चक्र
" हॅलो मोहिते, आहात तिथून लवकर निघा. अजून एक खून झालाय. साखळीत अजून एका मुलीच्या मृतदेहाची भर पडलीये. साहेबांनी ताबडतोब नाकाबंदीची ऑर्डर दिली आहे. त्वरित निघा." मोहिते लगेच पोशाख चढवून चौकीकडे निघाले. काय करावं समजत नव्हतं. दोन दिवसाआड एका मुलीचा बळी जात होता. तो ही विनाकारण. कोण करतंय हे सगळं, त्यामागचा त्याचा हेतू काय, कोणाच्या आदेशानुसार हे सगळं चाललंय काहीच समजायला मार्ग नव्हता. पोलिसांनी गेला एक महिना रात्रीचा दिवस करून आरोपीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. पण, काहीच हाती लागत नव्हतं. आरोपी अतिशय चतुर होता. तो कोणतेच पुरावे पाठीमागे सोडत नव्हता. त्यानं शहरातल्या केवळ मध्यमवयीन तरुणींनाच लक्ष्य केलं होतं. का? कशासाठी? तरुणीच का? काहीच कळायला मार्ग नव्हता. गेला एक महिना मोहिते आणि टीमचं लक्ष्य एकच होतं, तो सिरीयल किलर ! त्याला आता काही करून.... हे सगळे विचार चालू असतानाच मोहितेंना वाटेत, एका बंगल्यासमोर आत जाण्याच्या स्थितीत उभी असलेली पांढरीशुभ्र SUV उभी असलेली दिसली. तसा मोहितेंच्या घरासम...