकडे अगदी छोट्या छोट्या कामात भार्गव गुरुजींचा सल्ला नेहमीच विचारात घेतला जात असे. तरीही हृषीकेशचा मात्र ज्योतिष विद्येवर अजिबात विश्वास नव्हता. त्याला वाटायचं की, ग्रह-नक्षत्र-तारे वगैरे बघत बसण्यापेक्षा, कष्टावर विश्वास ठेऊन स्वतःच्या हाताने नशीब घडवायचं असतं. यावरून त्याची नेहमीच घरच्यांशी मतमतांतरे होत. आज मात्र घरच्यांच्या सांगण्यावरून, केवळ त्यांच्या समाधानासाठी तो भार्गवांना भेटायला आला होता. पत्रिका भार्गवांसमोर ठेऊन बराच वेळ झाला तरी ते काही बोलत नाही म्हणून न राहवून त्यानं प्रश्न विचारला. भार्गवांनी मान वर करून त्याच्याकडं बघितलं आणि मानेनंच थोडा वेळ थांबायचा इशारा केला. हृषीकेश हाताचे चाळे करत भार्गवांचं पत्रिका वाचन कधी संपतं याची वाट बघत बसला. थोड्या वेळाने भार्गवांनी शांततेचा भंग करत हृषीकेशला विचारलं, "कधीपासून होतोय हा स्वप्नाचा त्रास?"
"साधारण ७-८ महिने होऊन गेले. Exactly कधीपासून ते perfect नाही सांगता येणार."
"ठीक. फोनवर तपशीलवार नाही सांगितलंस. एकदा नक्की काय होतं ते सांगशील का?"
"हो. म्हणजे साधारण सुरुवात अशी होते की, मी गाडी चालवत असतो. इतक्यात समोरून वेगाने एक कार येते आणि मला जोरात धडक देते. मी खाली पडतो. मला अंधुक अंधुक दिसत असतं. कारमधून दोनजणं उतरतात. ड्रायव्हर माझ्याजवळ येतो. लांबूनच माझ्याकडं बघतो आणि दुसऱ्याला काहीतरी खुणावतो. दुसरा बिथरतो आणि लगेच ड्रायव्हरला गाडी चालू करायला सांगतो. दोघं लगेच कारमध्ये बसतात आणि निघून जातात. हे सगळं मी अंधुक अंधुक बघत बसलेला असतो. अंगात ओरडायचाही त्राण नसतो. झालं. लगेच दचकून जाग येते."
"साधारण कधी होतंय असं?"
"महिन्यातून एकदा. कधीकधी २ महिन्यांनी."
"ठीक. म्हणजे विशिष्ट कालावधी नाहीये. आत्ता नुकतंच कधी झालं?"
"कालच. चौथ्यांदा स्वप्न दिसल्यावर आईने तुम्हाला कॉल केला आणि मला भेटायला पाठवलं."
"ठीक. तसं तर ऐशी ते नव्वद टक्के स्वप्नं आपण जाग आल्या आल्या विसरतो. काहीच स्वप्नं आपल्या लक्षात राहतात. त्यातूनही तुझ्या सगळंच्या सगळं स्वप्न जसंच्या तसं लक्षात राहतंय आणि त्याहूनही विलक्षण म्हणजे तसंच स्वप्न तुला पडतंय. घटनांमध्ये काहीही बदल न घडता. बरोबर?"
"हो."
"आश्चर्यच आहे. खरं सांगायचं तर अजून तरी मला स्वप्नाबद्दल नक्की काही कळत नाहीये. तो माझा प्रांत नव्हे, पण तुझ्या पत्रिकेत बघता लवकरच काहीतरी विलक्षण घटना तुझ्यासोबत घडणार आहे."
"एक मिनिट, विलक्षण म्हणजे चांगली का वाईट?"
"नाही नाही! चांगलीच घटना. पण असं दिसतंय की, त्याबद्दल तुला फारसं कोणाकडे व्यक्त होता येणार नाही. सध्या तरी इतकंच सांगता येईल. मी तरीही पुन्हा एकदा पत्रिका बघतो आणि काही वेगळं जाणवलं तर कळवतोच."
"ओके मग. येतो मी."
भार्गवांना नमस्कार करून हृषीकेश निघाला. तो दाराशी जाताच भार्गवांनी काहीतरी आठवल्यासारखा त्याला आवाज दिला. हृषीकेश दारातच थांबला. 
"काही झालं तरी तुझी गुपितं तुझ्याकडेच ठेव. त्यात तुझंच भलं राहील."

हृषिकेशने मानेनेच होकार दिला आणि तो त्यांच्या घराबाहेर पडला. घरी परत जाताना तो स्वप्नाचाच विचार करत होता. तेच स्वप्न, जसंच्या तसं, अगदी काहीही बदल न होता दिसत होतं. दचकून जाग येताना त्याला जोरात ओरडावसं वाटत असे, पण आवाज घशातच दाबला जाऊन घुसमटायला होत असे. त्याला हे असह्य झालं, तेव्हा मात्र घरच्यांनी भार्गवांना भेटायला सांगितलं. त्याचा विश्वास असो वा नसो. परंतु या भेटीतून काहीच निष्पन्न नव्हतं झालं. विचार करत करतच हृषीकेश घरी पोहचला.
हृषीकेश घरी आला आणि सरळ आपल्या खोलीत जाऊन बसला. त्याला लगेच टोकायला नको म्हणून आई बाबा काय झालं विचारायला त्याच्या मागेमागे आले नाहीत. हृषीकेश खोलीत जाताना, 'त्याला शांत होऊ दे मग आपण बोलू' असं डोळ्यांनीच बाबांनी आईला खुणावलं. आईनेही मानेनेच होकार दिला. हृषीकेश खोलीत आला आणि दार लावून घेऊन, खुर्ची टेबलाजवळ ओढून ओंजळीत चेहरा ठेऊन भिंतीकडे शांत बघत बसला. त्याची खोली अगदी टापटीप ठेवलेली होती. बेड, बेडच्या बाजूला एक साईड टेबल. साईड टेबलवर नाइट लॅम्प. हृषीकेशला अंधाराची भीती कधी वाटलीच नव्हती, तरीही आईनं दिलेलं छोटंसं गिफ्ट म्हणून त्यानं तो साईड टेबलवर ठेऊन दिला होता. मात्र त्याला कधीच त्या लॅम्पची गरज पडली नाही. बेड समोरच त्याचा छोटेखानी वॉर्डरोब. त्याच्या बाजूला एक फुल साईज आरसा. वॉर्डरोबला लागूनच त्याच्या पुस्तकांचं कपाट. अगदी सगळ्या प्रकारची पुस्तकं त्या कपाटात होती. कविता, कादंबरी, कथा, ललित, धर्मग्रंथ, सगळं काही. मराठी, हिंदी, इंग्रजी सगळ्या भाषांतली. फक्त भाषाच कशाला अगदी ब्रेल लिपीतली पुस्तकंपण होती. बेडच्या डाव्या बाजूला त्यानं अभ्यासासाठी वगैरे टेबल ठेवलं होतं. त्याच्यावरच हात ठेऊन, हातांच्या ओंजळीत डोकं खुपसून तो विचार करत होता. आता काय करावं, हे स्वप्नाचं कोडं कसं सोडवावं याचा विचार करता करता सहज त्याचं लक्ष पुस्तकांच्या कपाटाकडे गेलं. तिथं फ्रॉइडचं इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स ठेवलं होतं. बऱ्याच जणांच्या तोंडून त्याचं वर्णन ऐकून ऐकून अगदी कंटाळला होता हृषीकेश. सध्या मात्र त्याला स्वतःच्या स्वप्नातही इंटरप्रिटेशन करता येत नव्हतं.

हृषीकेश सगळी पुस्तक बघत बसलेला. लांबूनच. बघता बघता आपल्या स्वप्नाचाही विचार करत होता. यामुळे त्याची तंद्री लागली होती. दारावर झालेल्या टकटकीने त्याची तंद्री भंगली. सहज त्यानं घड्याळाकडं बघितलं, तर दीड वाजला होता. म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास तो तसाच काही न करता बसून होता. खुर्चीतून झटकन उठून त्यानं दार उघडलं. आई होती. हृषीकेशला जेवायला बोलवायला आली होती. 
"काय रे? आल्यापासून अगदी गप्प गप्प आहेस. काय काय बोलणं झालं भार्गवांकडं?"
"काहीच विशेष नाही. जे मला वाटलं होतं तेच झालं. हे ज्योतिष बीतीश वगैरे सगळं थोतांडच. फक्त आईनं सांगितलं म्हणून मी त्यांना भेटून आलो. पत्रिका वगैरे बघून झाल्यावर ते म्हटले, मला काही कळत नाहीये."
"बाकी काहीच नाही सांगितलं अजून?"
"काही नाही. ते नेहमीचंच. तुझ्यासोबत एखादी चांगली घटना घडणार आहे. तुझी सिक्रेट तुझ्याकडेच ठेव. असं न तसं."
"मग आता काय करायचं? याचं काही ना काहीतरी सोल्युशन मिळालंच पाहिजे."
"मी नेटवर बघितलंय. दोन-तीन चांगले सायकॅट्रिस्ट आहेत. सगळ्यांचे रिव्ह्यू बघितले. त्यातल्या त्यात मला डॉक्टर संतोष खूपच चांगले वाटतायत."
"मग भेटून यायचं का त्यांना? अपॉइंटमेंट घेतो मी लगेच. त्यांचा काही नंबर वगैरे मिळाला का?"
"हो. नंबर मिळालाय आणि मी परवाची अपॉइंटमेंट पण घेऊन ठेवली आहे. मी येतो जाऊन एकटा. काही प्रॉब्लेम नाही."
"पहिल्या अपॉइंटमेंटला एकटा नको जाऊ. परवा आई येईल सोबत. जर अजून दोन-तीन वेळा बोलावलं त्यांनी, तर मग जा एकटा."

दोन दिवसांनी हृषीकेश आणि त्याची आई ठरल्याप्रमाणे डॉ. संतोषांकडे गेले. त्यांचे क्लिनिक लहान पण एकदम आटोपशीर होतं. आत गेल्या गेल्या रिसेप्शनिस्टच्या मागच्या भिंतीवर फेमस सायकॅट्रिस्टचे कोट्स लावले होते. रिसेप्शनिस्ट टेबलही एकदम आटोपशीर होतं. क्लिनिक असूनही आत गेल्या गेल्या एकदम प्रसन्न वाटत होतं. हृषीकेशच्या आधीचा पेशंट बाहेर आल्यानंतर दोघेजण आत गेले. डॉ. संतोषनी एकदम प्रसन्न मुखाने दोघांचं स्वागत केलं. लगेचच आल्याबद्दलचं कारण न विचारता त्यांनी आधी बाकीची माहिती विचारली. नाव, गाव, पत्ता, शिक्षण इत्यादी विचारून झाल्यानंतर त्यांनी त्याला क्लिनिकमध्ये येण्याचं कारण विचारलं. तो सांगायला सुरुवात करणार इतक्यात डॉक्टरनी त्याच्या आईला बाहेर बसायला सांगितलं. त्यांचं असं म्हणणं होतं की, पेशंट एकटा असताना जितका खुलून बोलेल तितका तो कुणासोबत असताना बोलू नाही शकत. म्हणून त्यांनी नम्रपणे त्याच्या आईला थोडावेळ बाहेर बसण्यास सांगितलं. हृषीकेशची आई बाहेर जाऊन रिसेप्शनपाशी बसली. डॉक्टरांनी हातानेच हृषीकेशला सांगण्याची खूण केली. हृषीकेशनं सगळं इत्यंभूत सांगितलं. डॉक्टरांनी त्याला मध्ये कुठेही तोडलं नाही. 

"मी तुम्हाला पूर्ण आधीपासून नाही सांगत. तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे. थोडक्यात सांगायचं तर, आता मागच्या साधारण पाच-सहा महिन्यांपासून मला एकच स्वप्न पडतंय. मला स्वप्नाचा पॉईंट ऑफ व्ह्यू नक्की कळत नाहीये. पण स्वप्न असं असतं की, कोणीतरी बाईकवरून चाललंय. त्याला समोरून जोरात कारची धडक बसते. तो बाईक वरून पडतो. त्याला प्रचंड मार लागतो. त्याच अवस्थेत तो कारवाल्याला मदतीची याचना करत असतो. कारवाला आरामात मदत करू शकत असतो, पण त्याच्या मनात काय येतं काय माहित? तो एक दोनदा बाईकवाल्याकडे बघतो. काहीतरी विचार करतो आणि लगेच कार चालू करून निघून जातो. बाईकवाला तिथंच तडफडत पडलेला असतो. मला एक दोनदा हे स्वप्न पडलं. मी दुर्लक्ष केलं. पण या महिन्यात एक आठवड्याच्या अंतरात दोनदा हे स्वप्न मला दिसलं. स्वप्न संपताना मी मदतीसाठी खूप जोरात ओरडायचा प्रयत्न करतो. पण माझा आवाज घशातच राहतो. घुसमटून दचकून जाग येते. खरं सांगायचं तर तुमच्याकडं येण्याआधी मी ज्योतिषाचार्य भार्गवांकडे गेलो होतो. अर्थात माझा या गोष्टींवर विश्वास नाही पण, घरच्यांनी सांगितल्यामुळं त्यांना एकदा भेटून आलो. त्या भेटीत काहीच सार्थ झालं नाही. आता तुम्हाला भेटायला आलोय. मला यातून बाहेर पडायचंय. मला अशी आशा आहे की, तुम्ही यात नक्कीच मदत कराल. काहीही होऊ दे, फक्त ते स्वप्न दिसायचं थांबलं पाहिजे."

हे सगळं ऐकताना डॉ. संतोषांच्या चेहऱ्यावरचे भाव हळू हळू पालटत होते. कुतूहल, संभ्रमापासून आनंदापर्यंत सगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर तरळून गेले. पूर्ण ऐकून घेतल्यावर त्यांचा चेहरा एकदम शांत होता. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि हृषीकेशला म्हणाले - 

"मी आतापर्यंत बाहेर अशा बऱ्याच केसेस ऐकल्या होत्या- सतत एकच स्वप्न पडणे. पण स्वतःहून कधी त्यावर काम करायची संधी नव्हती मिळाली. तुझी केसही तशीच आहे आणि माझ्यासाठी पहिलीच आहे. त्यात तुला स्वप्न एकदम स्पष्ट आठवत असल्यामुळं आपण बहुधा स्वप्नातल्या लोकांच्या थोडंसं जवळ जाऊ शकतो अशी मला आशा आहे. पण, यासाठी वेळ आणि पेशन्स खूप लागेल. तुझी तयारी असेल तर सांग."
"हो डॉक्टर. माझी तयारी आहे नक्कीच. पण तरी साधारण किती वेळ लागेल?"
"खरं सांगायचं तर माझ्यासाठी हा एक संशोधनाचा विषय आहे. मी कधीपासून या संधीची वाट बघत होतो. मला एक हेल्मेटसारखं मशीन तयार करावं लागेल. त्यावरून तुझ्या मेंदूच्या लहरींचा अभ्यास करता येईल. अर्थात हे कसं करायचं याची रूपरेषा माझ्याकडं तयार आहे. आपल्या मेंदूत माहिती साठत जात असते. तुला जे काही आठवतं असं वाटतं, ते त्या साठ्यातून या लहरींनी तुझ्यापर्यंत पोहचवलं असतं. आपल्याला या प्रचंड साठ्यातून थोड्या थोड्या भागाचा अभ्यास करावा लागेल. एक एक भाग सिम्युलेट करून तुझ्या स्वप्नातली माहिती कुठं साठली आहे ते शोधावं लागेल. जर हे करता आलं आणि योग्य तो भाग आपल्याला मिळाला, तर तुझं स्वप्न आपल्याला जसंच्या तसं स्क्रीनवर बघता येईल!"
"तुम्ही सांगताय त्यातलं सगळंच नाही कळलं मला. पण ऐकून असं वाटतंय की, खूप वेळ लागेल."
"हे बघ हृषीकेश हा माझ्यासाठी एक नवा संशोधनाचा विषय आहे. जर आपला प्रयोग यशस्वी झाला, तर मी नक्कीच याच्या पेटंटसाठीसुद्धा प्रयत्न करू शकतो. मी हे एक चॅलेंज म्हणून स्वीकारतो. त्यामुळे तुला पुढच्या सगळ्या व्हिजीट फ्री असतील. तुला कधी वेळ असेल सांग?"
"माझं सध्या कॉलेज चालू आहे आणि परीक्षाही जवळ नाहीत. त्यामुळं आपण दर शनिवार रविवारी यासाठी भेटू शकतो नक्कीच."
"ठीक आहे मग. दर शनिवार रविवारी तीन ते चार तासासाठी भेटू. वेळेचं कळवतो मी तुला."

या भेटीनंतर डॉ. संतोषनी लगोलग आपला उपकरणावर काम करायला चालू केलं. त्यांच्या मनासारखं उपकरण बनवायला त्यांना जवळपास दोन ते तीन आठवडे लागले. त्याला त्यांनी नाव दिलं BWS - ब्रेन वेव्ह सिम्युलेटर. हे उपकरण असं काम करत होतं की, ज्याच्या कुणाच्या स्वप्नांच्या प्रदेशात आपल्याला शिरायचंय, त्याच्या डोक्यावर BWS ठेवायचं. BWS ठेवल्यानंतर मेंदूतला एक एक अगदी छोटा भाग सिम्युलेट करायचा. सिम्युलेट करताच कॉम्प्युटरवर आपल्याला दिसेल की, मेंदूचा नक्की कुठला भाग उद्दीपित झाला आहे. असं झाल्यानंतर त्या त्या भागातल्या आठवणी पेशंट हिप्नोसिसनुसार घडाघडा बोलून दाखवेल. कुठल्याही आठवणी कुठल्याही भागात साठवलेल्या असू शकतात, त्यामुळे एका विशिष्ट स्वप्नाचा मागोवा घेताना मेंदूतले खूप सारे छोटे छोटे भाग सिम्युलेट करणं गरजेचं होतं. यामुळे टेस्टिंगला नक्कीच खूप वेळ लागणार होता. आता BWS तयार होतं. लवकरच त्यांना त्याचं टेस्टिंग करायचं होतं. आधी ठरवल्याप्रमाणं डॉक्टरांनी हृषीकेशला शनिवार रविवार संध्याकाळी ५ ते ९ ची वेळ दिली. हृषीकेशही या वेळेसाठी तयार झाला. संध्याकाळची वेळ असल्यामुळं दोघांनाही आपापली काही महत्त्वाची काम असतील, तर ती सकाळी करता येणं आरामात शक्य होतं. तसंच संध्याकाळी त्यांना इतर कुणी डिस्टर्ब करायची शक्यता कमीच होती. पुढच्याच आठवड्यापासून हृषीकेशच्या या प्रयोगासाठी व्हिजिट्स चालू झाल्या. पहिल्या दोन-तीन व्हिजिटमध्ये जास्त काही हाताला आलं नाही. अर्थात पहिल्या दोन-तीन व्हिजिटमध्ये यश मिळण्याची शक्यता तशी कमीच होती कारण, प्रचंड मोठ्या डेटावर त्यांना काम करायचं होतं. मेंदूचा प्रत्येक छोटा छोटा भाग सिम्युलेट करत त्यात कुठली माहिती साठवली गेली आहे याचा शोध घेत त्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं होतं. कुठल्याच भागात एका विशिष्ट प्रकारची माहिती साठवलेली नव्हती. म्हणजे एका छोट्या भागात समजा हृषीकेशच्या लहानपणीच्या आठवणी असतील, तर त्याच्या लगेचच्याच भागात तो कॉलेजला जायला लागल्यानंतरच्याही आठवणी होत्या. प्रत्येक छोटा छोटा भाग सिम्युलेट केल्यानंतर हृषीकेश हिप्नोसिस केल्यासारखा त्या भागातल्या आठवणी बोलून दाखवत होता. टेस्टिंगदरम्यान बऱ्याच आठवणी हृषीकेशनं बोलून दाखवल्या. त्याचा पाचवा वाढदिवस, त्याला एकदा गिफ्ट म्हणून मिळालेली पहिली रिमोटची कार, वेगवेगळ्या प्राण्यांचं स्पर्शातून झालेलं ज्ञान, शाळेचा पहिला दिवस, कॉलेजचा पहिला दिवस, दहावीची परीक्षा, बारावीची परीक्षा, लहानपणी खेळलेले वेगवेगळे खेळ, बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी धडपडणं अशा बऱ्याच चांगल्या, वाईट, आनंदी, दुःखी आठवणी हृषीकेशनं सांगितल्या. हृषीकेशचं प्रत्येक वेळचं बोलणं रेकॉर्ड करून ठेवावं लागायचं. म्हणून प्रत्येक वेळी स्क्रीन वापरता येणं शक्य नव्हतं. कारण जर या छोट्या छोट्या टेस्टिंगसाठी स्क्रीन वापरली असती तर ऑडिओ आणि व्हिडिओ मिळून खूप मोठा डेटा स्टोअर करायला लागला असता. जर दिवसा अखेर काही साध्य झालं नसतं तर हा पूर्ण डेटा डिलीट करायला लागला असता. हे काम तसं किचकट होतं. साहजिकच प्रत्येक व्हिजिटला खूप मोठा ऑडिओ डेटा स्टोअर करायला लागत होता. तसंच स्वप्नापर्यंतच्या भागात पोहोचता न आल्यामुळं त्या दिवशीचा पूर्ण डेटा त्याच दिवशी डिलीट करायला लागत होता. हे जवळपास सात आठ व्हिजीट्स पर्यंत चालू राहिलं. जशा जशा व्हिजिट्स पूर्ण व्हायच्या, तसं तसं डॉक्टरांना नवीनच उभारी मिळत होती. हवा तो भाग मिळण्याच्या शक्यता उंचावल्यासारखं वाटत होतं. पहिल्या चार व्हिजिट्सनंतर त्यांना जाणवलं की, हे काम थोडं अवघड आहे पण अशक्य अजिबात नाही. इतक्या मोठ्या डेटावर काम केल्यानंतर अखेरीस त्यांना नवव्या व्हिजिटमध्ये मेंदूतला हवा तो भाग सिम्युलेट करताना सापडला. याच भागामध्ये हृषीकेशचं ते स्वप्न होतं. तो भाग सिम्युलेट करताच हृषीकेशनं त्याला पडणारं स्वप्न जसंच्या तसं सांगितलं. अगदी इत्यंभूत. हा भाग सापडताच डॉ. संतोष आनंदातिशयाने जवळजवळ ओरडलेच! हवी असलेली गोष्ट तर मिळाली होती पण, प्रत्येक व्हिजिटला प्रचंड मोठ्या डेटावर काम करायला लागत असल्यामुळे त्यांनी स्क्रीनची व्यवस्था लगेच नव्हती केली. डॉक्टरांनी परत एकदा शून्यापासून हव्या असलेल्या भागापर्यंत कसं पोहोचायचं हे बघून घेतलं आणि हृषीकेशला पुढच्या शनिवारी एका शेवटच्या व्हिजिटसाठी बोलावलं.

दोघेही त्या स्वप्नाविषयी जाणून घ्यायला प्रचंड उत्सुक होते. शनिवारच्या व्हिजिटसाठी डॉक्टरांनी सगळी व्यवस्था केली होती. BWS ला अगदी व्यवस्थितपणे स्क्रीन जोडली होती. सिम्युलेट करताना जे काही मेंदूच्या त्या भागात असणार होतं ते जसंच्या तसं स्क्रीनवर दिसणार होतं. अतिप्रचंड औत्सुक्याने डॉ. संतोषनी प्रयोगाला सुरुवात केली. BWS हृषीकेशला हेल्मेटसारखं घातलं आणि मागच्या आठवड्याच्या आपल्या नोट्स बघत आपल्याला हव्या त्या भागापर्यंत डॉक्टर हळूहळू पोहोचू लागले. स्वप्न साठवलेला भाग लगेचच मिळाला. तो सिम्युलेट करताच स्क्रीनवर हृषीकेशचं स्वप्न जसंच्या तसं दिसू लागलं. अर्थात BWS मुळं तार्किकदृष्ट्या हृषीकेश हिप्नोसीस मध्येच होता. स्वप्न बघताना हृषीकेशला जरी जाणवत नसलं तरी त्या स्वप्नात बाईक चालवणारा माणूस हा हृषीकेशच होता. तो रात्री एका पुलावरून चालला होता. इतक्यात त्या पुलावरच रॉंग साईडनं येणाऱ्या कारनं त्याला जोरात धडक दिली. तो खाली पडला आणि त्याला जोराचा मार लागला. हे सगळं कारमधून तो धडक देणारा बघत होता. हृषीकेशनं मदतीसाठी त्याची विनवणीही केली. पण कारमधून त्याने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि तिथून निघून जाणं पसंत केलं. हेच ते स्वप्न. अगदी छोटसं, पण हृषीकेशची झोप उडवणारं. हेच ते स्वप्न, ज्यासाठी हृषीकेश डॉ. संतोष यांच्याकडं आला होता. हे पूर्ण स्वप्न आता रेकॉर्ड झालं होतं. हृषीकेशचा BWS चा सेटअप डॉक्टरांनी काढून ठेवला. लगेचच त्यांनी स्क्रीनवर हृषीकेशला त्याचं स्वप्न दाखवलं. हृषीकेशनेही त्या स्वप्नाला दुजोरा दिला. हेच ते स्वप्न होतं ज्याने मागचे सात आठ महिने हृषीकेशची पाठ धरली होती. होता होता डॉक्टरांनी रिवाइंड करत कारपाशी व्हिडिओ थांबवला. थोडे झूम करताच त्या कारचालकाचा चेहरा त्यांना स्पष्ट दिसला. तो चेहरा दिसताच दोघांनाही प्रचंड धक्का बसला. चेहरा नक्कीच ओळखीचा होता. डॉक्टर पुढे काही बोलणार इतक्यात त्यांना थांबवून हृषीकेशने आजपर्यंत कुठल्याच व्हिजिटमध्ये सांगता न आलेली स्वतःची कहाणी सांगितली. अर्थात आतापर्यंतच्या त्याच्या व्हिजिट्सचा आणि त्याने सांगितलेल्या कहाणीचा काहीच संबंध नव्हता. पण आता मात्र त्याच्या या कहाणीचा आणि ह्या स्वप्नाचा एक नवीनच संबंध लागू शकला असता.

हृषीकेश डॉक्टरांना म्हणाला की, "मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला असं वाटतंय की, आता मी सांगणार आहे त्या गोष्टीचा आणि या स्वप्नाचा काही ना काहीतरी संबंध असावा. मला फक्त दहा मिनिट द्याल का?" 
"अर्थात. पेशंट जितका जास्त बोलेल तितकं माझ्यासाठी कधीही चांगलंच आहे. जे काही असेल ते सांगून टाक. त्याचा या स्वप्नाशी संबंध आहे का नाही ते आपण नंतर ठरवू." डॉ. संतोष. 
"मी अगदी सुरुवातीपासून सांगतो. माझा जन्म झाला तेव्हा असं समजलं की, मी जन्मजात अंध आहे. आजकाल सोनोग्राफीमध्ये बाळ गर्भात असतानाच बऱ्याचशा शारीरिक व्याधींविषयी समजतं, तितकं तंत्रज्ञान त्यावेळी आपल्याला अवगत नव्हतं. तेव्हा माझ्या जन्मानंतर आई बाबांना वाटलेलं की, अगदीच शंभर टक्के दिसत नाही असं होणार नाही, थोडंफार तरी दिसत असेल; मी थोडा मोठा झाल्यावर उपचार करून बरं होऊन जाईल. पण मी जसा मोठा होत गेला तसं समजत गेलं की, मला अगदी पुसटसही दिसत नाही. या दिवसात आईचे तर रडून रडून पार डोळे सुकून गेले होते. पण बाबांनी धीर सोडला नव्हता. कारण साधारणपणे मी बोलू लागल्यावर एकदा मला तपासून डॉक्टरांनी सांगितलं की माझा कॉर्निया निकामी आहे. डोळ्याचा हा भाग आपल्याला ऑपरेशन करून ठीक करता येतो. पण मी त्यावेळी खूप लहान होतो. लहान असताना ऑपरेशन करणं थोडं जिकिरीचं होतं. म्हणून डॉक्टरांनी मी मोठा होईपर्यंत आणि योग्य असा डोनर मिळेपर्यंत वाट बघणं कधीपण चांगलं, हे बाबांना समजावून सांगितलं होतं. त्यामुळं मी जन्मजात अंध जरी असलो, तरी हे अंधत्व त्याला आयुष्यभराचं सोबती नाही, याची बाबांना खात्री होती. त्यांनी तसं आईलाही वेळोवेळी समजावलं होतं. पण आई ऐकून, समजून घेईल तर शपथ. तिचा विचार करता ती समजून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती, हे मान्यच होतं. 
होता होता मी मोठा झालो आणि शाळेत जाऊ लागलो. मला अभ्यासात चांगली गती होती. मुख्य म्हणजे माझी, भारतीय शिक्षणपद्धतीचा पाया असलेली, स्मरणशक्ती अगदी तीव्र होती. कुणीही काहीही सांगितलेलं माझ्या चटकन लक्षात राहत असे. आई बाबांना माझ्या स्मरणशक्तीचं खूप कौतुक होतं. हळूहळू मी ऑपरेशनच्या वयाचा होत येताच, बाबांनी डॉक्टरांचं बोलणं लक्षात ठेऊन माझं नाव ग्लोबल लिस्टमध्ये नोंदवलं होतं. स्वाभाविकपणे मृत व्यक्तीचेच डोळे अशावेळी प्रत्यारोपित करावे लागतात. त्यामुळं ज्याक्षणी डोनर तयार असेल, त्याच वेळी लगेच मला ऍडमिट करून ऑपरेशन करावं लागणार होतं. सहा तासांच्या आत. आई बाबा वाट बघत होते की, कधी एकदा हॉस्पिटलमधून कॉल येईल आणि आपल्या हृषीकेशला दिसायला लागेल. वाट बघता बघता सहा आठ महिने गेले आणि रात्री दोन अडीचच्या आसपास बाबांना हॉस्पिटलमधून कॉल आला. माझ्या डोळ्यांच्या आवश्यकतेनुसार डोनर उपलब्ध झाला होता आणि आम्हाला लगेच हॉस्पिटलमध्ये बोलावलं गेलं होतं. आई बाबा लगोलग मला घेऊन हॉस्पिटलमधे हजर झाले. डॉक्टरांनी आम्ही पोहोचताच मला ओ. टी. मध्ये ऍडमिट करून लगोलग शस्त्रक्रिया सुरू केली. दीड दोन तास शस्त्रक्रिया चालली. डॉक्टर नावाजलेले असल्यामुळं तशी काही भीती नव्हती, पण तरी आई बाबांना थोडी धाकधूक होतीच. बाहेर बसून वाट बघत बघत एक एक सेकंद आई बाबांना एक एक तासासारखा वाटत होता. दोघांना काही सुचत नव्हतं. हातापायांची सतत चळवळ करत अस्वस्थपणे ते बाहेर बसून राहिले होते. होता होता डॉक्टर बाहेर आले. त्यांना बघून आई बाबा ताडकन उभे राहिले. डॉक्टर काय सांगतात याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. डॉक्टरांनी हसून त्यांचं अभिनंदन केलं आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचं सांगितलं. ते ऐकून आई बाबांचा जीव भांड्यात पडला. पण डॉक्टर मला लगेचच घरी सोडणार नव्हते. डोळ्याच्या ऑपरेशन असल्यामुळे थोडं नाजूकच होतं. मला पुढचा सबंध आठवडा देखरेखीखाली ठेवणार होते. नंतरच त्याला घरी जायला मिळणार होतं. सगळंकाही व्यवस्थित दिसण्यासाठी सहा महिने लागतील असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज होता. त्यानुसार सहा महिन्यातच मला नवी दृष्टी मिळणार होती. आई बाबांनी डोनरचे हात जोडून अगदी मनोमन आभार मानले." हृषीकेश.
"हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की, तुझ्या स्वप्नातलाच मुलगा तुझा डोनर असण्याची खूप जास्त शक्यता आहे. सगळ्यात आधी हे रेकॉर्डिंग तुझ्या आई बाबांना दाखवून त्यांचं काय म्हणणं आहे ते पाहूया." डॉ. संतोष.

क्लिनिक बंद करून दोघे लगोलग हृषीकेशच्या घरी आले. घरात येताच त्यांनी बघितलं की, हृषिकेशचा खास मित्र संदीपही घरी आला होता. अचानक संदीपला तिथं बघून दोघांच्या मनात एकच विचार आला,  याच्यासमोर आता कसं सांगायचं? त्यामुळे हृषीकेशने त्याला येण्याचं कारण विचारलं. 
"अरे आत्ताच आलास. बस तरी." संदीप डॉ. संतोषकडे अनोळखी नजरेने बघत हृषीकेशला म्हणाला.
"हॅलो. मी डॉक्टर संतोष. मी हृषीकेश सोबत एका केस वर काम करत होतो." संदीपच्या चेहऱ्यावरील अनोळखी भाव बघताच त्याच्याशी हस्तांदोलन करत डॉक्टर म्हणाले. 
"मी संदीप. हृषीकेशचा मित्र. तुम्ही त्याच्या त्या स्वप्नावर काम करत होता का?" संदीप.
"हो. पण तुला कसं माहिती याबद्दल?" हृषीकेश.
"मी एका रेडिट पोस्टविषयी काका-काकूंशी बोलायला आलो होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं" संदीप.
"म्हणजे? नाही कळलं." हृषीकेश.
"तुम्ही यायच्या पंधरा-वीस मिनिटं आधीच मी काका काकूंना रेडिटवरची ही पोस्ट दाखवत होतो. डॉक्टरसाहेब तुम्हालाही आता याची थोडीफार पार्श्वभूमी आहेच. मी जास्त काही सांगत नाही. तुम्ही ही पोस्टच बघा."
संदीपने डॉक्टरांच्या हातात मोबाईल दिला. एका भारतीय सबरेडिटवर ती पोस्ट होती. पोस्टमध्ये असं दिलेलं की, एका मोठ्या उद्योजकाच्या मुलाने एका पुलावर बाईकवाल्याला जोरात धडक दिली होती. त्यामध्ये त्या बाईकवाल्याचा मृत्यू झाला होता. ही बातमी तीन ते चार न्यूज चॅनेल्सनी त्या रात्रीच दाखवली. ती घटना सुमारे रात्री दोन तीनच्या आसपास घडली होती. त्या न्यूज चॅनेल्सनी बातमी दाखवताच उद्योजकाला याची खबर लागली आणि त्यानं ती चारही न्यूज चॅनेल्स लगेचच विकत घेतली! आणि न्यूज चॅनेल्स विकत घेताच त्यांना ती बातमी डिलीट करायला लावली. लगोलग ही बातमी गुगलवरूनही डिलीट करण्यात आली. कुठंच या बातमीचा मागोवा राहिला नाही. त्या उद्योजकाची बदनामी तर वाचलीच, पण त्याच्या मुलाची अटकही टळली. पोस्ट वाचताच डॉ. संतोष म्हणाले, " आणि त्या उद्योजकाचं नाव मिस्टर सोहनी! भारतातला एक आघाडीचा उद्योजक. त्यातून त्याच्यावर सरकारचा वरदहस्त."
"काय!? फक्त पोस्ट वाचून तुम्हाला नाव कसं कळलं? पोस्ट करणाऱ्यांनी तर कुठेही त्याचं नाव दिलं नाही." हृषीकेशचे बाबा.
"तेच सांगायला मी हृषिकेश बरोबर घरी आलो होतो. स्वप्नावरचा आमचा अनोखा प्रयोग आज यशस्वी झाला. सतत हृषीकेशला दिसणारं ते स्वप्न आम्ही रेकॉर्ड करण्यात यशस्वी झालो. त्यात आम्हाला दिसलं की, हृषीकेशला स्वप्नात सतत दिसणारा कारवाला दुसरा तिसरा कुणीही नसून सोहनीचा मुलगा आहे. प्रश्न इतकाच होता की, हे स्वप्न हृषीकेशला सतत का पडतंय." डॉ. संतोष
"पोस्टनुसार ज्या तारखेला हृषीकेशचं ऑपरेशन झालं त्याच तारखेला हा अपघात झाला. शंभर टक्के ही शक्यता आहे की, जो डोनर होता तो सोहनीच्या  मुलाच्या कारच्या धडकेत मारला गेला." संदीप.
"तेच मला स्वप्न बघितल्या बघितल्या जाणवलं. म्हणून मी डॉक्टरांना अगदी सुरुवातीपासून ची इत्यंभूत कहाणी सांगितली." हृषीकेश.
"बरोबर. आणि त्यामुळं तो डोनर त्याच्या डोळ्यांमधून हृषीकेशला काहीतरी सांगू पाहतोय!" डॉ. संतोष.
"आपल्याला सगळ्या शक्यतांची थोडीफार लिंक लागलीच आहे. आपण एकदा हॉस्पिटललाच जाऊन चेक करूया का? आपल्याला डॉक्टर नक्की डोनरची माहिती देतील." हृषीकेशचे बाबा.
"अर्थात. नक्कीच." डॉ. संतोष.

सगळ्यांनाच धक्क्यावर धक्के बसत होते. डॉक्टरांचे संशोधन यशस्वी जरी झालं असलं, तरीही केस जास्तच कॉम्प्लिकेटेड झाली होती. तसंच ही केस सेन्सिटिव्ह असल्यामुळं आपलं संशोधन प्रकाशित कसं करायचं आणि संशोधनाचे पुरावे काय द्यायचे हा डॉक्टरांसमोर मोठा प्रश्नच होता. त्याहूनही मोठं म्हणजे त्या डोनरला न्याय मिळवून द्यायचा होता. हे ही काम अवघडच होतं कारण, सोहनीवर असलेला सरकारचा वरदहस्त! त्याच्यापर्यंत कुणाला पोहोचणंही अवघडंच होतं.

सर्वजण ठरल्यानुसार आधी हॉस्पिटलला गेले, जिथं हृषीकेशचं ऑपरेशन झालं होतं. त्यांनी तिथून डोनरचा नाव आणि पत्ता घेतला. तिथल्या डॉक्टरांनी माहिती दिली की, त्याचं नाव संकेत असून तो इथलाच जवळचा रहिवासी आहे. संकेतच्या घरी रात्री जाणं उचित वाटलं नसतं म्हणून, दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण त्याच्या घरी गेले. डॉक्टर संतोषनी संकेतच्या आई-बाबांना तिथं येण्याचं कारण आणि आत्तापर्यंत त्यांना मिळालेली सर्व माहिती इत्यंभूत सांगितली. सर्व माहिती ऐकून घेतल्यावरही संकेतच्या आई बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव अजिबात हलले नाहीत. सर्वांसाठी हा ही छोटासा धक्काच होता. सर्वांची एकच भावना होती की, स्वतःच्या मुलाविषयी इतकं सगळं ऐकल्यानंतर कुणीही काहीच प्रतिक्रिया न देणं असं कसं शक्य आहे. बहुधा या घटनेला आता दोन वर्ष होऊन गेली त्यामुळे त्याच्या बाबांनी अशी थंड प्रतिक्रिया दिली असेल. 

संकेतच्या बाबांनी थोडा वेळ शांततेत जाऊ दिला आणि घसा साफ करून बोलायला सुरुवात केली. "सगळ्यात आधी संकेतसाठी उभे राहण्याबद्दल जे काही तुम्ही कष्ट घेतलेत, त्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार! झालं असं की, ज्या दिवशी हा अपघात झाला त्या रात्री आम्हाला हॉस्पिटल मधून कॉल आला. संकेतची वाचण्याची शक्यता तशी कमीच होती. डॉक्टरांनी आम्हाला याची पूर्ण कल्पना दिली. तसंच त्यांनी नेत्रदानाविषयीही विचारलं. त्यांनी सांगितलं की, बऱ्याच दिवसापासून एकजण वेटिंग लिस्ट मध्ये आहे आणि त्याचे सगळे पॅरामीटर्स संकेत सोबत जुळतायत. त्यांनी आमची यासाठी परवानगी मागितली. संकेत वाचण्याची शक्यता तशी कमीच होती. त्यामुळे आम्हीही जास्त विचार न करता नेत्रदानासाठी संमती दिली. संकेतचेच डोळे हृषीकेशला मिळाले. तुम्ही जे हृषीकेशच्या स्वप्नाविषयी सांगितलं, हे म्हणजे असंच झालं मरावे परी नेत्ररुपी उरावे. अगदी शेवटच्या क्षणी बसलेला धक्का संकेतला पचवता आला नसला पाहिजे. म्हणून ते चित्र हृषीकेशला जसंच्या तसं स्वप्नात दिसत असावं."

"पण तुम्ही इतक्या थंडपणे कसं काय बोलू शकता? तुमच्या मुलाच्या मारेकऱ्याविषयी आम्ही आत्ताच तुम्हाला सांगितलं. त्याचे थोडेफार पुरावेही दिले. तुम्हाला आता त्याविषयी काहीच करायचं नाही का? आपल्याला संकेतला न्याय मिळवून द्यायचा नाहीये का?" डॉ. संतोष. 
"हे बघा डॉक्टर, ज्या दिवशी ही घटना झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सोहनी सांत्वनासाठी स्वतः आम्हाला भेटायला आला होता. काही न्यूज चॅनेल्सनी रातोरात ही बातमी दाखवल्यामुळं बहुधा खबरदारी म्हणून आला असावा. त्याने आम्हाला पूर्ण घटनेचा अंदाज दिला आणि सोबत नुकसान भरपाई म्हणून पाच कोटी ऑफर केले. सामान्य माणसानं न्यायासाठी सरकारी वरदहस्त असलेल्या सोहनीविरुद्ध लढायचं म्हणजे नक्कीच पाच कोटीच्या वर खर्च झाला असता. अशा सरकारी वरदहस्त असलेल्या माणसाविरुद्ध आपल्याला न्याय मिळणं अवघड तर सोडाच पण अशक्यच. आपली न्यायव्यवस्था अशा श्रीमंतांसाठीच तर विकली गेली आहे. हा सगळा विचार करून मी ते पाच कोटी स्वीकारले आणि हा विषय तिथेच बंद केला. म्हणून मी आत्ता इतक्या शांतपणे तुम्हा सगळ्यांशी बोलतोय."

अजूनच मोठा धक्का. सगळं माहीत असूनही संकेतच्या घरच्यांनी कुठेही याविषयी चकार शब्द काढला नव्हता. अर्थात संकेतच्या बाबांचं म्हणणंही बरोबर होतं. सामान्य माणसाला, तो कितीही बरोबर असला, तरी सरकारी वरदहस्त असलेल्या श्रीमंतांविरुद्ध लढणं निव्वळ अशक्यच होतं. त्याहूनही सोहनी यातून सहीसलामत सुटला असताच, वर खोट्या आरोपांसाठी संकेतच्या घरच्यांची बदनामीही करून मोकळा झाला असता. तसं बघता सारासार विचार करून संकेतच्या वडिलांनी घेतलेला निर्णय जरी चुकीचा वाटत असला तरी रास्त होता. 

आता हृषीकेशला त्याच्या डोनरविषयी संपूर्ण माहिती मिळाली होती. संकेतच्या घरच्यांना चुकीची तरीही रास्त वाटणारी नुकसानभरपाई मिळाली होती. डॉक्टर संतोषना त्यांच्या क्षेत्रातल्या एका नवीन गोष्टीचा शोध लागला होता. पण त्यांचा हा शोध प्रकाशित करण्यासाठी कोणताच पुरावा हाती नव्हता. या सोहनी प्रकरणामुळे हा शोध प्रकाशित करण्यासाठी त्यांचे हात बांधले गेले होते. त्यामुळे हे संशोधन प्रकाशित करून त्याचं पेटंट मिळवण्यासाठी आता ते एका नवीन केसच्या शोधात होते. एका नवीन स्वप्नाचा मागोवा घेत होते.

© श्रेयस जोशी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

साकेतची गोष्ट । Interactive story । Interactive Marathi story

तुम्हाला हवंय आईबाबांचं ऐकून लग्न करावं