दुभंग
सूर्य तळपत होता . नेहमीप्रमाणेच . नुसती आग ओकत होता . आगीच्या तप्त गोळ्यांचा वर्षाव करत होता . संपूर्ण वातावरण तापलं होतं . नुसती आग-आग सगळीकडं ! सभोवार तापलं होतं . सूर्याला कशाचीच फिकीर नव्हती . फिकीर म्हणण्यापेक्षा त्याला कशाची पर्वा नव्हती . जणू तो त्याला नेमून दिलेलं काम चोख बजावत होता , 'तिला' तापवण्याचं ! तिच्याकडेही काही पर्यायच नव्हता . ती काही करू शकत नव्हती . सुर्याविरुद्ध कुणाकडे तक्रार , म्हणजे अगदीच अशक्य ! आणि ती सूर्याला विनवणी देखील करू नव्हती शकत , पारा जरा कमी करण्याविषयी ! काय करणार , तिचा स्थायीभाव , 'सोशिकता' ! जे वाट्याला आलं ते निमूटपणे सहन करायचं . जे होईल ते सोसत राहायचं . कुणाकडे कसली विनवणी नाही करायची , कुणाची कुणाकडे तक्रार नाही करायची , अजिबात . जे होईल, ते होईल . म्हणून, ती निमूटपणे सूर्याचा तो अग्निवर्षाव सहन करत होती . तिला नव्याने तडे जात होते . दिवसागणिक अधिक कोरडी होत होती ती . तरुमित्रांनी तर कधीच हार मानली होती . त्यात आणखी भर म्हणजे, त्या सूर्याने वाऱ्यालाही आपल्या पक्षात वळवून घेतलं . आता, सूर्य वाऱ्याशी हात मिळवून तिला अजून त्...