संवाद

तू माझी नक्कीच आठवण काढशील...
तुला माझी नक्कीच आठवण येईल , जेव्हा तू एकटा असशील...
तुला मी नक्की आठवेन , जेव्हा तुला सगळ्याचा कंटाळा येईल आणि तू उदास होशील...
तुला मी नक्की आठवेन , जेव्हा नवनवीन जबाबदाऱ्या,नकोशा पण जरुरी, तुझ्या अंगावर पडतील...
जगाला खोटं खोटं हसून उत्तरे देताना माझ्यातली निरागसता नक्की आठवेल तुला...
डोळ्यातल्या अश्रूंना जबरदस्तीनं थोपवताना, जरूर आठवेल तुला माझ्यातला मोकळेपणा...
स्वातंत्र्य तर तुला मिळेलच, नक्कीच, पण माझ्यातल्या स्वातंत्र्याची वेगळी मजा तुला नक्की जाणवेल...
स्वतंत्र जगताना माझ्यासारखं बांधील, पण मोकळेपणानं जगावं असं वाटेल तुला, पण तुझा नाईलाज असेल...
त्यावेळी फक्त मी आठवत राहीन तुला...
तू अगदी जग फिरून येशील, सगळ्या सगळ्या वाहनात बसशील, मजा करशील, पण माझ्यासोबत जमिनीवर, गुडघ्यावर बसून, जोरजोरात फिरवलेली गाडी तुला नक्कीच त्यापेक्षा जास्त आनंद देईल...
तू पावसातून रेनकोट घालून जाताना तुला नक्की आठवेल, माझ्यासोबतचं पावसात मनसोक्त भिजणं, चिखल उडवत बेधुंद नाचणं...
जगाशी स्वार्थासाठी खोटं बोलताना तुला नक्की जाणवेल, माझी निरागसता, माझ्यातला खरेपणा...
कष्ट करून काहीतरी विकत घेताना तुला नक्की आठवेल, माझं रडून, नाटकं करून मिळवलेलं काहीतरी, नक्कीच...
महागड्या मोबाईल वरून बोलताना कधीतरी तुला नक्कीच आठवेल तो स्ट्रिंगफोनचा अट्टाहास, अगदीच...
कॉलेजच्या कट्ट्यावर धावपळीचं जीवन जगताना शाळेतल्या मैदानावरची पकडापकडी तुला जरूर आठवेल...
रस्त्यावर जपून गाडी चालवताना तुला, माझ्यासोबत हमरस्त्यावरून वाकड्या तिकड्या चालवलेल्या सायकलची, आठवण आल्याशिवाय राहणार नाही...
रात्री उशिरापर्यंत जागताना तुला, माझ्या धपाटे घालून उठवलेल्या, नक्की आठवतील...
मोबाईल वर अमर्याद चॅटिंग करताना, मी पाठवलेल्या निरर्थक चिठ्ठया, तुला नक्की आठवतील...
स्वच्छ कपडे घालताना तुला आठवतील, कधीतरी माझे रोज संध्याकाळी धुळीने माखलेले कपडे...
कोणीतरी 'हवीशी' शोधताना मला आवडलेली 'ती' नेहमीच लक्षात असेल तुझ्या...
असेच काही अनुभव माझे, ज्यामुळे तुला मदत होईल, परिस्थितीशी जुळवून घ्यायला...
असेच काही माझे आनंदाचे क्षण, तुला मदत करतील तुझ्या एकटेपणात, तुला हसवतील, सुखावतील, नक्कीच...
अशाच माझ्या काही खोड्या, तुला आराम देतील, धकाधकीच्या, पळापळीच्या आयुष्यात...
माझे काही किस्से, तुला मदत करतील, दुःखात हसवायला, अगदीच...
अशाच काही घटना, ज्यातून तुला काहीतरी शिकायला मिळेल की, 'काय करायचं नसतं...'
माझ्या काही आठवणी पण आहेत, वाईट, नकोशा, त्या विसरायला मदत हवीय तुझी...
माझ्या काही अडचणी आहेत, त्या सोडवायला मदत हवीय, तुझीच...
माझी काही स्वप्न पण आहेत, ती पूर्ण करायला मदत हवीय तुझी...
आणि मला , तू मला न विसरायला सुद्धा मदत हवीय, तुझी...
आणि हो...
काही झालं तरी तू माझा मोठा भाऊ आहेस , पण लहान भावाला नको विसरू कधी, अगदी कधीच...
- बालपण बोलत होतं . तारुण्य शांतपणे ऐकून घेत होतं, बालपणाला कधीही न विसरण्याचं मनोमन वचन देत...

©श्रेयस_जोशी

Comments

Popular posts from this blog

नातं

प्रेमाखातर

तो आणि ती