दुभंग
सूर्य तळपत होता . नेहमीप्रमाणेच . नुसती आग ओकत होता . आगीच्या तप्त गोळ्यांचा वर्षाव करत होता . संपूर्ण वातावरण तापलं होतं . नुसती आग-आग सगळीकडं ! सभोवार तापलं होतं . सूर्याला कशाचीच फिकीर नव्हती . फिकीर म्हणण्यापेक्षा त्याला कशाची पर्वा नव्हती . जणू तो त्याला नेमून दिलेलं काम चोख बजावत होता , 'तिला' तापवण्याचं ! तिच्याकडेही काही पर्यायच नव्हता . ती काही करू शकत नव्हती . सुर्याविरुद्ध कुणाकडे तक्रार , म्हणजे अगदीच अशक्य ! आणि ती सूर्याला विनवणी देखील करू नव्हती शकत , पारा जरा कमी करण्याविषयी ! काय करणार , तिचा स्थायीभाव , 'सोशिकता' ! जे वाट्याला आलं ते निमूटपणे सहन करायचं . जे होईल ते सोसत राहायचं . कुणाकडे कसली विनवणी नाही करायची , कुणाची कुणाकडे तक्रार नाही करायची , अजिबात . जे होईल, ते होईल . म्हणून, ती निमूटपणे सूर्याचा तो अग्निवर्षाव सहन करत होती . तिला नव्याने तडे जात होते . दिवसागणिक अधिक कोरडी होत होती ती . तरुमित्रांनी तर कधीच हार मानली होती . त्यात आणखी भर म्हणजे, त्या सूर्याने वाऱ्यालाही आपल्या पक्षात वळवून घेतलं . आता, सूर्य वाऱ्याशी हात मिळवून तिला अजून त्रास द्यायला मोकळा . उन्हाचा तिखट मारा आणि भरीला तप्त वारा ! त्यामुळे , ह्या वणव्याची तीव्रता अधिकच वाढली होती; आणि पर्यायाने तिचा त्रास . अजून किती दिवस हा वणवा सहन करायचा होता , कुणास ठाऊक . तिच्या हातात पावसाच्या येण्याची वाट बघण्याशिवाय आणखी पर्याय नव्हता . तोपर्यंत हे सहन करायचंच होतं, वणवा, अग्निवर्षाव, तप्त वात, सगळंच !
__________________________________________
__________________________________________
तो आज तिला एकदाचं विचारणारच होता, 'WILL YOU MARRY ME' ! खूप दिवस झाले, विचारू कि नको, हो-नाही, हो-नाही चाललेलं त्याचं . पण, हळूहळू त्याला तिच्या वागण्यातून 'पॉसिटिव्ह' संदेश मिळत गेले आणि , त्यानं तिला विचारायचं पक्कं केलं मनाशी . ठरलेल्या जागी तो पोहचला, नेहमीप्रमाणे तिच्या आधीच ! ती यायला अजून वेळ होता , बहुतेक . तिची वाट पाहताना त्याच्या डोळ्यासमोरून एक चित्रशृंखलाच तरळली, अगदी सुरुवातीपासून...
त्याच्या आयुष्यात त्यानं आनंदी व्हावं , असं कधी काही घडलंच नव्हतं . त्याचं आयुष्य संकटाच्या वणव्यानी काठोकाठ भरलेलं . अगदी लहानपणापासूनच दुःख त्याच्या पाचवीला पुजलेली . लहानपणीच त्याच्या आई-वडिलांनी फारकत घेतली . आईने त्याचा ताबा मिळवून, त्याला त्याच्या मावशीकडे ठेवलं . स्वतः माहेरी निघून गेली . नंतर आली भेटायला तर आली , एखाद्या सणवारी वगैरे . बाबांशी काही इतका संपर्कच नव्हता . असाच वाढला तो , आई-वडील असूनही अनाथ, एकटा . त्याचा स्वभावही त्यामुळं तसाच झाला, आत्ममग्न, स्व-केंद्री . दुःख तर आगीच्या गोळ्यांसारखी बरसत होती . सोबत नाही कुणाची . अशा स्वभावानं फारसे मित्र नाहीत . दुःख हलकं करायला कोणी जवळचं नाही . बोलायला 'बेस्ट-फ्रेंड' नाही . त्याच्या हातात सहन करण्याशिवाय काही नव्हतं . जे होईल ते फक्त पाहत राहायचं .
कॉलेजला आला तो . त्यानं मुद्दामहूनच जरा दूरचं कॉलेज निवडलं . हळूहळू त्याची 'हॉस्टेल-LIFE' सुरु झाली . तोही अभावितपणे सगळ्यात समरस होत होता . त्याचा स्वभाव हळूहळू बदलत होता , पर्यायाने मित्र-मंडळ वाढत होतं . असंच मजा, मस्ती, आनंदात एक वर्ष गेलं . तो या वातावरणाला आता सरावला होता . त्याला खूप मस्त वाटू लागलं हे जीवन . आवडत्या शाखेत प्रवेश मिळाल्याने अभ्यासाच्या तणावाचा तर प्रश्नच नव्हता . जोमात सुरु होता अभ्यास .
कॉलेज सुरु व्हायला अजून ४ दिवस होते . सगळे कॅन्टीन वर जमलेले . फालतूपणा , फकाट जोक्स ( ज्यावर हसू येत नाही , पण हसायचं असतं असे शाब्दिक खेळ करून केलेले विनोद ) जोरात चालू होते . इतक्यात त्याला 'ती' दिसली . बहुतेक बहिणीसोबत आलेली , नवीन कॉलेज कसं आहे बघायला . झालं , त्यानं तिला पाहिल्यापाहिल्याच आपल्या मित्रमंडळात घोषित केलं , ' हिच ती . हिच आयुष्यभर माझा अर्धा त्रास सहन करणार .' एकजण म्हणाला , 'गप रे . अजून शंभर जणी दिसतील अशा कॉलेज बघायला आलेल्या . मग काय शंभर वेळा असंच म्हणणार का? गप पड तिकडं .' त्यानं यावर अतिशय कोरडी प्रतिक्रिया दिली . अर्थातच, सगळ्यांना तो फालतू पणा वाटला . त्यांनी तो विषय तिथंच सोडून दिला . फालतूगिरी , फकाट पुन्हा जोमात सुरु झाले .
कॉलेज सुरु झालं . नंतर त्यानं तिची माहिती कशी काढली , तिच्या मैत्रिणींशी अगोदर केलेली मैत्री , त्यांची पहिली भेट , त्यांनी एकत्र घालवलेले मजेदार क्षण , तिच्या आवडीनिवडी , तिचा 'Family-oriented' स्वभाव , त्यांची कॉलेज बाहेरची पहिली भेट हे सगळं तो आठवत असतानाच ती आली .
__________________________________________
__________________________________________
तिचं सहन करणं अखेर संपलं . पाऊस आला अखेर . सगळं वातावरण प्रफुल्लित करत तिला बिलगला . ती ही त्याच्या हव्याहव्याशा स्पर्शाने सुखावली . तिनं त्याला कडकडीत , घट्ट आलिंगन दिलं . आता असाच राहा , मला सोडून जाऊ नको, इतकंच तिला त्याला सांगायचं होतं . तिचं प्रेम , तिची ओढ न समजायला पाऊस मूढ नव्हताच ! तो शांतपणे बरसत राहिला . हळूहळू . तिच्या एकएक भेगा बुजवायला त्यानं सुरुवात केली . खूप काही सहन केलं होतं, तिनं, त्याच्यासाठी . पावसालाही त्याची जाणीव होती . पावसानं तिला सोडून न जाण्याचं मूक वचन दिलं . ती आता खूप आनंदी होती . तिला हवाहवासा गारवा लाभला , त्या उष्माघातापासून सुटकाच झाली जणू . तिला खूप छान वाटत होतं . अगदी गारगार . सुंदर, मस्त, थंड, त्याच्या सानिध्यात . ती पावसासोबत खूप खेळणार होती . अगदी सूर्याची तक्रार पण आता हक्काने करणार होती ती पावसाकडे . आता तिचा 'तरु-मित्र' पुन्हा नव्याने बहरणार होता . त्यानंतर ती नव्याने त्यांच्याशी गुजगोष्टी करायला मोकळी . पावसाने तिच्या आनंदात अजून भर टाकली . त्याने वाऱ्याला आपल्याकडं वळवून घेतलं . साहजिकच ती अजूनच सुखावली . पाऊस खूप आवडू लागला तिला आता , तिचा त्रास दूर केल्यापासून अधिकच ! पावसाला साथीला घेऊन ती सूर्याला वाकुल्या दाखवत होती . सूर्य , कोणतीही प्रतिक्रिया न देता , ढगाआड लपून राहणं पसंत करत होता . पाऊस आणि भुईचं मिलन त्याला आवडलं नव्हतं कि काय , काय माहित ? पण त्याला एक मात्र नक्कीच माहित होतं की, ती सृष्टीचक्र विसरली होती त्याला चिडवताना, नक्कीच .
__________________________________________
त्यांचं खूप मजेत चाललं होतं सगळं . एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटत होता . तो कमावता झाला . ती, एक वर्ष मागं असल्याने, अजून शिकत होती . दोघंही स्वतःच्या पायावर उभे झाल्याशिवाय पुढचं काही ठरवायचं नाही, असं त्यांनी ठरवलं होतं . ती अभ्यासात तशी हुशार होती . त्यामुळं येत्या वर्षात तिलाही नोकरी लागणार होती , नक्कीच .
काही असो , पण ते एकमेकांसोबत खूप आनंदी आणि समाधानी होते . ३ वर्षात खूप काही घडून गेलं होतं . चांगलं . ते एकमेकांना संपूर्ण ओळखू लागले होते . अगदी एकमेकांच्या आवडत्या रंगापासून ते एकमेकांच्या आवडत्या ठिकाणापर्यंत , सगळं. कॉलेजच्या तीन वर्षातले त्यांचे सहा वाढदिवस त्यांनी धडाक्यात साजरे केले होते . खूप मस्त जोडी होती त्यांची . अगदी 'MADE FOR EACH OTHER'.
तिनं त्याला त्याची सगळी दुःख विसरायला लावली होती . तिच्या सहवासाने तो ही त्याच्या दुःखापासून जरा लांब आला . तो मुक्तपणे तिच्या प्रेमवर्षावात भिजून गेला होता , अगदी चिंब . तिच्या स्वच्छ, निर्मळ, हव्याहव्याशा वाटणाऱ्या काळजी आणि प्रेमभरल्या सरींमध्ये तो न्हाऊन निघाला होता . त्याच्या सगळ्या संकटांची 'प्रखरता' तिच्या नितळ हास्यामध्ये खूप कमी झाली होती .
तिलाही याची जाणीव होतीच . तिला पूर्णपणे माहित होतं की, त्याच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे . तिला त्यानं अनुभवलेली सगळी संकटं माहित होती . अपल्यामुळं तो त्या सगळ्यातून बाहेर पडला , याचाही तिला आनंद होता . त्याला कधीच सोडून न जाण्याचं वचन, स्वतःलाच, तिनं मनोमन दिलं होतं .
त्यांना आता एकत्र यायला काहीच अडचण नव्हती . खूप समजुतीनं त्यांनी सगळ्या योजना आखल्या होत्या . आता त्याला फक्त तिच्या घरी जाऊन तिच्या वडिलांना , घरच्यांना भेटायचं होतं आणि त्यांचा होकार मिळवायचा होता . तो कसलीही भीती , शंका न बाळगता त्यांना भेटायला गेला. सगळं व्यवस्थित होणार होतं . काहीच अडचण नव्हती .
_________________________________________
_________________________________________
पाऊस ओसरला होता . सुर्याभोवतीचे ते 'काळे ढग' बाजूला गेले होते . तेच ते , पाऊस पाडणारे 'काळे ढग'. सूर्याचा तप्त मारा परत सुरु झाला , नव्या जोमाने . त्याची प्रखर किरणं तिला परत कोरडं करत होती . सूर्य-वणव्याची सुरुवात ! तिनं एकवार आभाळाकडे पाहिलं . निरभ्र , निळं ! पण, तिला ते निरभ्र आकाश नकोसं वाटू लागलं . तिला त्यातल्या काळ्या ढगांची अनुपस्थिती अगदी नकोशी होती . पण काय करणार, नियती ! DESTINY ! ज्याला जे मिळायचं असतं तेच मिळतं , त्याहून कमी मिळेल पण, जास्त काही नाही ! तिलाही नियती चुकली नव्हती . तिला हव्याहव्याशा वाटणाऱ्या पावसाला आणि तिला विलग केलं होतं, नियतीनं. सूर्य प्रखर, तप्त किरणं घेऊन पुन्हा तिच्या वाटेत उभा . तो तिला पुन्हा तापवत होता . ती सुद्धा हळूहळू कोरडी होत होती , पावसाच्या गुलाबी, हव्याहव्याशा, सुंदर, गोड आठवणी विसरत . सुर्यामुळे तिच्यातून निघणाऱ्या वाफांनी पावसाच्या एक-एक सुखद आठवणी पुसल्या जात होत्या . तिच्या हातात , होतंय ते बघत राहण्याशिवाय , काहीच नव्हतं . हेच ते सृष्टीचक्र , जे ती विसरली होती पावसाच्या सहवासात . सूर्याच्या नकोशा उष्णतेने तिला पुन्हा कोरडं व्हावच लागणार होतं , पावसाच्या थंडगार आठवणी विसरून . नाईलाजास्तव...
__________________________________________
नकार...कारण , नाही माहित...स्वप्नभंग...असंच चालत राहील...continued...
'समाप्त' कधी , ते मलाही नाही माहित...
___________________________________
'समाप्त' कधी , ते मलाही नाही माहित...
___________________________________
©श्रेयस_जोशी
👍👍👍
ReplyDelete👌👌👌
ReplyDelete